Sign In New user? Start here.

किशोरवयीन मुलांची मानसिक कोंडीची व्यथा सांगणारे नाटक “अश्लील वारे” रंगमंचावर

 
 

किशोरवयीन मुलांची मानसिक कोंडीची व्यथा सांगणारे नाटक “अश्लील वारे” रंगमंचावर

new
ashlile vare marathi natak Add Comment

किशोर वयात शरीरात निसर्ग नियमाने बदल होतो आणि मनात कुतुहुल जागृत होते. अशावेळी प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला जातो. पण अशा प्रसंगी त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं का ? योग्य त्या मार्गदर्शनाअभावी तो दिशाहीन होऊन चुकीच्या मार्गावर जाण्याचा संभव निर्माण होतो. या सर्व बाबींचा अंतर्भाव करून त्यावर योग्य तो तोडगा काढण्याच्या उद्देश्याने निर्माते राम भाटले व राखी भाटले यांनी “अश्लील वारे” या नाटकाची निर्मिती केली आहे. किशोरवयीन मुलांची मानसिक कोंडीची व्यथा सांगणारे “अश्लील वारे” हे लक्षवेधी नाटक सध्या जोमाने सुरू असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. स्मित आणि अर्चना थिएटर्स निर्मित, निर्माते राम भाटले व राखी भाटले यांच्या “अश्लील वारे” या नाटकाचे लेखन व गीते संकेत तटकरे यांचे असून दिग्दर्शन संदीप तटकरे यांनी केले आहे.

“अश्लील वारे” या नाटकाची कथा आहे सुरूची, पराग, वसुधा आणि अंकुश हया चार किशोरवयीन मुलांची. अभ्यासाला जमणारी ही चौकडी बांध तोडून लैंगिक चर्चेत तल्लीन होतात. एखादं मुल जन्माला कसं येतं. इथूनच या चर्चेचा श्रीगणेशा होतो. पण याचं उत्तर त्या चौघांपैकी कुणाकडेच नसतं. अशावेळी आपल्या आईवडिलांकडूनच याचं उत्तर घेण्याचा निर्णय होतो. अंकुशचे आईवडील अमेरिकेत असतात. परागची आई हयात नसते तर बाप व्यसनाधीन. सुरूचीच्या पालकाकडून अर्धवट माहिती मिळते तर वसुधाचे वडील भाईगिरी करत असल्याने तीला शिव्या शिकवतात पण मूळ विषयावर काही बोलत नाहीत. या चौघांना मात्र कसंही करून उत्तर हवं असतं. अशा वेळी ते लैंगिक विषयावरील पुस्तकं वाचून उत्तरं मिळवतात. पण मिळालेल्या ज्ञानाचा सर्वांना फायदा करून देण्याच्या उद्देश्याने ते आपल्याच शाळेत “अश्लील वारे” नावाचं पुस्तक प्रकाशित करतात. अशा आशयाची ही कथा अतिशय विनोदी प्रसंगांनी या नाटकातून मांडली आली आहे.

“अश्लील वारे” हे केवळ एक नाटक नसून तो एक विचार आहे. जे आईवडील आपल्या मुलांवर खरं प्रेम करतात त्या सर्वांनी हे नाटक आवर्जून पहावे असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. या नाटकाचे निर्मिती प्रमुख शेखर दाते हे असून संगीत अमिष कोंडरा, नेपथ्य सचिन वारिक तर प्रकाश योजना देवदास शिवगण यांची आहे. या नाटकात संकेत तटकरे, प्रियंका शेटये, प्रतिक्षा पोटे, राकेश राऊत आणि संदीप तटकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ----------