Sign In New user? Start here.विश्वास पाटणकरमिस्टर परफेक्शनीस्ट मिथिलेश...सलग तीन पिढ्यांनी आपलं सर्वस्व संगीत क्षेत्राला वाहिलेलं कुटूंब तसं क्वचितच पहायला मिळतं. याच मोजक्या संगीतप्रेमी कुटूंबांपैकी एक कुटूंब म्हणजे पाटणकर यांचं कुटूंब...विश्वास पाटणकर हे संगीतकार आहेत, तर त्यांचा मुलगा मिथिलेश सुद्धा संगीतकार आहे. मिथिलेश हा एक अतिशय प्रामाणिक असा संगीतकार आहे. याला हे सर्व त्याच्या लहानपणापासून त्याच्या वडीलांकडूनच मिळालं. संगीत काय असतं, याची जाण त्यांनी त्याला करून दिली. या संगीतप्रेमी पिता-पुत्रात असलेल्या नात्याचा उलगडा संगीतकार श्री.विश्वास पाटणकर यांनी स्वत: झगमग डॉट नेट शी बोलताना केलाय...

मिथिलेशने लहानपणापासूनच म्युझिकमध्ये त्याचा स्पार्क, त्याची चुणूक दाखवली होती. सतत आमच्याकडे रेकॉर्डीस्ट, संगीतकार यांची ये जा होती. मी स्वत: संगीतकार असल्याने आम्ही ब-याचदा गाण्यांची प्रॅक्टीस सुद्धा घरीच करायचो. त्यात आमचं संपूर्ण कुटूंब हे संगीतप्रेमी आणि जाणकार असल्याने मिथिलेशवरही लहानपणापासूनच संगीत संस्कार चालू होते. अनेक मैफली आमच्याकडे चालू असताना एका कोप-यात बसून तो ह्या सर्व गोष्टींचं निरिक्षण करायचा. तेव्हा त्याचं वय तीन ते साडे तीन वर्षाचं होतं. ज्या उत्सुकतेने तो ते बघायचा. तो काय काय टिपायचा हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं होतं. त्यानंतर आम्हीही त्याला प्रोत्साहन देऊ लागलो होतो.

मिथिलेशमधील असामान्यत्व आमच्या लक्षात यायला फार काळ लागला नव्हता. आमच्याकडे एक म्युझिशियन यायचे मधु बने नावाचे...ते ढोलक वाजवायचे. त्यांचं ढोलक वाजवणं ऎकून मिथिलेशने तसाच ढोलक वाजवला. एक एक चिज तशीच्या तशी त्याने वापरली होती. इतक्या लहान वयात त्याने तसं वाजवणं म्हणजे सर्वांसाठीच आश्चर्याचं होतं. त्याने ढोलक वाजवलेल्या गाण्याचा एक कार्यक्रम आम्ही षण्मुखानंद हॉलमध्ये केला होता. त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम आल्या होत्या. त्यांनी त्याचं वादन ऎकून खूप कौतुक सुद्धा केलं होतं. तेव्हाच आमच्याही लक्षात आलं होतं की, हा मुलगा सामान्य नाहीये. तिथून त्याचा संगीतप्रवास आणखी वेगाने सुरू झाला होता. त्यात मला स्वत:ला वेगवेगळी वाद्य वाजवता येत असल्याने मी त्याला पहिल्यांदा तबला आणि पेटी शिकवली. अतिशय कमी वेळात त्याने ती वाद्ये आत्मसात केली होती. एकदा त्याला काही सांगितलं की, त्याच्या ते नेहमीसाठी लक्षात राहायचं. मुळात आमच्या परिवारात सर्वच संगीत क्षेत्राशी निगडीत असल्याने त्यानेही संगीत शिकावं, याच क्षेत्रात काहीतरी करावं अशीच आमचीही ईच्छा होती आणि तोही त्याच पाऊलवाटेने प्रवास करीत होता.

त्याचं हे कौशल्य बघून आम्ही शहरातील मोठ मोठ्या म्युझिक कॉम्पिटीशनमध्ये त्याला पाठवायचो. या कॉम्पिटीशनच्या माध्यमातून अगदी लहान वयात तो वेगळं काहीतरी करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाला होता. लोक स्पेशली त्याचं गाणं ऎकायला जमायची. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्याने स्वत: गाणी रचली होती. त्याचा आम्ही एक अल्बम सुद्धा केला होता ‘बहरू कळी असे आला’ नावाचा....आणि ती गाणी सुरेश वाडकर सारख्या मोठ्या गायकांकडून गाऊन घेतली होती. कवी ग्रेस यांची ती कविता होती ‘ओल्या वाळूवर तुझे घर’. या गाण्याला याने इतकी अप्रतिम चाल त्याने दिली होती, जणू एखाद्या मोठ्या जाणकार संगीतकाराने ती रचना केली असेल, असं ते गाणं ऎकल्यावर वाटले होते. तेव्हा त्याचं खूप आश्चर्य वाटलं होतं. त्याचा प्रवास ज्यांनीही जवळून पाहिला असेल त्यांना आश्चर्य वाटणार नव्हतंच. कारण आपल्या डॊळ्यासमोर त्यांनी हिरव्याचं पिवळं होतांना पाहिलं होतं. पण ती चाल ऎकून आश्चर्य वाट्लं होतं.

आमच्या परीवारात अशा प्रकारचा संगीत वेडा मनुष्य असल्याचं आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायला लागलो. त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मी त्याला संगीत शिकवण्यापूरता होतोच. पण त्याला चांगल्या गुरूकडे घेऊन जाणं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेऊन जाण्याचं काम त्याची आई करत होती.

मिथिलेश आणि माझ्या नात्याबद्दल सांगायचं झाल्यास, मिथिलेशचे आणि माझे नाते अतिशय मित्रत्वाचे होते. मला असं कधी आठवतंच नाही की, मी त्याला कधी रागावलो असेल किंवा मारले असेल. लहानपणापासूनच मला तो एक सहकारी वाटायला लागला होता. मी जेव्हाही घरी वादनाचा सराव करायचो तेव्हा त्यातही वाद्य वाजवण्यास तो सहकार्य करीत होता.

संगीतकार मिथिलेश पाटणकर बद्दल सांगायचं झाल्यास, आजकालच्या संगीतकारांना त्यांचं गाणं इतर कुठल्या गाण्यासारखं झालं का असं बघावं लागतं. कारण आपण जे ऎकतो त्याचाच प्रभाव नकळत काही प्रमाणात आपल्या कामावर होत असतो. परंतु मिथिलेशच्या बाबतीत तसं नाहीये. त्याच्या कोणत्याच कंपोझिशनमध्ये तुम्हाला कधीच कॉपी आढळणार नाही. किंवा त्याचं कंपोझिशन कुठेही ऎकल्यासारखं वाटणार नाही. असा हा आमचा क्वॉलीटीचा संगीतकार आहे, असं मला वाटतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिथिलेश कधीच प्रसिद्धीच्या मागे धावला नाही किंवा धावतही नाही. तो नितळ मनाने आपलं काम करीत असतो. त्यामुळेच त्याचं काम सर्वांना आवडतं. दुस-या संगीतकारांबद्दल त्याच्या मनात कधीच राग-द्वेष नसतो. हाच त्याचा स्वभाव त्याच्या संगीतात आपल्याला ऎकायला मिळतो.

आज त्याचा अनुभव खूप मोठा आहे. मी जरी त्याला मार्गदर्शन करीत नसलो तरी मात्र आमच्यात चर्चा होते. त्याने कंपोज केलेल्या गीतांवर किंवा नवीन गाण्यांवर....त्यात ब-याचदा आमचे मतभेद सुद्धा होतात. आता हा जनरेशनचा फरक असेल...पण चांगल्या म्युझिकचे आम्ही दोघंही खूप मोठे फॅन आहोत.

मिथिलेशने आजपर्यंत अनेक गीतांना चाली दिल्या आहेत. त्याची सर्वच गाणी मला आवडतात. मात्र मला त्याचं सर्वात जास्त आवडणारं गीत म्हणजे त्याने नुकतंच कंपोज केलेलं ‘तू उदास मी उदास’ ही ग्रेस यांची कविता आणि त्याने १३ व्या वर्षी रचलेलं ‘ओल्या वाळूवर तुझे घर’ हे गीत मला सर्वात जास्त आवडतं. त्याला त्याचे संगीत क्षेत्रातील मित्र मि.परफेक्शनीस्ट म्हणतात आणि तो तसाच आहे.

संगीतकार संमेलनाकडे जाण्यासाठी -

संगीतकार संमेलनाविषयी मिथिलेशचं मनोगत ऎका

शब्दांकन - अमित इंगोले

 

झगमगच्या मुख्य पानाकडे

फादर्स डे स्पेशल पानाकडे