Sign In New user? Start here.

‘सोबत संगत’चं दिमाखदार पदार्पण

 
 

‘सोबत संगत’चं दिमाखदार पदार्पण

  मराठी रंगभूमीवर जुन्या, गाजलेल्या नाटकांच्या पुनरुज्जीवनाचा सिलसिला कायम असतानाच रंगभूमीवर अनेक धाडसी प्रयोगही होताना दिसत आहेत. नवे रंगकर्मी नवी ऊर्जा घेऊन येत आहेत, तर काही जुनेजाणतेही नवे प्रयोग करून बघण्याचं धाडस दाखवत आहेत. यामुळेच मराठी रंगभूमी देशभरात सर्वाधिक समृद्ध समजली जाते. या समृद्धीत मोलाची भर टाकणारं ‘सोबत संगत’ हे नवं, आशयघन नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. अलीकडेच या नाटकाचा शुभारंभ दुबईत झाला.

चार वेगवेगळ्या गोष्टींचं हे नाटक आहे. चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर सध्या हा ट्रेंड जोरात आहे. मराठी रंगभूमीवरही यापूर्वी असे प्रयोग झालेत. पण एकच संकल्पना घेऊन तिच्यावर चार वेगळ्या कथा रचायच्या आणि त्यांची गुंफण एकाच नाटकात खुबीने करायची, हे आव्हान यापूर्वी क्वचितच कुणी पेललंय. ‘सोबत संगत’मध्ये एकमेकांना दिलेली जिवाभावाची साथ, मैत्र, नातं, या संकल्पनेवर आधारित चार विलक्षण जिव्हाळ्याच्या कथा बघायला मिळतील.

‘ऐश्वर्या आर्ट्स एन थिएटर्स’ आणि ‘वेदांत मीडिया अँड एन्टरटेनमेंट सहयोग’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाद्वारे संपदा जोगळेकर-कुलकर्णी लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत आहे. ऐश्वर्या आणि संपदा यांच्यासह अविनाश नारकर यात प्रमुख भूमिकेत आहेत. रंगभूमीवर सध्या पुनरुज्जीवित नाटकांचा ट्रेंड असताना आणि अनेक प्रथितयश दिग्दर्शकही पुन्हा पुन्हा जुन्याच नाटकांकडे वळत असताना ऐश्वर्या आणि अविनाश यांनी एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं आहे. इतकंच नव्हे तर कुठलाही पूर्वानुभव नसताना संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिच्या संहितेवर विश्वास ठेवून तिला दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याचीही संधी दिली आहे.

याविषयी निर्मात्या ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “पिझ्झ्याचे कसे आपण तुकडे करून खातो, तसं या नाटकाचं आहे. पिझ्झा एक पण तुकडे चार, तसंच ‘सोबत संगत’च्या गोष्टी चार. तुकड्यातुकड्यातच त्याची खुमारी आहे. फक्त या पिझ्झ्याचा बेस अस्सल मराठमोळ्या भाकरीचा आहे.”

एखाद्या नव्याकोऱ्या नाटकाचा परदेशी शुभारंभ होण्याचा मानही या नाटकाने मिळवला आहे. “साधारणपणे गाजलेल्या नाटकांना परदेशातून प्रयोगासाठी निमंत्रणे येतात. पण या नाटकाची संहिता वाचून, तसेच तालमी पाहून नाटक आवडल्याने नाटकाचा शुभारंभाचा प्रयोगच दुबईत करण्यासाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं,” असं संपदाने सांगितलं. आता १८ ऑक्टोबरपासून या नाटकाचे भारतातले प्रयोग सुरू झाले आहेत.