Sign In New user? Start here.

मिथिलेश पाटणकरमिथिलेश पाटणकर

चांगले संगीतकार आणि शिक्षक बाबा


खरंतर मी खूप लकी आहे की, असे बाबा मला मिळाले. ते संगीतकार असल्याने लहानपणापासून जे जे शक्य होतं ते ते त्यांनी मला शिकवले. जी वेगवेगळी वाद्ये ते वाजवायचे ती सर्व वाद्ये त्यांनी मला शिकवली. सगळ्या वाद्यांची त्यांच्यामुळेच मला ओळख झाली. त्यांनी सर्वात आधी मला तबला आणि पेटी शिकवली. मला अजून ही आठवतं की, प्रत्येक सुट्टीत ते माझ्या हाती एक नवीन वाद्य द्यायचे आणि ते वाजवायला शिकवायचे. त्यामुळेच ११ वी, १२ वी पर्यंत सर्वच वाद्य मला वाजवता आली. वाद्यांची अंग जाणून घेता आली. खरंतर मी लहान असतांनाच त्यांनी माझी संगीताची ओढ हेरली होती. मी पुढे जाऊन संगीतकार होणार हेही त्यांच्या लक्षात आलं असेल कदाचित... आणि त्यामुळेच त्यांनी सर्व वाटा माझ्यासाठी मोकळ्या करून दिल्या होत्या. ते एक उत्तम संगीतकार तर आहेच सोबतच एक उत्तम शिक्षक सुद्धा आहेत.

बाबा स्वत: संगीतकार असल्याने त्यांच्याबरोबर अनेक मैफली, रेकॉर्डींग मला जवळून पाहता आल्यात. रविंद्र साठे, उत्तरा केळकर, सुरेश वाडकर असे कितीतरी प्रसिद्ध गायक मला जवळून अनुभवता आले. अनेक गुणी वादक म्हणजे आप्पा वढावकर, बोरकर, ज्ञानेश देव, केदार पंडीत, माधव पवार असे अनेक वादक सुद्धा मला जवळून पाहता आले. हे सर्व लोक वाजवतांना ते नेमकं काय करतात, स्टेज शो साठी कसं वाजवतात, ह्या सर्व गोष्टींचं मी निरीक्षण करू शकलो. याचा मला म्युझिक अॅतरेंजर म्हणून काम करताना खूप फायदा झाला. म्हणजे त्यांच्यामुळे मी इतक्या लवकर म्युझिक शिकलो की, मी सेकंड इअरला असतानाच एका फुल फ्लेज मुव्हीला संगीत देऊ शकलो. पण दुर्देवाने तो सिनेमा प्रकाशित झाला नाही. मात्र पहिला चित्रपट मला खूप लवकर करायला मिळाला. तेव्हा मी १९ वर्षाचा असेल.

मिस्टर परफेक्शनीस्ट मिथिलेश... - विश्वास पाटणकर

" मिथिलेशने लहानपणापासूनच म्युझिकमध्ये त्याचा स्पार्क, त्याची चुणूक दाखवली होती. सतत आमच्याकडे रेकॉर्डीस्ट, संगीतकार यांची ये जा होती. मी स्वत: संगीतकार असल्याने आम्ही ब-याचदा गाण्यांची प्रॅक्टीस सुद्धा घरीच करायचो. त्यात आमचं संपूर्ण कुटूंब हे संगीतप्रेमी आणि जाणकार असल्याने मिथिलेशवरही लहानपणापासूनच संगीत संस्कार चालू होते. अनेक मैफली आमच्याकडे चालू असताना एका कोप-यात बसून तो ह्या सर्व गोष्टींचं निरिक्षण करायचा. तेव्हा त्याचं वय तीन ते साडे तीन वर्षाचं होतं..." Read More..

याआधी मी स्वत: कंपोज केलेल्या गाण्यांचा एक अल्बल वयाच्या १३ व्या वर्षी काढला होता. यासाठीही बाबांनीच मला प्रवृत्त केलं होतं. त्यादॄष्टीने सतत मला ते मार्गदर्शन करायचे. चांगल्या कविता, चांगली पुस्तके, चांगली गाणी ऎकण्याचं त्यांनी सांगितलं. मराठीचं व्याकरण कळलं पाहिजे, कवितेची वृत्त कळली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. हे सर्व चर्चा करता करता मी नकळत त्यांच्याकडून शिकलो. पण त्यासाठी बाबांनीही जाणिवपूर्वक प्रयत्न केलेच होते. हे माझ्या आता लक्षात येतंय. माझ्याबाबतीत असं नाही झालं की, एक तास क्लासला गेलो आणि संगीत शिकलो. माझं पूर्ण बालपण हे संगीतमय वातावरणातच गेलं. ते जगणंच माझ्यासाठी एकप्रकारचा क्लास होता. एखाद्या गाण्यावर बाबा जेव्हा चर्चा करायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच मला अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या. या चर्चेमधून म्युझिकच्या बाबतीतला माझा विचार त्यांनी नकळत वाढवला. आज जे काही करतोय त्याचं बिज कुठेतरी माझ्या लहानपणात आहे. कारण अतिशय म्युझिकल लहानपण होतं माझं, आणि असं जगणं खरंच सगळ्यांना नाही मिळत.

संगीतकार संमेलन २०११ मध्ये
मिथिलेश पाटणकर आणि ऋषिकेश कामेरकर
एका सत्रा दरम्यान...

आज मी कितीही काम केलं असेल, कितीही अनुभव आले असतील, तरीही कलेमध्ये असं कधी होतंच नाही की, आपलं पूर्ण शिकून झालंय. त्यामुळेच आजही बाबांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतो. नवीन कंपोज केलेलं गाणं त्यांना ऎकवून त्यावर चर्चा करीत असतो. खरंतर आपल्यात जी एक प्रतिमा असते त्या प्रतिमेला पैलू पाडणं गुरूचं काम असतं. आजही ब-याचदा बाबा माझी गाणी ऎकतात आणि सांगतात की, ‘हे गाणं मनात उतरत नाही’. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अजूनही त्यांच्याकडून शिकतो आहे.

बाबांची अनेक गाणी मी आजही ऎकतो. पण आजपर्यंत मला त्यांच्या गाण्यांसारखी दुसरी गाणी ऎकायला मिळाली नाही. म्हणजे की, त्यांच्या गाण्यांमध्ये कॉपी नसायचं. ब-याच संगीतकारांवर कुणाचा ना कुणाचा प्रभाव असतोच. तसा कुणाचाच प्रभाव बाबांच्या गाण्यांवर मला आढळून आला नाही. आणि मला वाटतं माझ्यातही ही गोष्ट त्यांच्याकडूनच आली आहे.

बाबा संगीतकार म्हणून जितके चांगले आहेत तितकेच ते चांगले वडील सुद्धा आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी माझ्याकडून अगदी प्रेमाने करून घ्यायचे. मला अजूनही नाही आठवत की, ते मला रागावले किंवा त्यांनी मला कधी मारले असेल. आमचे खूप मित्रत्वाचे संबंध होते. मात्र माझी आई खूप कडक आहे. म्हणजे कडक होऊन जो काही वाईटपणा घ्यायच तो आईने घ्यायचा. लहान असतांना जेव्हा कुणी विचारायचे की, आई आवडते की,बाबा तर मी सांगायचो बाबा आवडतात,कारण काय तर ते मला रागवायचे नाही. आईने मला खूप शिस्त लावली. तिच्यामुळेच वेळेचं महत्व मला आज कळतंय. माझ्यातला डिसिप्लिन आई मुळेच आहे.

मिथिलेश पाटणकर

बाबांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलंय, अनेक अल्बम सुद्धा काढलेत. पण त्यांच्या ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या कॅसेटमधील ‘दयाळा जाग का न तुज येई’ हे गाणं मला खूप आवडतं. शिवरायांच्या जीवनचरित्रावर ही कॅसेट होती. त्यांचा प्रवास वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून त्यांनी रचला होता. तर शिवरायांच्या जन्मापूर्वीची राज्यातील काय परिस्थीती होती यावर हे गीत होतं. अतिशय सुंदर गाणं केलंय जे उत्तरा केळकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय....या अल्बमला बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना आहे. मला वाटतं त्यानंतर बाळासाहेबांनी स्वत: सुडिओत जाऊन कधी अशी प्रस्तावना दिली नसेल.

आज मी सुद्धा एक पिता आहे. नुकताच माझ्या मुलाचाही एक अल्बम रिलिज केलाय. त्यातील गाण्यांना बाबांनी चाली लावल्या आणि मी म्युझिक अरेंज केलंय. एकाच कुटूंबातील तीन पिढ्यांनी एकत्र येऊन केलेला हा मराठीतला पहिलाच असा अल्बम आहे. ज्याप्रमाणे बाबांनी संगीत शिकवलं त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या मुलाला संगीत शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण ते खूप कठीण असल्याचं मला जाणवतंय. कारण तो त्याच्या शाळेत आणि अभ्यासात खूप व्यस्त असतो. शिवाय मी सुद्धा १५ तास काम करतो, हे सांभाळून त्याला शिकवणं खरंच कठीण वाटतं. यावरून बाबांनी नोकरी करून मला कसं शिकवलं असेल, ह्या सर्व गोष्टी केल्या असेल याचं कोडं वाटतं. मी त्यांच्याकडून वादक, गायक, संगीतकार म्हणून आत्तापर्यंत धडे घेतले आहेत. पण आता त्यांच्याकडून पालक म्हणून धडे घेण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. की, कसे मी माझ्या मुलावर संस्कार करावे आणि कसा त्याच्यासाठी वेळ द्यावा.

नातू विधीत सोबत संगीतकार आजोबा विश्वास पाटणकर...

अनेक आठवणी आहेत ज्या आजही माझ्या स्मरणात तशाच आहेत. त्यातीलच एक म्हणजे कॉलेजमध्ये असताना माझं नाव ब्लॅक लिस्टमध्ये आलं होतं. कारण माझे अटेंड्न्स कमी होते. एकदा कॉलेजमध्ये गेलो असता व्हाईस प्रिन्सिपल आलेत आणि मला म्हणाले की, मिथिलेश तू आजपासून क्लासमध्ये बसायचं नाहीस. मला याची थोडी कल्पना होती की माझं नाव ब्लॅक लिस्टमध्ये का आलं. पण इतर जी मुलं होतं त्यांचं नाव येण्याचं कारण म्हणजे,ती मुलं क्लास बंक करून पिचरला जायचे, फिरायला जायचे म्हणून...पण माझ्या ज्या दांड्य़ा झाल्या होत्या त्या कार्यक्रमाची प्रॅक्टीस करण्यात किंवा कार्यक्रम करण्यासाठीच झाल्या होत्या. पण ते प्रिन्सिपल ऎकायला तयार नव्हते. त्यांनी पालकांना घेऊन यायला सांगितले. त्यानुसार बाबा आलेत. मग बाबांनी त्यांना सांगितलं, की हा अजिबात तसा मुलगा नाहीये. आणि जेव्हा तुमच्या कॉलेजचं गॅदरींग असेल तेव्हा तुम्हाला हे कळेल की, मिथिलेश काय आहे किंवा कशासाठी दांड्या मारतो. त्यानंतर कॉलेजच्या गॅदरींगमध्ये माझे गाणे आणि वादन ऎकून सर्वच लोक आश्चर्यचकीत झाले होते. त्यानंतर मी कॉलेजमध्ये चांगला प्रसिद्ध झालो होतो. असे कितीतरी प्रसंग सांगता येतील पण हा खास माझ्या लक्षात आहे.

खरंतर मला जे जीवन मिळालं ते प्रत्येकालाच मिळत नाही. सुरवातीपासून मला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं सहकार्य मिळालं. आणि बाबांमुळे संगीत विश्वाचा इतक्या जवळून प्रवास करता आला आणि येतोय. संगीत नुसतं शिकून येत नाही तर संगीत समजण्याचा एक विचार आपल्यात असावा लागतो आणि हाच विचार माझ्यात त्यांनी रूजवला. त्यामुळेच आज मी हे सर्व काम करू शकतोय.

संगीतकार संमेलनाकडे जाण्यासाठी -

संगीतकार संमेलनाविषयी मिथिलेशचं मनोगत ऎका

शब्दांकन - अमित इंगोले

 

झगमगच्या मुख्य पानाकडे

फादर्स डे स्पेशल पानाकडे