Sign In New user? Start here.

दोलायमान परिस्थितीचं प्रत्यय देणारं रहस्यमय नाटक “तळ्यात मळ्यात”

 
 

दोलायमान परिस्थितीचं प्रत्यय देणारं रहस्यमय नाटक “तळ्यात मळ्यात”

प्रत्येक जण आपल्या उराशी कुठलं ना कुठलं रहस्य बाळगून असतो, आणि ते तो लोकांपासून नकळत किंवा जाणीवपूर्वक लपवत असतो. त्या रहस्यामुळे मनाची तळ्यात मळ्यात होणारी अवस्था प्रत्येकानेच अनुभवलेली असते. त्याच दोलायमान परिस्थितीचं प्रत्यय देणारं अभिजीत गुरु लिखित आणि दिग्दर्शित नवीन नाटक “तळ्यात मळ्यात” लवकरच रंगभूमीवर येत आहे. “परंपरा डॉट कॉम” व “मी आणि ती” हया नाटकाच्या यशानंतर निर्माते शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे आणि संतोष भरत काणेकर यांनी मॅजिक अवर क्रियेशन, आध्या क्रियेशन आणि अथर्व थिएटर हया नाट्यसंस्थेच्या बॅनरखाली हया नाटकाची निर्मिती केली आहे.

“तळ्यात मळ्यात” नाटकाची कथा ही जगण्याच्या धडपडीत हरवलेल्या एका सर्वसामान्य नवरा बायकोची आहे. ती कथा निरनिराळी रहस्यमय वळण घेत एका वेगळ्याच शेवटापर्यंत येऊन पोहचते. आयुष्याचं रहस्य आणि हया रहस्याची गम्मत सांगण्यार्‍या हया नाटकाचा रहस्यमय शेवट हेच हया नाटकाचं मोठं आकर्षण ठरणार आहे. असा हया नाटकातल्या निर्माते – दिग्दर्शक, कलावंत तसेच तंत्रज्ञांचा दावा आहे. ‘अवघाची संसार’, ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’, ‘लज्जा’, ‘माझीया माहेरा’ अश्या अनेक यशस्वी मालिकांचं लेखन केलेल्या अभिजीत गुरु हयांचं लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिलंच व्यावसायिक नाटक आहे.

ज्यात त्यांच्याबरोबर निरनिराळया मालिका, चित्रपट आणि ‘गेट वेल सून’ हया नुकत्याच गाजलेल्या नाटकात काम केलेल्या समिधा गुरूही असणार आहेत. तसेच मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता संत हया नाटकात आहे. राजू बावडेकर आणि चिन्मय पाटस्कर हे कलाकारही हया नाटकात त्यांच्या साथीला असणार आहेत. हया नाटकाचे संगीत शिवदर्शन साबळे यांचे असून नेपथ्य विजय कोळवणकर, प्रकाशयोजना भुषण देसाई, वेशभूषा सचिन लोवलेकर, रंगभूषा शरद सावंत, स्थिरचित्रण शिवदर्शन साबळे व सुशील गाडे यांचे आहे. आशिष कांबळी हे निर्मिती प्रमुख असून संजय माने, रुचिता शेलार व श्रवण विचारे यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली आहे. तर सुत्रधार अजित सरबळकर हे आहेत. शाहीर साबळे ह्यांच्या आशीर्वादाने शिवदर्शन साबळेंच्या हया नवीन नाट्य निर्मितीला प्रेक्षकांचा निश्चितच प्रतिसाद लाभेल अशी आशा आहे.

----------