Sign In New user? Start here.

देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रणित कुलकर्णी यांचा रंगभूमीवरील आगळा प्रयोग ‘सुरक्षित अंतर ठेवा’!

 
 

देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रणित कुलकर्णी यांचा रंगभूमीवरील आगळा प्रयोग ‘सुरक्षित अंतर ठेवा’!

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट सृष्टीला काही प्रमाणात घरघर लागल्याचे चित्र दिसत होते. अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रसिद्ध होत असूनही मराठी प्रेक्षकांनी मात्र चित्रपटगृहाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत होते. परंतू मराठी नाट्यसृष्टीला मात्र नोटाबंदीचा तितकासा फटका बसल्याचे जाणवले नाही. पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नाटकांना ‘हाऊसफुल’ प्रतिसाद मिळत आहे, यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे मराठी रंगभूमीकडून घेतले जाणारे कष्ट आणि नवनवीन प्रयोग करण्याचा ध्यास. असाच प्रेक्षकांना न्यायाधीशाच्या खुर्चीत बसवणारा नवीन प्रयोग रविवार, १६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे आणि तो म्हणजे ’सुरक्षित अंतर ठेवा’.

‘देउळ बंद’ या यशस्वी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक असलेले श्री. प्रणित कुलकर्णी ’सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांच्या पुनर्भेटीला येत आहेत. नाटकाची संकल्पना प्रणित कुलकर्णी यांची असून लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन देखील त्यांनीच केले आहे.

आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ जमान्यात ‘अरेंज मॅरेज’ विरुद्ध ‘लव्ह मॅरेज’ असा खटला जर भरला गेला तर काय होईल याचे उत्कंठावर्धक सादरीकरण या नाटकातून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे एक साचेबद्ध नाटक नसून नाटकाच्या फॉर्म मध्ये, सेटमध्ये वेगळेपण जपण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य यांचा मनोरंजनात्मक पद्धतीने समावेश केला गेला आहे. नाटकामधील गाण्यांमध्ये देखील कमालीचे वैविध्य असून जुनी गाणी, काही विडंबनात्मक गाणी तसेच एक लावणी यांचे एक भन्नाट कॉम्बिनेशनच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गाण्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण गायक करणार आहेत.

या नाटकाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाच्या मध्यंतरामध्ये आणि शेवटापूर्वी रसिकांना नाटकात उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करायचे आहे. नाटकाच्या शेवटी या मतांची बेरीज करून अंतिम निर्णय सांगण्यात येईल. नाटकामध्ये पुष्कर श्रोत्री, माधवी निमकर, निखील राऊत, सचिन देशपांडे, तन्वी पालव संदीप जंगम, सीमा घोगळे हे कलाकार आणि शुभांगी मुळे, गौरव बोरसे हे गायक सहभागी असणार आहेत. जय मल्हार प्रकाशित, अष्टविनायक प्रकाशित असणारे हे नाटक शुभांगी मुळे आणि नितीन मुळे यांच्यातर्फे सादर होणार आहे. गीतलेखन स्वतः प्रणित कुलकर्णी यांनी केले असून संगीत रोहित नागभिडे यांचे आहे. नाटकाचा ‘टेक्नो सेट’ सुमित पाटील यांनी साकारला आहे.

----------