Sign In New user? Start here.

स्व. निर्माते सुधीर भट यांची अखेरची निर्मिती ‘बेईमान’

 
 

स्व.निर्माते सुधीर भट यांची अखेरची निर्मिती ‘बेईमान’

‘बेईमान’ मराठी रंगभूमीवरील प्रचंड गाजलेले नाटक. ‘बेईमान’मधली प्रभाकर पणशीकर आणि सतीश दुभाषी या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या जुगलबंदीची आठवण आजही पिढ्यांपिढ्या जागवली जाते. १९७३ साली प्रा. वसंत कानेटकर यांनी ‘बेकेट’ ह्या फ्रेंच नाटकाचा ‘बेईमान’ हा मराठी अनुवाद केला. या नाटकाचे निर्माते होते स्वत: प्रभाकर पणशीकर. पंतानी नाटकात चंदरची महत्वाची भूमिकाही निभावली. बेईमानचे ३६८ प्रचंड यशस्वी प्रयोग झाले. मुळ नाटकाचे दिग्दर्शक होते पुरूषोत्तम दारव्हेकर मास्तर, पंत आणि दुभाषी सरांबरोबर सुधा करमरकर आणि आशा काळे ही दोन दिग्गज नावेही या नाटकाशी संबधित होती.

इतकं गाजलेलं असूनही हे नाटक ४० वर्ष बंद होते, कारण हे नाटक पेलणे हेच मोठे आव्हान होते, जे शिवधनुष्य चाळीस वर्ष कोणाला पेलता आले नाही ते शिवधनुष्य पेलायचे ठरवले ते स्व.निर्माते सुधीर भट, गोपाल अलगेरी आणि सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी. ‘सुयोग’आता हे नाटक नवीन संचात आणि नवी रूपात पुनरूज्जीवित करत आहे. या नव्या ‘बेईमान’मध्ये शरद पोंक्षे, तुषार दळवी आणि शीतल क्षीरसागर मुख्य भूमिकेत आहेत. चंदरच्या भूमिकेत तुषार दळवी तर धनराजची भूमिका शरद पोंक्षे साकारणार आहेत. विवेक जोशी, अजय टिल्लू, प्रदीप प्रधान, सुरेश सरदेसाई, अरूण शेलार, वसंत इंगळे, विनम्र भाबल सहकलावंत आहेत. नेपथ्य-वेशभूषा प्रदीप मुळ्ये यांची असून संगीत अशोक पत्की आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे अशी श्रीमंत निर्मितीमूल्य या नाटकाला लाभली आहेत.

दिग्दर्शक मंगेश कदम यांनी अलीकडेच ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘वासूची सासू’ ही नाटकं यशस्वीपणे पुनरूज्जीवित केली आहेत. याबद्दल बोलताना मंगेश कदम म्हणाले कि, मी अलीकडे बरीच जुनी नाटकं सलगपणे वाचली होती. त्यामध्ये अनेक नाटकं मला विलक्षण आवडली होती. त्यातल्या अनेकांनी माझं लक्ष वेधून घेतलं. य नाटकांच्या निराळ्या फॉर्ममुळे ही नाटकं करण्याची खूप इच्छा होती.’

आपल्याकडे सोन्यासारखं जुनं आहे तर नाकारायचं कशाला ? अशी जुनी नाटकं नव्याने करणं म्हणजे, जुन्या काळाची एक रम्य मुशाफिरी आहे. त्यात प्रयोगालाही वाव आहे आणि त्यातून मिळणा-या आनंदालाही. ‘बेईमान’ सारखे नटांची अभिनयक्षमता आणि दिग्दर्शकाची प्रयोगशीलतापणाला लावणारे कानेटकरी नाटक करायला मिळणे खरेच भाग्याचे आहे. या निमित्ताने एक अजरामर कलाकृती मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा रसिकांना अनुभवता येईल. हेच या नाटकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.