Sign In New user? Start here.

बंध-मुक्त नाटकाचा शानदार प्रिमियर

 
 

बंध-मुक्त नाटकाचा शानदार प्रिमियर

आयुष्याची सुरुवात आणि शेवट चांगला व्हावा असा विचार प्रत्येकजण करीत असतो. असाध्य आजाराने हतबल होत मृत्यूची प्रतीक्षा करण्यापेक्षा ‘इच्छामरण’ हा शेवटचा पर्याय काहींना जवळचा वाटतो. इच्छामरणास कायदेशीर हक्क मिळावा यासाठी अनेक सामाजिक संस्था कायदेशीर लढाई लढत आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारं बंध-मुक्त हे नवकोरं नाटक रंगभूमीवर चांगलंच चर्चेला आलंय. ‘जगदंब क्रिएशन्स’ निर्मित, ‘तिरकिटधा’ प्रस्तुत बंध-मुक्त नाटकाचे लेखन विवेक आपटे तर दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी केलंय. अभिनयासोबत या नाटकाच्या निर्मितीत देखील डॉ. अमोल कोल्हे यांचा सहभाग आहे. रंगभूमीवर प्रथमच बंध-मुक्त नाटकाचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सौ.रश्मी ठाकरे, खासदार अनिल देसाई, आमदार संजय केळकर, अॅडव्होकेट उज्वल निकम, किरण शांताराम, भरत जाधव, विजय केंकरे, भरत दाभोळकर, मधुरा वेलणकर, प्रिया मराठे, समिधा गुरु, निर्माते प्रसाद कांबळी व हर्षद तोंडवळकर यांच्यासह सिनेनाट्य, वैद्यकीय, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. या नाटकाचे खास आकर्षण म्हणजे दर प्रयोगाला रसिकांची मते जाणून घेत नाटकाचा उत्तरार्ध निश्चित केला जाणार आहे. यासाठी नाटकाच्या दुसऱ्या अंकाचे दोन स्वतंत्र भाग केले असून प्रेक्षकांच्या अधिक पसंतीची पावती मिळालेल्या पर्यायाची निवड दुसऱ्या अंकासाठी केली जाणार आहे. मराठी रंगभूमीवर रसिकांची मते जाणून घेत उत्तरार्ध उलगडणारे हे पहिलंच नाटकं ठरणार आहे. बंध-मुक्त या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. एक सर्जन, त्याची गुन्हेगारांच्या मानसशास्त्रात डॉक्टरेट असलेली बायको, एक वकील आणि एक मानवी हक्क चळवळीची लीडर या चौघांमध्ये घडून आलेली वैचारिक चर्चा म्हणजे बंध-मुक्त हे नाटक. यात कोणाभोवती ‘बंध’ आवळले जाणार आणि कोणाभोवतालचे पाश मोकळे होऊन तो ‘मुक्त’ होणार हे नाटक पहाताना उलगडेल. डॉ. अमोल कोल्हे, केतकी थत्ते, राजन शंकर बने, शंतनु मोघे, विवेक आपटे, पंढरी मेदगे, लतिका सावंत या सर्वच कलाकारांची जोरदार अदाकारी बंध-मुक्त मध्ये पहायला मिळणार आहे. डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव यांची निर्मिती असलेल्या बंध-मुक्त नाटकाची सहनिर्मिती डॉ. अजित देवल यांनी केली आहे. विवेक आपटे लिखित या नाटकाचे पार्श्वसंगीत राहुल रानडे यांनी दिलं आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची तर नेपथ्य राजन भिसे यांनी केलंय. वेगळ्या कथाविषयावरील हे नाटक नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल.

----------