Sign In New user? Start here.

"नाट्यसंपदा" राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी ११ जानेवारीला मुंबईत

 
 

"नाट्यसंपदा" राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी ११ जानेवारीला मुंबईत

"नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचा नाट्यजागार गेले बरेच दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर होतो आहे. गोवा, औरंगाबाद, नाशिक, सांगली, नागपूर, पुणे अशा विविध केंद्रांवरून सगळ्यात दर्जेदार एकांकिका निवडल्या गेल्या आहेत. राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक ११ जानेवारी २०१४ ला, सकाळी १० ते ५ या वेळेत यशवंत नाट्य संकुल, माटुंगा, मुंबई येथे होईल तर बक्षीस समारंभ संध्याकाळी ५ वाजता त्याच ठिकाणी संपन्न होईल. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, नियोजित संमेलनाध्यक्ष श्री. अरुण काकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. मोहन जोशी, व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनाचे सचिव श्री. आशुतोष घोरपडे आदी मान्यवर या सोहळ्याला सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

महाराष्ट्रातील सगळ्याच केंद्रांवर उदंड प्रतिसाद मिळाल्याने अंतिम फेरीतमधील महाविद्यालयांमधील स्पर्धेची चुरस भलतीच रंगणार आहे. एकापेक्षा एक सरस अशा कलाकृती सादर करण्याचा प्रत्येकचा मानस आहे. "नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेत ‘नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर फिरता चषक’ कोणाला मिळणार हे या सोहळ्याचं आकर्षण असेल तर त्याचबरोबर पहिल्या तीन एकांकिकांसाठी अनुक्रमे रु. ५०,०००/-, रु. ३५,०००/- आणि रु. २०,०००/- अशी रोख बक्षीसे व अनेक वैयक्तिक पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे ही बक्षिसे देखील यावेळी जाहीर केली जातील.

इंडियन ऑईल, एलआयसी, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एनकेजीएसबी बँक, ओ एन जी सी हे नाट्यसंपदाच्या या उपक्रमाचे प्रायोजक असून सई परांजपे, रोहिणी हत्तंगडी, प्रदीप मुळ्ये, भरत दाभोळकर, डॉ. गिरीश ओक, विक्रम भागवत आणि निशिकांत कामत हे मान्यवर मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.