Sign In New user? Start here.

भूषण प्रधान , रेवती बेलापूरकर-प्रधान


भूषण प्रधान , रेवती बेलापूरकर-प्रधान

तेव्हा ती ७ वीत आणि मी ९ वीत होतो


मराठी मालिका आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात सद्या अनेक नवीन आणि तरूण कलाकारांची रेलचेल सुरू आहे. ‘पारंबी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सतरंगी रे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेला चेहरा म्हणजे अभिनेता भूषण प्रधान...भूषणने या दोन्ही चित्रपटात केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सद्या वेगवेगळ्या चित्रपटांवर काम करतो आहे. भूषण नुकताच लग्नाच्या पवित्र बंधनात बांधला गेला असून त्याची शाळेतील प्रेयसी रेवती बेलापूरकर हिच्याबरोबर त्याने संसार थाटला आहे. शाळेत एकमेकांवरचं प्रेम व्यक्त न करता ते दुर झाले आणि दहा वर्षांनी ते सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून पुन्हा भेटले. शाळेतील अव्यक्त प्रेम ते दहा वर्षांनी झालेली भेट, हा प्रवास त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुन्हा एकदा केला तो झगमग टीमसोबत...

   व्हॅलेंटाईन डे बद्द्ल भूषण बोलला की, " ब-याचवेळा या डे ला विरोध केला जातो की, ती आपली संस्कॄती नाहीये. किंवा त्याची काय गरज आहे. हे जरी असलं तरी प्रेम तर इतरही दिवशी तुम्ही व्यक्त कराच, पण त्यासाठी हा एक स्पेशल दिवस असावा. जो फॉलो केला तर काहीच हरकत नाही. कारण तुम्ही त्या दिवशी तुमचं प्रेम व्यक्त करता. त्यामुळे हा स्पेशल दिवस असणं खुप चांगलं आहे.

   शिवाय कुणीतरी या दिवशी काहीतरी अपेक्षा करतं आणि हे तुम्हालाही माहिती असतं की, कुणीतरी ती अपेक्षा करतंय. त्यामुळे कायम हा दिवस खुप स्पेशल वाटत होता आणि आहे."

   बोलता बोलता विषय निघाला तो लग्ना आधीच्या व्हॅलेंटाईन डेचा...तो कसा साजरा केला जायचा....त्यावर तो म्हणाला की, " खरंतर लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेची वेगळीच मजा असते. कारण त्यात लपून छपून भेटणं असतं, १४ फेब्रुवारी ही तारीख जवळ येतेय हे कळलं की, त्याची प्लॅनिंग करणं असतं. ही प्लॅनिंग करायला वेळ सुद्धा खुप जास्त लागतो. कारण तुम्ही तेव्हा एकमेकांच्या जवळ नसता. तेच लग्नानंतर असं होतं की, ती तुमच्या जवळ असते. मग आपण हा विचार करायला लागतो की, हिच्यापासून थोडा वेळ काढून व्हॅलेंटाईन डे ला काय करायचं...दुसरी गोष्ट म्हणजे लग्नानंतर तो बॉन्ड खुप स्ट्रॉंग होतो. माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे लग्नानंतर काय असतं, कसं असतं हे खरंतर सांगता येणार नाही. जेव्हा मी अनुभव घेईन तेव्हा ह्या गोष्टी आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने शेअर करीन. पण एक जसा अ‍ॅनिव्हर्सरीचा दिवस असतो तसाच हाही दिवस स्पेशल असतो. त्यातून नुकतंच लग्न झाल्यामुळे हा दिवस आमच्यासाठी आमच्या संसाराच्या नवीन सुरवातीसाठी खुप चांगला आहे. माझ्या ‘सतरंगी रे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी बिझी असल्यामुळे आम्ही हनीमुनला जाऊ शकलो नाही. पण या व्हॅलेंटाईन डेला आम्ही हनीमुनला जातोय. ह्या दिवसाचं वेगळं प्लॅनिंग तर सुरू आहेच. पण असं वाटतं की, जे ऎकमेकांविषयीचं आता जे फिलिंग आहे ते नेहमी असंच रहावं".

   लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असल्याने आधीच काही प्लॅन करून काही सरप्राईज देणार का? असं विचारता तो म्हणाला की, " अजून तसं काही प्लॅनिंग केलं नाहीये, पण काही करायचं झालंच किंवा सरप्राईज द्यायचं झालंच तर मी आमचे काही खास क्षण कॅप्चर केले आहेत. जसं लग्नानंतरची पहिली कॉफी, आऊटींग, डिनर ह्या सर्व गोष्टींचं मी एक कोलाज तयार करून ठेवणार आहे".

   लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेचा एक किस्सा यावेळी तो बोलून गेला. यावरून हे लक्षात आलं की, कितीही उशीर झाला तरी आपल्या व्हॅलेंटाईनला या दिवसाच्या शुभेच्छा देण्यास कधीही उशीर करू नये...! त्याने सांगितलं की, "एकदा असंच कामात असल्याने तिला विश करायचं विसरलो. विसरलो म्हणण्यापेक्षा उशीर झाला. पण तो उशीर नसून मी तिला सरप्राईज देणार होतो. मात्र नेमकं ते सरप्राईज देण्यासाठी मला १५ मिनिटं उशीर झाला होता. त्यामुळे ती खुप नर्व्हस झाली होती. पण १५ मिनिट उशीरा का होईन तिला जे सरप्राईज मिळालं त्याने ती खुप खुश झाली".

   व्हॅलेंटाईन डेच्या या स्पेशल गप्पांच्या निमित्ताने तिच्यासाठी त्याने एक मेसेज सुद्धा दिला. तो असा की,"आम्ही शाळेतलेच फ्रेन्ड आहोत. She is my first crush. जेव्हा मी ९ वीत होतो आणि ती ७ वीत होती. तेव्हाचं आमचं प्रेम...ऎकमेकांना बघून स्माईल देणं ऎवढंच...प्रेम काय ते ऎवढंच होतं तेव्हा...ऎकमेकांशी बोलण्याचं धाडसंही कधी केलं नव्हतं. त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षांनी आम्ही भेटलो. ही तीन वर्षांआधीची गोष्ट... मग आम्ही भेटायला लागलो, आमच्या गप्पा व्हायला लागल्या, एकमेकांना जाणून घेतलं. त्यानंतर एकत्र येण्याचा आमचा हा डिसिजन झाला. आता कुठेतरी ती दहा वर्ष वाया घालवली असं वाटतं. Am really glad की, माझं पहिलं जे crush होतं ते मला परत दहा वर्षांनी मिळालं आणि आज आम्ही सोबत आहोत. याचा मला खुप आनंद आहे. या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मला तिला हेच सांगायचं आहे की, मी त्या वर्षात मी तिला खुप मीस केलं...!".


भूषण प्रधान , रेवती बेलापूरकर-प्रधान

   शाळेतील अव्यक्त प्रेम दहा वर्षांनी मिळालं- रेवती बेलापूरकर-प्रधान


   व्हॅलेंटाईन डे बद्दल नव्यानेच लग्न झालेली रेवती सांगते की, "व्हॅलेंटाईन डे हा आपल्या प्रिय व्यक्तीशी आपलं असणारं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस...प्रत्येक प्रेम करणा-याला एक निमित्त हवं असतं आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी, मला वाटतं तेच हे निमित्त आहे".

   लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार याविषयीही तिने सांगितलं. ती म्हणते की, " खरंतर मला खुप काही करायचं आहे. पण नेमकं काय ते अजून नेमकं सुचत नाहीये. जनरली या दिवशी सर्वचजण बाहेर डिनरला, फिरायला, मुव्हीला जातात. ऎकमेकांना गिफ्ट देतात. मात्र मी यातील काही प्लॅन केलेलं नसून मी भूषणसाठी या दिवशी घरीच छान डिनर तयार करणार आहे".

   लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेची एक खास आठवण तिने आमच्याशी शेअर करताना ती म्हणाली की, " भूषण शूटींगमध्ये खुप बिझी असूनही एकदा तो त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मला भेटायला पुण्याला आला. तेव्हा तो मुंबईला रहायचा. पण माझ्यासाठी तो सर्व प्लॅन करून आला. त्या दिवशी आम्ही लव्हासा सिटीला फिरायला गेलो. ऎकमेकांसोबत खुप वेळ घालवला, खुप गप्पा केल्या आणि त्याच दिवशी धावपळ करत तो मुंबईला परत सुद्धा गेला. मला हा दिवस खास लक्षात आहे".

   शाळेत एकत्र असतांना दोघांच्या मनात असलेलं प्रेम त्यांनी कधी व्यक्त केलंच नाही. ते दूर गेले...मात्र तब्बल दहा वर्षानी पुन्हा एकदा भेटले...यावर ती म्हणाली की, "खरंतर अजूनही आम्हा दोघांचाही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये की दहा वर्षांनंतर आम्ही एकत्र आहोत. कधी हा विचारही केला नव्हता. पण सोशल नेटवर्कींच्या माध्यमातून आम्ही परत भेटलो. जी दहा वर्ष आम्ही दूर होतो ती वाया गेली असंही मला वाटत नाही. कारण, जरी आम्ही दूर होतो तरी एकमेकांच्या मनात आम्ही होतोच...!".

   व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने भूषणला काही सांगायचं असं विचारता, ती म्हणाली की, " भूषण जसा लग्नाआधी होता तसाच अजूनही आहे. त्याच्या बिझी शेड्युलमधून नेहमी काही ना काही सरप्राईज देत असतो...मला त्याला एवढंच सांगायचं की, मी त्याच्यावर खुप खुप प्रेम करते आणि हे प्रेम नेहमीसाठी असंच राहणार..!

   अमित इंगोले

Romantic Song