Sign In New user? Start here.

अष्टविनायक

 
     
 
* यातील पुण्याचा पहिला मानाचा गणपती कोणता ?
१) कसबापेठ २) गुरूजी तालीम ३) केसरीवाडा ४) तांबडी जोगेश्वरी ५) तुळशीबाग

योग्य पर्यायावर क्लिक करा.

 
     
 
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
 
       
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 
 

अष्टविनायक

१.मोरगावचा मयूरेश्र्वर( mayureshwar )

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयूरेश्वर . मयूरेश्वरच मंदिर काळ्या दगडापासून बहमनी काळात बांधले गेले. हे मंदीर गावाच्या मध्यभागी स्थित आहे आणि याला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मुघल काळात देवळावर आक्रमण होत असे आणि मंदीराला हानी पोहचवली जात असे. देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फुट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. या मंदिरात मयूरेश्र्वराबरोबर रिद्धी व सिध्दी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्र्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधूसूराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. सध्याची मयूरेश्र्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

मोरेश्वर गणपतीची कथा

गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरु केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले. मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन.

सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे. याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे.

गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले.

----------------------------

२.सिध्दटेकचा सि‍ध्दिविनायक

अष्टविनायकामधील दुसरा गणपती सिध्दटेकचा सि‍ध्दिविनायक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की त्याची सोंड उजव्या बाजूस आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असूरांचा वध केला.

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे. त्याच्या एका मांडीवर रिध्दी व सिध्द बसल्या आहे‍त. उत्तराभिमुखी असलेली या मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

सिध्दिविनायक गणपतीची कथा

सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे. या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात व येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले यासंबंधी एक पौराणिक कथा आहे .

एकदा ब्रह्मदेवाला वाटले, आपण सृष्टीरचना करावी. यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरु केली. गणेशाने त्याला एकाक्षरमंत्राचा जप दिला होता. ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला. मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली. त्या वेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधु व कैटभ हे दोन राक्षस निर्माण झाले. त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. सारी पृथ्वी भयभीत झाली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले. विष्णूचे व मधु-कैटभांचे घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध चालले, तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही; म्हणून तो शंकराकडे गेला. युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस, म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला. तेथे त्याने श्रीगणेशाय नमः या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाला. विनायकाच्या कृपेने विष्णूला सिध्दी प्राप्त झाली. मग त्याने मधु-कैटभांना ठार केले. विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिध्दी प्राप्त झाली, त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली. या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली, म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला श्रीसिद्धिविनायक असे म्हणतात. या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

कालांतराने ते मंदिर नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवीत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले. तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकरवी कर. तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा सुरु केली. पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले, अशी एक आख्यायिका आहे.

------------------

३. श्री बल्लाळेश्र्वर

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्र्वर .बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्याच नावाने श्री बल्लाळॆश्वर नावाने गणपती प्रसिध्द आहे. बल्लाळची गणपतीवर खूप श्रध्दा होती त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याणीशेठ व गावकरयांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला.

या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिरयांपासून बनवले आहेत.

बल्लाळेश्वर कथा

फार प्राचीन काळी, सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले अशी तक्रार करू लागले. आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावले. त्यांनी ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस... ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.तेव्हा बल्लाळ म्हणाला - तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावयास. ही भूमी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी. तेव्हा गणेश म्हणाला तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील. असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

 

-------------

४. श्री वरदविनायक

महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकातला चौथा गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. असे म्हणतात की गणेश येथे वरदविनायक (समृध्दी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा सुरू असतो.असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.

वरद विनायक कथा

फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरु केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला.तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.

एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो.

 

--------------

५. श्री चिंतामणी

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला 40 हजार रूपये लागले होते. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. चिंतामणीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या.

त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27 वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिध्दी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

चिंतामणी कथा

फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती. राजाला पुत्रसंतान नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा-राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले गण. गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तापट होता. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिलांच्याजवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला भोजन घातले. गणराजाला ते रत्न हवे होते, पण कपिलाने ते देण्यास नकार दिला. तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले; कपिलाला फार वाईट वाटले. मग त्याने दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाला व त्याचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले. पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले. विनायकाने गणराजाला ठार मारले. तेव्हा त्याच्या पित्याने अभिजीताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले. विनायकाने ते कपिलाला परत दिले, पण कपिलाने ते स्वीकारले नाही. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव्य करू लागला, तो आजतागायत. पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवती एक गाव वसले. त्याचे नव कदंबनगर. ते पुढे कदंबतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. हे कदंबतीर्थ म्हणजेच सध्याचे थेऊर व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक.

अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता गौतमाच्याच आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वीप्रमाणेच सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले व शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्रीगणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास चिंतामणी असे नाव दिले. तेच हे क्षेत्र.

ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी, ते शांत व्हावे म्हणून श्रीगणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असे नाव दिले व तेथे चिंतामणी गणेशाची स्थापना केली म्हणून या क्षेत्राला थेऊर असे नाव प्राप्त झाले.

 

---------------------

६.श्री गिरिजात्मक

डोंगरामध्ये वसलेला हा एकमेव गणपती म्हणजे श्री गिरीजात्मक .अष्टविनायकांमधील हा सहावा गणपती आहे . कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 18 गुहा आहेत.त्यातील 8 व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी 307 पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. मुख्य मंदिराशेजारी एक 53 फुट बाय 51 फुट लांब व 7 फुट उंचीचे सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मध्ये कोठेही खांब नाही. कडेला फक्त 6 खांब आहेत. उत्तराभिमुखी असलेल्या मुर्तीची एकच बाजू सगळ्यांना दिसते.

या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.

गिरिजात्मक कथा

आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रि पर्वताच्या गुहेत १२ वर्षे तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन, तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन, असा त्याने पार्वतीला वर दिला. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्र रूपाने प्रकट झाली. त्या बालकाला सहा हात, तीन नेत्र व सुंदर शरीर होते गिरिजात्मज गणेशाने वर्षे या क्षेत्रात तप केले. अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली. याच प्रदेशात गौतममुनींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गणेशाचा मयुरेश्वर अवतार झाला असे म्हणतात. गिरिजात्मज गणेशाने या प्रदेशात सुमारे १५ वर्षे वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.

 

------------------

श्री विघ्नहर

ओझरचा विघ्नहर अष्टविनायकातला सातवा गणपती . या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. यासंदर्भात एक अख्यायिकाही सांगितली जाते. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले.

त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोवस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला.गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फुट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे.मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.

विघ्नेश्वर कथा

फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राज्य करीत होता. आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले. ही वार्ता स्वर्गात इंद्राला नारदमुनींनी सांगितली. इंद्र देव घाबरले. त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्याच क्षणी अक्राळ-विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला. त्याला इंद्रादेवाने आज्ञा केली, अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर, त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्मांचा नाश केला. धर्माचा लोप झाला. देवांवर हे मोठेच संकट आले. तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली. त्या वेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता. देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला. मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो असे त्याने देवांना आश्वासन दिले.

मग गजाननाने पाराशरपुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले. गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चालेना. तो शरण गेला. गजाननाने त्याला आज्ञा केली, ज्या ठिकाणी माझे भजन-पूजन-कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये. मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला, तुमच्या नावामागे माझे नाव असावे. विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे. तथास्तु असे म्हणून गजानन म्हणाला,मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे. मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे. विघ्नेश्वर या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.

अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला; म्हणून गजाननास विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव या स्थानी प्राप्त झाले. मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्हकाळी देवांनी नैरुत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझर येथे घडली. हाच तो ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक

 

---------------

८.श्री महागणपती

अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले. आता हे गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते. येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे.

येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला 10 सोंड व 20 हात होते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते.या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडती, अशी मंदिराची रचना आहे. या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे.त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. रिध्दी व सिध्दी या दोघी मूर्तीच्या बाजूला आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.

महागणपती

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारीवदे महागणपती असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

 

------------------------------------