Sign In New user? Start here.

प्रेक्षकांची लाडकी ठरली प्रणव रावराणेची सासू

 
 

प्रेक्षकांची लाडकी ठरली प्रणव रावराणेची सासू

‘आशय प्रॉडक्शन या नाट्यसंस्थेचे प्रदीप दळवी लिखित मंगेश कदम दिग्दर्शित ‘वासूची सासू’ हे नाटक सध्या रंगभूमीवर तुफान लोकप्रिय ठरते आहे.विशेष म्हणजे या नाटकातली लाडकी ,नखरेल सासू सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

टायमिंग सेन्सचं अफलातून दर्शन घडवत विनोदाचे हास्यस्फोट घडवणारा प्रणव रावराणे या अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे. ‘दुनियादारी' चित्रपटात सुनील भोसले ऊर्फ सॉरी भोसले या व्यक्तीरेखेने स्टार स्टेट्स मिळालेल्या प्रणवने एक सर्वस्वी वेगळी भूमिका स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्याचे धाडस यशस्वी झालेले आहे,हे प्रेक्षक पसंतीवरून लक्षात येते.पण हा प्रयत्न सोपा नव्हता. प्रणव म्हणतो ‘ ‘अण्णा’ ही ‘वासूची सासू’ या नाटकातील भूमिका करण्याविषयी मला विचारणा झाली, तेव्हा मी साशंक होतो. कारण एकतर नाटकातील ‘अण्णा’ हे पात्र स्त्री आणि पुरुष अशा दुहेरी भूमिका साकारतं. दुसरं म्हणजे माङया आणि अण्णांच्या वायात जवळजवळ 35 ते 40 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे मला अण्णांचं बेअरिंग जमेल की नाही अशा द्विधा मन:स्थितीत असताना नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी मला खूपच प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळेच मी ‘अण्णा’ आणि ‘सासू’ अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी लीलया करू शकलो.

नाटकाची तालीम झाल्यावर ‘सासू’च्या भूमिकेसाठी माझी रंगीत तालीम घेण्यात आली. आधी पूर्ण हातापायांचं वॅक्सिंग केलं. माझ्या भुवया आ ओबडधोबड होत्या,नाकाच्यामध्ये जुळलेल्या होत्या. त्यामुळे त्याही नीट करण्यात आल्या. मग नऊवारी साडीचा माङयावर प्रयोग करण्यात आल्या. मला नऊवारी छान दिसली. त्यानंतर रंगीत तालमीच्या वेळेस साडी नेसून प्रयोग केला. तेव्हा तर बाईच्या वेशातला कलाकार पुरुष कलाकार आहे, याची कुणालाही शंका आली नाही, इतकी भूमिका बेमालूम झाली होती. आता प्रत्यक्ष प्रयोग लागले आहेत,तेव्हाही कुणाला नाटकात बाईची भूमिका करणारा कलाकार पुरुष कलाकार आहे, असं वाटत नाही. प्रेक्षकांचा नाटकाला प्रतिसादही उदंड आहे. नाटकातील सासू वठवताना माझी जरा धांदलच उडते. कधी पदर सावरताना आणि स्त्रियांसारखं लचकम मुरडत चालताना नाकीनऊ येतात.पण प्रेक्षक प्रतिसादामुळे आता माझ्यातली सासू सुद्धा नाटक एंजॉय करायला लागली आहे.

या पूर्वी ‘वासूची सासू’मध्ये ‘अण्णा’ आणि ‘वासूची सासू’ ही भूमिका दिलीप प्रभावळकरांसारख्या दिग्गज अभिनेत्याने करून नाटक तुफान गाजवलं होतं. त्यामुळे मी केलेल्या कामाची आणि प्रभावळकरांच्या कामाची तुलना होणं स्वाभाविक आहे, करणारे ती करतात, पण मी त्यांना इतकंच सांगेन की, दिलीप प्रभावळकरांनी वठलेल्या नाटकातील दोन्ही भूमिका आणि मी करत असलेल्या त्याच नाटकातील दोन्ही भूमिका यात जमीनआस्मानाचा फरक आहे.त्यांनी सदर केलेले ग्रेटच होते, तुलना नको,माझ्या अभिनयाची शैली वेगळी आहे आणि सुदैवाने ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, एकेकाळी छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या माझ्यासारख्या कलाकाराला घेऊन मुख्य भूमिका असेली नाटकं रंगभूमीवर येत आहेत. त्यामुळे काम चोख करण्याकडे माझा भर आहे, आपणच आपले शंभर टक्के योगदान दिले तर निर्माता –दिग्दर्शकांचा हुरूप वाढून चांगला अभिनय करू इच्छिणा:या माङयासारख्या कित्येक नवोदित कलाकारांना घेऊन चांगल्या चांगल्या कलाकृती छोट्या तसंच मोठ्या पडद्यावर आणि रंगभूमीवर येतील, याची खात्री आहे. त्यामुळे सध्या मी उत्तम काम करणे,हेच एकमेव लक्ष्य समोर ठेवले आहे, ‘वासूची सासू’च्या निमित्ताने मला त्याची प्रेक्षक पसंतीच्या रूपाने पावती मिळते आहे.