Sign In New user? Start here.

“अठ्ठाविसाव्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' मध्ये यंदा सेलिब्रेटी स्पर्धकांमध्ये चुरस"

 
 

“अठ्ठाविसाव्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' मध्ये यंदा सेलिब्रेटी स्पर्धकांमध्ये चुरस"

new
kalpna ek avishakar drama festivalAdd Comment

एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आयोजित कै. श्री. "मु.ब.यंदे पुरस्कृत" अठ्ठाविसाव्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत यंदा पुणे,मुंबई, कल्याण आणि नागपूर विभागातल्या एकांकिकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस आहे. यंदा या स्पर्धेचे २८ वे संयुक्त वर्ष आहे.

प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार राजन खान यांनी सुचवलेल्या " माणसं...!.” या कल्पनेवर आधारित पाच एकांकिकांची अंतिम फेरी येत्या शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजल्यापासून दादरच्या शिवाजी मंदिर इथे होईल.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी एकवीस सप्टेंबरला पार पडली,प्राथमिक फेरीत वीस संघांनी सहभाग नोंदवला,त्यापैकी अठरा एकांकिका सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण डॉ.तुळशी बेहरे नीळकंठ कदम,प्रमोद लिमये आणि राजन पाटील या मान्यवरांनी केले. माणूसपणाला भिडणारा अस्वस्थ लेखक म्हणून युवा पिढीत प्रसिद्ध असलेल्या राजन खान यांचा, कुठलीही प्रस्तावना नसलेला बहु आयामी ‘माणसं...!!’ हा विषय वरवरून सोप्पा वाटणारा पण सादर करायला कठीण असा असल्याची चर्चा सोशल मिडीयात सुरु होती त्याचाच प्रत्यय प्राथमिक फेरीत आला.

लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी, एक विषय देऊन त्यावर लेखकांना लिहायला लावणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात. 'जुळून येती रेशीमगाठी' चा ललित प्रभाकर, डोंबिवली फास्ट फेम संदेश जाधव, बॉम्बे टॉकीज फेम भाग्यश्री पाणे, मराठी रंगभूमीवरचे उगवते तारे शीतल कुलकर्णी आणि संदीप रेडकर हे यंदाच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या स्पर्धकांपैकी काही लोकप्रिय चेहरे आहेत.यंदा प्राथमिकमध्येही अनेक व्यावसायिक रंगकर्मी सहभागी झाले होते.

मितीचार कल्याणची अरुण कोलटरांच्या कवितांवर आधारित ललित प्रभाकर दिग्दर्शित ‘सर्पसत्र’, रंगभूमी –नागपूरची गौरव खोंड लिखित दिग्दर्शित ‘तिमिरात’, संक्रमण पुणेची यतीन माझरे लिखित ‘उडान’,सकस मुंबईची विशाल कदम लिखित सुमित पवार दिग्दर्शित ‘खेळ मांडियेला’ आणि प्रवेश-मुंबई ची भाग्यश्री पाणे लिखित संदेश जाधव दिग्दर्शित ‘ब्लॅकआऊट’ या पाचही वेगेवगेळ्या प्रकृतीच्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या असून एकांकिका वर्तुळात अनेक पारितोषिक प्राप्त असलेल्या या तगड्या संघांमुळे यंदाच्या कल्पना एकची अंतिम फेरी चुरशीची ठरेल असा अंदाज आहे.

 

----------