Sign In New user? Start here.
 
 

‘संगीतोपचाराने आजार बरे करणारे मनोरंजक नाटक “माझे आकाश वेगळे”

संगीत थेरपीने मानसिक व शारिरीक आजार बरे होतात, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. काही लोक हयाला अंधश्रद्धाही म्हणतील. पण असंख्य प्रख्यात डॉक्टरांनी हयाला दुजोरा दिला आहे आणि असंख्य रुग्णांनी त्याचा फायदाही घेतला आहे. पण हया संगीत थेरपीचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. किंबहुना संगीतोपचार म्हणजे काय ? हे बर्‍याच जणांना कळले नाही. हाच संगीतोपचाराचा विषय घेऊन अभिनेते विजय गोखले यांच्या ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ मुंबई या संस्थेने सुशीला एंटरटेनमेंट या संस्थेच्या सहयोगाने “माझे आकाश वेगळे” हे नाविन्यपूर्ण विषयावरील नाटक रंगभूमीवर सादर केले आहे. हया नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विजय गोखले यांनी केले आहे. “माझे आकाश वेगळे” यात एका ध्येयवेड्या माणसाची ध्येयवादी कहाणी सादर केली आहे. नोकरी – धंदा, सर्वस्वाचा त्याग करून ‘म्युझिक थेरपीने’ संगीतोपचाराने प्रेरित झालेल्या हेमंत साठे (डॉ. गिरीश ओक) यांची ही कहाणी आहे.

संगीतोपचाराद्वारे मानसिक व शारीरिक आजार बरे करून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या नि:स्वार्थी साठ्यांची ही कहाणी आहे. या जनसेवेच्या मार्गावर साठ्यांना केवळ लोकांच्या अविश्वासामुळे किती विरोध पत्करावा लागतो ? या उपचारांचा प्रसार व्हायला लागल्यावर ‘अंधश्रद्धा’ आहे या कारणाने तथाकथित जनजागृतीवाले कसे राजकारण खेळतात व विरोध करतात? केवळ ध्येयवाद मंजूर नसल्याने स्वत:च्या मुलाकडूनच साठ्यांना कौटुंबिक अडचणींना कसे सामोरे जावे लागते ? वडील आणि मुलगा यांच्या तणावपूर्ण संबंधात पत्नी अनुजा साठे (गौरी पाटील) कशी भरडली जाते ? या प्रवासात हेमंतचा जिवलग मित्र स्वामी (विजय गोखले) कसा मदतीला उभा रहातो ? ही थेरपीची ट्रीटमेंट देताना कोणते रोग संगीताच्या सहाय्याने कसे बरे होतात याची मिमांसा शास्त्रीय द्रुष्टिकोनातून साठे, पत्नी व मित्राच्या मदतीने कसे करतात ? बरे वाटणे आणि बरे होणे यातली दरी संगीतोपचार कसे बरे करतात हे साठे कोणत्या मार्गाने पटवून सांगतात ? संगीताचा वापर आज किती ठिकाणी कसा झाला आहे हे साठे कसे पटवून सांगतात ? साठ्यांच्या कार्याची दखल घेऊन शासन त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवते ? अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देत सादर होणारे नाटक ‘माझे आकाश वेगळे’!

अभिनेते विजय गोखले यांचा खुसखुशीत मैत्रीपूर्ण अभिनय, गौरी पाटील यांची सुरेल गायकी आणि मुख्य म्हणजे ध्येयवादी हेमंत साठे यांच्या भूमिकेद्वारे डॉ. गिरीश ओक यांचा अभिनय व रंगभूमीवर प्रथमच त्यांच्याकडून प्रत्यक्षात सादर होणारी गाणी ही या नाटकाची बलस्थाने आहेत. या नाटकाला नाविन्यपूर्ण उत्कंठावर्धक तसेच अभ्यासपूर्ण असे संगीत संगीताचे जाणकार श्री. लक्ष्मण पाटील यांनी दिले आहे. गौरी पाटील यांनी रचलेली रंगतदार गीते ही स्वाभाविकपणे प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारी आहेत.दर्जेदार लेखन, दिग्दर्शन, अभिनय, उडती गाणी, सिनेमेटिक गाणी, फ्यूझन असे विविध प्रकार असलेले हे ट्रॅक म्युझिकवरील बांधेसुद – शिस्तबद्ध तसेच रसिकमनाची पकड घेत मनोरंजनाबरोबर संस्कारही करणारे असे हे दर्जेदार नाटक आहे.