Sign In New user? Start here.
 
 

नाट्यसंपदा" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचा समारोप संपन्न!

"नाट्यसंपदा" या नाट्यसंस्थेने सुरु केलेल्या, गेले तीन महिने चालू असलेल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचा समारोप शनिवार दिनांक ११ जानेवारीला, यशवंत नाट्य संकुल येथे पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभर विविध केंद्रांवरून निवडून आलेल्या मराठी एकांकिका यावेळी अंतिम फेरीत सादर करण्यात आल्या. गोवा, औरंगाबाद, नाशिक, नागूर, सांगली, कणकवली, पुणे, मुंबई अशा प्रत्येक केंद्रावर प्राथमिक फेरी घेण्यात आली तर उपांत्य फेरीसाठी २४ मराठी एकांकिका निवडण्यात आल्या. अंतिम फेरीसाठी एकूण सहा महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धेत होत्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क न आकारता, तिकीट विक्रीच्या माध्यमातून स्पर्धकांनाच त्यांच्या एकांकिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची अभिनव संकल्पना राबवण्यात आली आणि या अभिनव उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

"नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा २०१३ च्या अंतिम फेरीसाठी सई परांजपे, डॉ. गिरीश ओक, विक्रम भागवत, निशिकांत कामत, रोहिणी हत्तंगडी, प्रदीप मुळ्ये यांनी परीक्षक म्हणून काम पहिलं. या सोहळ्याला उपस्थित नाट्यसंपदाचे दाजीशास्त्री पणशीकर यांनी सर्व कलाकारांना मेहनतीबद्दल आणि आयोजकांना उत्तम संयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या तर या उपक्रम पुढील पाच वर्ष चालू ठेवण्याची घोषणा केली. मराठी रंगभूमी पुढे जाते आहे, महाविद्यालयीन स्पर्धांमुळे त्याला व्यापक दर्जा दिलाय. उद्याची रंगभूमी ही तरुण मुलांच्या हातात आहे. ज्यांना कुणाला बक्षिसं मिळाली नाहीत त्यांनी पुढल्या वर्षी जोमानं तयारी करा, अशा शब्दात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री. अरुण काकडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्ष श्री. मोहन आगाशे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत, जास्तीत जास्त महाविद्यालयांनी यात भाग घ्यावा असे आवाहन केले. सर्व परीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. गिरीश ओक यांनी सर्वांना नाट्यसंपदाशी असलेलं त्यांचं घट्ट नातं याविषयी सांगताना कलेच्या विविध माध्यमाविषयी मोलाची माहिती दिली. तसेच नटश्रेष्ट प्रभाकर पणशीकर यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेला हे सांगत आपले गमतीशीर अनुभव यावेळी कथन केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सचिव श्री. दीपक करंजीकर आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव श्री. आशुतोष घोरपडे यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत नाट्यसंपदा संस्थेला यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप दळवी, फैय्याज, चिन्मयी सुमित, गणेश पंडित, अंबर हडप, प्रसाद कांबळी, अजित भुरे असे अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

"नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा २०१३ सर्वोत्तम एकांकिका "अश्वत्थामा हतोहत:" डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग) ही ठरली तर दुसरा क्रमांक डे- केअर सेंटर महाविद्यालय, नाशिक "रेनमेकर" यांनी पटकावला आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय, कर्वे रस्ता, पुणे यांच्या "चॉकलेटचा बंगला" या एकांकिकेला तिसरा क्रमांक मिळाला. अजिंक्य गोखले (चॉकलेटचा बंगला) हा सर्वोउत्कृष्ट दिग्दर्शक तर मानस लयाळ (चॉकलेटचा बंगला) सर्वोउत्कृष्ट लेखक आणि हृषिकेश वांबूरकर (अश्वत्थामा हतोहत:) सर्वोउत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ठरला तर सर्वोउत्कृष्ट अभिनेत्री तन्वी कुलकर्णी (चॉकलेटचा बंगला), सर्वोउत्कृष्ट अभिनेता सिद्धार्थ बोडके (रेनमेकर) यांनी पारितोषिके पटकावली.

अनंत पणशीकर, सुहास सावरकर, चंद्रकांत मेहेंदळे आणि दीपक अष्टीवकर या चार आयोजकांच्या अथक परिश्रमाने ९ डिसेंबरला सुरु झालेला नाट्यसंपदेचा मराठी एकांकिका स्पर्धेच हा नाट्यजागर महाविद्यालयातील या उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच ठरला. या संपूर्ण उपक्रमात इंडियन ऑईल, एलआयसी, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एनकेजीएसबी बँक या प्रायोजकांचा उदंड प्रतिसादही लाभला. "नाट्यसंपदा सुवर्ण जयंती पुरस्कार" राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा २०१३ च्या अंतिम फेरीत निवडलेल्या एकांकिका या नाट्यसंपदेच्या संकेत स्थळावर बघायला लवकरच उपलब्ध होणार आहेत. तसेच अंतिम फेरीतील कलाकारांना घेऊन लवकरच रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक नाट्यसंपदा सादर करेल अशी घोषणा नाट्यसंपदेचे अनंत पणशीकर यांनी यावेळी केली.