Sign In New user? Start here.
 
 

“धिंगाणा” स्त्रियांचं महत्व पटवून देणारं हॉरर विनोदी नाटक

new
'dhingana' a horror Marathi dramaAdd Comment

स्त्रियांचं महत्व पटवून देणारे हॉरर विनोदी नाटक रंगभूमीवर येत असून शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. निर्माते भूपेंद्र दुबे व भरत पवार निर्मित आणि मिलिंद खानविलकर दिग्दर्शित या नाटकात आजच्या जमान्यातील सर्वसामान्य माणसाची मानसिकता अधोरेखित केली आहे.

आजचा समाज हा पुरुष प्रधान आहे व त्यामुळे गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मुलाच्या रूपाने संतान प्राप्ती व्हावी, मुलगी कुणालाच नको असते. आज मुलींनी आपल्या वैविध्यपूर्ण कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घातली असली तरी त्याचं आज कुणालाच कौतुक नाही. घरातील पुरुष काय पण वडीलधार्‍या स्त्रियांनाही वाटतं की आपल्या सुनेने मुलाला जन्म द्यावा. हयाच संकुचित मानसिकतेमुळे आज हजारो मुलींची गर्भातच हत्या केली जाते. एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्री असते हे सर्व मान्य असूनही हया वास्तवाकडे डोळेझाक केली जाते हयावरूनच आजचा समाज स्त्रियांच्या अस्तित्वाकडे गंभीरतेने पाहत नाही हे सिद्ध होते. अशावेळी मुलींचं आजच्या समाजात किती महत्व आणि गरज आहे हे “धिंगाणा” हया नाटकात विनोदी पद्धतीने दाखवण्याचा लेखक – दिग्दर्शकांनी प्रयत्न केला आहे.

“धिंगाणा” हया नाटकातील नायक हा गर्भश्रीमंत आहे. त्याचीही आपल्याला मुलगा व्हावा अशी तीव्र इच्छा असते. पण जेव्हा त्याला मुलगी होते तेव्हा तो पुर्णपणे कोसळतो आणि त्या दु:खात दारूच्या आहारी जातो आणि एक दिवस दारूच्या नशेत बायकोला मारझोड करतो, त्यात ती बेशुद्ध पडते. तो घाबरून डॉक्टरला बोलावण्यासाठी जातो आणि घरी येऊन पहातो तो बायको मुलीसह गायब झालेली असते. शोधाशोध करून कुठेही सापडत नाही. अचानक त्या घरी भूत दिसू लागतं. विचित्र घटना घडू लागतात. मग मांत्रिकाचा प्रवेश होतो. मात्र तो समस्या सोडविण्याच्या ऐवजी समस्या अधिक बिकट करतो. शेवटी पर्याय म्हणून हयातून सुटका करून घेण्यासाठी तो स्वत:ला संपवून घ्यायचं ठरवतो. पुढे काय धिंगाणा होतो ? हे प्रत्यक्ष रंगमंचावरच पाहणं उचित ठरेल. निखळ करमणूक आणि उत्तम संदेश देणारं रहस्यमय विनोदी नाटक धिंगाणा घालून प्रेक्षकांना खळखळून हसवतं.

“धिंगाणा” हया नाटकाचे लेखन भरत पवार यांनी केले असून संगीत अजित देशमुख व गणेश जोशी यांनी दिले आहे. नेपथ्य अशोक पालेकर, प्रकाश योजना वैभव गिड्ये, वेशभूषा श्वेता दुबे, रंगभूषा विनोद घोलप, प्रसिद्धी दीपक जाधव यांची असून चंद्रशेखर तारकर हे सुत्रधार आहेत. यात संदीप सोनावणे, सरिता मेनन, श्रद्धा कोचरेकर, भरत पवार, अजित देशमुख, गिरीश तांबे, ऐश्वर्या पाटील, अजिंक्य इसवलकर, सुरेखा जाधव, स्नेहल नादगावकर, अश्विनी गजाम, विकास चव्हाण, प्रिती जाटे यांच्या प्रमुख भुमिका आहेत.

 

----------