Sign In New user? Start here.

““घोळात घोळ”नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग “आनंदवन” ला अर्पण

 
 

““घोळात घोळ”नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग “आनंदवन” ला अर्पण

new
gholat ghol marathi dramaAdd Comment

एके काळी तुफान गाजलेले बबन प्रभू लिखित विनोदी नाटक “घोळात घोळ” हे नाटक सध्या रसिकांच्या प्रचंड गर्दीत सर्वत्र तुफान यश मिळवीत असून या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होत आहे. मल्हार प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते संतोष शिदम यांनी हया पुर्नजीवित नाटकाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे तर प्रमुख भुमिकेत अभिनेता संजय नार्वेकर आहे. सदर प्रयोग डॉ. विकास आमटे व डॉ. साधना आमटे यांच्या “आनंदवन” हया संस्थेला अर्पण करण्यात येणार असून या प्रसंगी मा. राज ठाकरे, डॉ. विकास आमटे व डॉ. साधना आमटे, अभिनेते महेश मांजरेकर, विक्रम गोखले यांच्यासहित अनेक नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विनोदी नाटकांच्या परंपरेत कै. बबन प्रभू यांचा सिंहाचा वाटा असून विनोदाचा बादशहा अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याच गाजलेल्या “घोळात घोळ” हया पुर्नजीवित नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच अल्पावधीतच हया नाटकाला शतक महोत्सवी प्रयोग करण्याचं भाग्य लाभलं. हया शंभराव्या प्रयोगाला मिळणारी रक्कम व कलाकारांचं मानधन असे मिळून एकत्र रक्कम डॉ. विकास आमटे व डॉ. साधना आमटे यांच्या “आनंदवन” हया संस्थेस अर्पण करण्यात येणार आहे.

“घोळात घोळ” हया नाटकातील नायक आनंद धैर्यवान एका शीतपेय कंपनीत सेल्स मॅनेजर आहे. अविवाहित असूनही नोकरीसाठी विवाहित आहे अशी त्याने बतावणी केली आहे. त्यात भर म्हणून बोनस मिळवण्यासाठी एका मुलाचा बाप असल्याचीही थाप मारली आहे. एके दिवशी कंपनीचा मालक अचानक त्याच्या घरी भेट देण्यासाठी येणार असल्याची त्याला खबर मिळते. आता नसलेली बायको आणि मुल आणायचं कुठून ? हयावर उपाय म्हणून तो त्याच्या एका मित्राला बायकोची व्यवस्था करायला सांगतो. पण होतं भलतचं. नसणारी बायको उभी करण्याच्या भानगडीत एकाच वेळी तीन बायका येतात आणि मग काय होतं ? हयाचे धमाल सादरीकरण कलाकारांच्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते. हया नाटकात संजय नार्वेकर यांच्यासोबत हेमंत ढोमे, विजय पटवर्धन, रसिका आगाशे, नेहा कुलकर्णी, आकांक्षा मेहेंदळे, किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

----------