Sign In New user? Start here.

प्रेक्षणीय व अंतकरणाला भिडणारी 'हमीदाबाईची कोठी'

`सुबक' निर्मित हर्बेरियम प्रकाशित `हमीदाबाईची कोठी' हे तिसरे नाटक निर्माते सुनील बर्वे..

   `सुबक' निर्मित हर्बेरियम प्रकाशित `हमीदाबाईची कोठी' हे तिसरे नाटक निर्माते सुनील बर्वे यांनी रंगमंचावर आणले आहे. `सूर्याची पिल्ले' आणि `लहानपण देगा देवा' या पूर्वीच्या दोन नाटकांप्रमाणेच या नाटकालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनिल बर्वे यांनी `डोंगर म्हतारा झाला' या नाटकानंतर वेगळ्या तऱहेचे कोठीवरच्या वातावरणाचं लिहिलेले हे नाटक विजया मेहता यांनी दिग्दर्शित केले होते. आता हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या पद्धतीने दिग्दर्शित केले असून ते प्रेक्षणीय तर झाले आहेच पण अंतकरणाला भिडणारे देखील झाले आहे. पूर्वीच्या लखनौ वगैरे ठिकाणी शास्त्रोक्त संगीत कोठीवर ऐकायला मिळायचे.

  त्यासाठी रसिक तेथे जाऊन पैसे फेकून आपली गाण्याची आवड पूर्ण करून घेत. काही काही बड्या मालदार रसिकांच्या कोठ्या ठरलेल्या असत. तेथे ते रसिक मालदार धनिक आपली संगीताची तहान भागवून घेत आणि कोठीतील गाणाऱया तवायफ देखील त्यांचे कान तृप्त करीत. अशीच एक कोठी होती हमीदाबाईची. ती उत्तम शास्त्रोक्त गायिका होती.तिचे गाणे ऐकण्यासाठी बडी बडी रसिक मंडळी तिच्या कोठीवर येत. वयामुळे आणि आजारपणामुळे तिचा आवाज गेला. त्यामुळे तिची आमदनी कमी झाली. पण कोठी तर चालूच ठेवली पाहिजे म्हणून सईदाला ती तयार करते. हमिदाबाईला शरीर विक्रय वर्ज आहे. पण आजूबाजूला शरीर विक्रय चालू झाला असून ती झळ आपल्या कोठीला लागू नये म्हणून ती आपल्या मुलीला-शब्बोला शिक्षणासाठी लांब ठेवते आणि सईदाला शास्त्रोक्त गाण्यासाठी तयार करते. पण परिस्थिती बदलते. लोकांची अभिरुची बदलते. त्यांना सवंग लोकप्रिय फिल्मी गाणी आणि नाच हवे असतात. शिवाय स्त्री शरीराचे आकर्षण असलेलेही तिकडे येतात. त्यामुळे तिच्या कोठीला उतरती कळा लागते. पहिल्या अंकाच्या अखेरीस हमिदाबाईचा अंत होतो आणि पुढे कोठीची जी काही वाताहत होते त्याचे दर्शन दुसऱया व तिसऱया अंकात प्रेक्षकांना घडते.सत्तार या वस्तीतला तरुण दलाल.

  गिऱहाईक आणून देण्याचें त्याचे काम. तो अनाथ, कचरा पेटीत टाकलेले पोर. त्याला या धंद्याशिवाय उपजीविकेचे साधन नाही. लुक्कादादा या वस्तीतला गुंड. दादागिरी करून तो वस्तीत हप्ते गोळा करून उपजीविका करीत असतो. पेंटर त्याच्या हाताखालचा नोकर. हमिदाबाई आणि खाँसाहेब अल्लाघरी घेल्यानंतर कोठीवर काही उत्पन्न मिळत नाही म्हणून सईदाला पोटासाठी शरीर विक्रय नाइलाजाने करावा लागतो. हमिदाबाईची मुलगी शब्बो. तिचा जन्म कोठीतला. पण वाढते हॉस्टेलात. तिला तिच्या आईने दलदलीच्या जीवनातून बाहेर काढण्यासाठी हॉस्टेलात ठेवले. हमिदाबाईची मुलाखत घेणारा बाबूजी तिच्या प्रेमात पडतो. तिला पत्र लिहितो. पण तिच्या पाक मोहब्बतीचे स्वप्न शेवटी मृगजळ ठरते. शब्बोला बाबूजी पाक मोहब्बतीचा पुतळा वाटला. पण तो भुसा भरलेले बुजगावण निघाला. तो आपल्या सुसंकृत घरात तिला लग्न करून आणू शकत नव्हता. तो पत्र लिहून तिला आपली परिस्थिती समजावून सांगतो. इतकेच नव्हे तर शब्बोला परिस्थितीनुसार लक्कुदादाशी लग्न करावे लागते तेव्हा स्टीलच्या भांड्यांचा आहेर घेऊन येतो. नंतर सुशिक्षित शब्बोच्या आयुष्यात माणूस येतो तो लक्कुदादा. तो म्हणजे रंडीबाजारातील लांडगा. हप्ते घेऊन त्याची सारी चैन फुकटची चाले.

  दारू गाळून हप्ते घेणे, भट्ट्या लावणे हा त्याचा धंदा. या लुक्काच्या नावाने शब्बो स्वत मंगळसूत्र ओवून घेते व गळ्यात बांधते, संरक्षणासाठी! त्याने तिच्याशी लग्न केले होते ते तिचं कोठीचं घबाड मिळविण्यासाठी. पण शब्बोला दुसरा इलाजच नसतो. शेवटी एक बाटली दारुला महाग झालेला लुक्का दारुसाठी त्याच्याकडे आलेल्या शेटजीला कोठीतील शब्बोकडे पाठवायला निघतो. पैसे घेऊन. पण मग अचानक धुराचा लोट येतो. कोठीला आग लागलेली असते. शब्बो कोठीसह आपल्याला जाळून घेते. नाटककार अनिल बर्वे यांनी या नाटकातील व्यक्तीरेखा, त्यावेळचा काळ अप्रतिम चितारला असून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्या कलाकारांकडून यथार्थपणे साकार करून घेतल्या आहेत. त्यातील कलावंतही तशाच ताकदीचे आहेत. नीना कुलकर्णी (हमीदाबाई), संजय नार्वेकर (लुक्कादादा), जितेंद्र जोशी, स्मिता तांबे, मंगेश सातपुते, विकास पाटील, शशांक केवले आणि मनवा नाईक या सर्व कलाकारांच्या भूमिका अप्रतिम आहेत. अशोक पत्की यांचे संगीत, प्रदीप मुळे यांचे नेपथ्य (प्रारंभीच आणि अखेरच्या अंकातलं), रवि-रसिक यांची प्रकाशयोजना, धनश्री पंडीत, कल्याणी साळुंखे यांचं पार्श्वगायन, संयोगिता भावे (वेशभूषा) इत्यादी नाटकाच्या यशाला हातभार लावणारे कलाकार-तंत्रज्ञ आहेत. अखेरच्या अंकातील (तिसऱया) नेपथ्य परिस्थितीचं सुयोग्य दर्शन घडविणारे आहे.

नाटक बातम्या