Sign In New user? Start here.

‘टॉस’ करून प्रेक्षक ठरवणार हे खरे की ते खरे!

 
 

‘टॉस’ करून प्रेक्षक ठरवणार हे खरे की ते खरे!

मराठी रंगभूमी ही नेहमीच सकस आशय आणि कल्पक प्रयोगांसाठी ओळखली जाते. त्यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि जगात मराठी रंगभूमीचा दबदबा आहे. केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी म्हणूनच नव्हे, तर कलेच्या विविध शक्यतांची चाचपणी करण्यासाठी, स्वत:चा कस जोखण्यासाठी मनोरंजनाची कास न सोडताही रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असतात. कला आणि रंजकता यांचा अपूर्व संगम मराठी रंगभूमीवर दिसून येतो. हीच अनोखी सांगड घातलेलं ‘टॉस’ हे नवंकोरं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. ‘दिशा थिएटर्स’ व ‘मल्हार आर्ट्स’ या नाट्यसंस्थेच्या निर्मात्या सौ. पद्मजा नलावडे व सौ. उषा झोडगे निर्मित या नाटकाचे लेखक प्रवीण शांताराम असून दिग्दर्शन सुदेश म्हशीलकर यांनी केलं आहे. ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

एका सुखवस्तू कुटुंबात आलेलं वादळ हलक्याफुलक्या पद्धतीने हे नाटक मांडतं. मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात किंवा एकत्र कुटुंबात समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला कुटुंब एकत्रपणे सामोरं जात असतं आणि त्या परिस्थितीवर मात करत असतं. पण कधीतरी अशी एखादी घटना घडते की, त्यावेळी नेमकं काय करावं, हे कोणालाच समजत नाही. अशा वेळी प्रत्येक जण आपापल्या परीने परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न करतो आणि नात्यांमध्ये ताणेबाणे निर्माण होतात. याचंच चित्रण ‘टॉस’मध्ये हलक्याफुलक्या पद्धतीने बघायला मिळणार आहे.

मराठी रंगभूमीवर श्रेयनामावलीत ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या घोषणेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. आजही अनेक कलावंत श्रेयनामावलीत या ‘...आणि’साठी झगडत असतात. ‘टॉस’मध्ये मात्र हा मान चक्क एका रेडिओला मिळाला आहे. विघ्नेश जोशी, संपदा जोगळेकर कुलकर्णी, सुनील गोडबोले, पूजा अजिंक्य, तेजस डोंगरे, रेणुका भिडे अशी लोकप्रिय कलावंतांची फौज असताना श्रेयनामावलीत रेडिओला ‘... आणि’ नंतरचं विशेष स्थान देण्यात आलं आहे.

यासंदर्भात नाटकाचे दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर म्हणाले की, या नाटकात रेडिओ ही केवळ प्रॉपर्टी म्हणून न येता एक पात्र म्हणून येतं. अनेक प्रसंगात रेडिओची भूमिका महत्त्वाची आहे. कथेला पुढे नेण्यासाठीही रेडिओ कारणीभूत ठरतो.

या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात प्रेक्षकांना दोन शेवट दिसणार आहेत. त्यासंदर्भात म्हशीलकर म्हणाले की, नाणं टॉससाठी हवेत उडवल्यानंतर नेमकी कुठली बाजू समोर पडणार आहे, हे आपल्याला माहिती नसतं. आणि एक बाजू समोर पडली तरी तिची न दिसणारी बाजू मागच्या बाजूला असतेच. या नाटकाची कथाही अशीच आहे. तिच्या शेवटाबाबत अनेक शक्यता निर्माण होतात. मग प्रेक्षकांना केवळ एकच शेवट दाखवून तोच त्यांनी खरा मानावा असा आग्रह आपण का धरायचा? त्यामुळे नाटकात दोन शेवट दाखवण्यात येणार असून प्रत्येकाने आपापल्या जीवनानुभवानुसार, दृष्टिकोनानुसार जो पटेल तो शेवट स्वीकारावा.

----------