Sign In New user? Start here.

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारीत नाटक “ज्योती - सावित्री”

 
 

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारीत नाटक “ज्योती - सावित्री”

new
jyoti-savitri new marathi dramaAdd Comment

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्री समाजाला शिक्षणासाठी प्रवुत्त करणारे ध्येयवादी त्याचप्रमाणे समाजातून जातीभेदाची कीड समूळ नष्ट करण्यासाठी प्राणपणाने लढणारे सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांचा संपूर्ण जीवन संग्राम उलगडून दाखवणारे नवीन नाटक “ज्योती – सावित्री” लवकरच रंगभूमीवर येत असून त्याचा प्रारंभाचा प्रयोग ज्योतीराव फुले यांच्या १२४ व्या स्मृतिदिनी, शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी रात्रो ८ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे होणार आहे. स्वयंदिप हया नाट्यसंस्थेच्या बॅनरखाली निर्माते मंगेश पवार आणि कविता मोरवणकर ह्यांनी संयुक्तरीत्या हया नाटकाची निर्मिती व लेखन केले असून प्रमोद सुर्वे यांनी दिग्दर्शन केले आहे.

सामाजिक क्रांतीचे प्रणेते पितामह ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी विषमतावादी समाजव्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधात केलेला विद्रोह लोकांपर्यंत पोहोचावा तसेच त्यांनी दिलेला लढा ही एक चळवळ आहे, क्रांतीची दिशा आहे यादृष्टीने विचार करून हया नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्योतीराव फुले यांच्या सन १८४५ ते १८९० मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील जीवनाचा आणि सामाजिक कार्याचा आढावा हया नाटकात घेतला आहे. ही कथा वास्तव स्वरुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्योतीराव फुले यांच्या पुण्याच्या गंज पेठेतील वाड्यात काही ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण केले असून ते हया नाटकात दाखवण्यात येणार आहे. त्यात सत्यशोधक समाजाची स्थापनेची सभा, अस्पृश्यांसाठी खुला केलेला हौद, सावित्रीबाईना स्त्री शिक्षणासाठी होणारा विरोध अशा ठराविक घडामोडींचा समावेश आहे. हया नाटकात दोन गीतांचा समावेश केला असून त्यातील “सावित्री संगे ज्योती उभा” हे गीत मंगेश पवार यांनी लिहिले आहे तर ज्योतीराव फुले यांच्या लेखणीतून उतरलेले “विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली” हे दोहे यात गीतस्वरुपात यात सादर केले आहे.

“ज्योती – सावित्री” हया नाटकाचे सहाय्यक दिग्दर्शन व व्यवस्थापन अभिनेते राहुल पवार यांनी सांभाळले असून नेपथ्य सचिन गोताड, प्रकाश योजना शाम चव्हाण, रंगभूषा व वेशभूषा मिलिंद कोचरेकर यांची आहे. संगीतकार प्रितम गडकरी यांनी हया नाटकाला संगीत दिले असून गायक प्रवीण डोणे, सुनील कदम, महेश्वरी आढाव, रोहित राणे, संदीप वाडेकर यांनी पार्श्वगायन केले आहे. यात ज्योतीराव फुले यांची भूमिका विक्रांत वाडकर व सावित्रीमाईची भुमिका प्रतिक्षा साबळे यांनी केली असून त्यांची शिष्या मुक्ता साळवे हीची भूमिका मुक्ता पवार यांनी केली आहे. सोबत दीपक मोरे, देवेंद्र पवार, प्रशांत मनोरे, नितिन कांबळे, प्रवीण डोणे, विनोद शिंदे, परी जाधव, कृतिका नागवेकर यांच्या भूमिका आहेत.

स्वयंदिप ही संस्था गेली १२ वर्ष नाट्यक्षेत्रामध्ये कलाकार घडविण्याच्या उद्देश्याने कार्यरत असून यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय नाटके तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाटके सादर केली आहेत. भविष्यात ही संस्था नव – नवीन नाटकांची निर्मिती करून कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

----------