Sign In New user? Start here.

‘टॅग’तर्फे अनवट नाटकांची मेजवानी

 
 

‘टॅग’तर्फे अनवट नाटकांची मेजवानी

(Thane Art Guild presents marathi drama festival)ठाणेकर रसिकांना अनवट नाटकांचा अविस्मरणीय नजराणा देणा-या ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) या संस्थेने येत्या दोन मे रोजी दोन दर्जेदार, पुरस्कार विजेत्या दीर्घांकाच्या विशेष खेळाचे आयोजन केले आहे. अनंत सामंत यांच्या कथेवर आधारित हृषिकेश कोळी लिखित ‘ओश्तोरिज’ आणि गिरीश दातार लिखित ‘पुनर्जन्म’ या दोन दीर्घांकांचा आनंद नाट्यरसिकांना घेता येणार आहे.अतिशय अनवट पण देखणी बांधणी आणि तरुण, धडपड्या रंगकर्मींची अचाट करणारी ऊर्जा हे या दोन्ही दीर्घांकांचं आणखी एक वैशिष्ट्य. या दोन्ही दीर्घांकांचं दिग्दर्शन पुरस्कार विजेता तरुण दिग्दर्शक अमोल भोर याने केले आहे.रसिकांना वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेता यावा आणि आपल्यातील छुप्या कलाकाराला वाव देता यावा, चांगली अभिरुची घडवावी, यासाठी ठाण्यातील कलावंतांनी एकत्र येऊन ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) या संस्थेची स्थापना केली आहे.

रवी जाधव, उदय सबनीस, विजू माने, मंगेश देसाई, गिरीश मोहिते, संपदा जोगळेकर-कुलकर्णी आदींच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘टॅग’ने गेल्या दीड वर्षांत अनेक सकस उपक्रमांची भेट ठाणेकरांना दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची ‘शूट अ शॅार्ट’ ही चार दिवसांची कार्यशाळा, मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या संपूर्ण साहित्यावर आधारित ‘मराठी मातीचा टिळा’ हा अभूतपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम, जगभरात गाजलेल्या प्रायोगिक नाटकांना ठाणेकरांच्या दारात आणणारा ‘नाट्यगंध’ हा उपक्रम, जागतिक सिनेमाची कवाडे उघडून चित्रभाषेची अपूर्व समज करून देतानाच प्रगल्भ प्रेक्षक घडवणारा ‘चित्रगंध’ हा उपक्रम असे अनेक उपक्रम ‘टॅग’ सातत्याने राबवत आहे.या उपक्रमांसाठी लागणा-या निधीच्या उभारणीसाठीच ‘ओश्तोरिज’ आणि ‘पुनर्जन्म’ या दोन दीर्घांकांच्या सादरीकरणाचे आयोजन करतानाही टॅगने आपल्या मूळ उद्दिष्टापासून फारकत घेतलेली नाही.

<pकलाकृती रसिकांसमोर आणतानाच तरुण, धडपड्या रंगकर्मींना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ‘टॅग’ने कायम ठेवले आहे, असे संस्थेचे सहसचिव शशी करंदिकर यांनी सांगितले.येत्या २ मे रोजी रात्री साडे आठ वाजता गडकरी रंगायतन येथे या दोन्ही दीर्घांकांचे सादरीकरण होणार आहे. शिल्लक तिकीट विक्री २९ एप्रिलपासून नाट्यगृहावर सुरू होणार असून विविध नाट्य प्रशिक्षण शिबिरार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था, कलाप्रेमी संघटना, महिला मंडळे यांना ग्रुप बुकिंगसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.