zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra 'क्राईम डायरी' ई टीव्ही मराठीवर
E-mail

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे आपण नेहमी म्हणतो, कारण समाजात वावरतांना नैतिकतेच्या आणि समाजहिताच्या काही नियमांचे पालन तो करत असतो. पण याच नैतिकतेचे अध:पतन होऊन मनुष्य स्वत:च्या स्वार्थासाठी इतरांच्या जिवावर उठतो तेंव्हा त्याला ’नराधम’ असंच संबोधण्यात येतं. अशाच काही नराधम वृत्‍तीच्या व्यक्‍ती चेह-यावर माणूसपणाचा मुखवटा घेऊन समाजात वावरत असतात, पण योग्य वेळ आली की त्यांचा खरा चेहरा हा समाजासमोर येतोच आणि त्यांना योग्य ती शिक्षा ही मिळते. अशाच नराधमांपैकी एक आहे अण्णा वैद्य. नगर जिल्ह्यातील सुगाव (खुर्द) या गावचा रहिवासी असलेल्या अण्णाने आपली जन्मदाती आई आणि सख्या बहिणीबरोबरच दोन असहाय विधवा महिलांची हत्या केली. नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या अण्णाच्या या क्रुरकृत्याची ही चित्रकथा आता ई टीव्ही मराठीच्या ’क्राईम डायरी’ मध्ये बघायला मिळणार आहे. येत्या १३ ते २३ जुलै दरम्यान प्रसारित होणा-या क्राईम डायरीच्या’ काळ्या मातीत मातीत’ या विशेष रुपांतरित मालिकेत अण्णा वैद्यचे हे खुनी सत्र पाहता येईल.
सुगाव (खुर्द) येथील मच्छिंद्र वैद्य ऊर्फ अण्णा वैद्य हा लहानपणापासूनच खोडकर होता. वयात आल्यानंतर छोट्या मोठ्या चो-या करुन त्या वस्तू विकून तो पैसे मिळवायचा. पुढे हे प्रमाण वाढले आणि अण्णा रात्रीच्या वेळी शेतातील विहिरीवरील पाण्याच्या मोटरी, त्याचे फुटबॉल, केबल अशा वस्तू चोरायला लागला. या चो-यांमुळे गावातील लोकही त्रासले होते पण खरा आरोपी त्यांनाही सापडत नव्हता. गावातील चोरलेल्या केबलमधील तांब्याची तार काढून ती भंगारात विकून अण्णा पैसे मिळवायचा. असाच एकदा चोरलेली तांब्याची तार विकताना त्याला गावातील एका माणसाने पाहिले आणि मग गावक-यांनी अण्णाच्या घरावर हल्ला बोल केला. अण्णाच्या मुलाला ताब्यात घेऊन गावक-यांनी जेव्हा त्याला दरडावून विचारले तेंव्हा त्याने अशा प्रकारच्या वस्तू आपल्या शेतात पुरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्या या माहितीवरून मग गावक-यांनीही अण्णाचे शेत खोदायला सुरुवात केली, तिथे चोरलेली केबल सापडलीच पण त्याचबरोबर बाहेर आला तो एक हाडाचा सापळा. या घटनेने गावकरी हादरले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी येऊन पोलिसांनी अण्णाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर लोकांच्या समोर आला तो अण्णाचा क्रुरकर्मा चेहरा.
आजुबाजुच्या गावात राहणा-या विधवा महिलांना मदत करण्याच्या निमित्‍ताने अण्णा त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग कधी कर्ज काढण्याच्या निमित्‍ताने तर कधी व्यवसायात मदत करण्याच्या निमित्‍ताने त्यांना आपल्या घरी बोलवायचा. त्यांना आपल्या शेतात नेऊन त्यांचे दागिने आणि पैसे लुटुन त्यांची हत्या करुन तो म्रृतदेह शेतातच पुरत असे. अण्णाच्या या क्रुरकृत्यात त्याची पत्‍नी मंदाही सहभागी होती. सर्वप्रथम ताराबाई राऊत या विधवा महिलेच्या हत्येची कबुली दिल्यानंतर मग अण्णाच्या दुष्कृत्याच्या एकेक केसेस समोर यायला लागल्या आणि अण्णाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरुन समजले की अण्णाने आपल्या जन्मदात्या आईचा आणि सख्या बहिणीचा पैशाच्या हव्यासापोटी खून केला. यातील एका खून प्रकरणात अण्णा आणि त्याच्या पत्‍नीला संगमनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे. याशिवाय कमल कोल्हे आणि पुष्पा देशमुख यांच्या खुनाचाही गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे.
समाजातील गुन्हेगारी वृत्‍तींवर प्रकाश टाकणा-या आणि पोलिसांची मेहनत आणि तपासकार्यातील दूरदृष्टीची माहिती देणा-या क्राईम डायरी या कार्यक्रमाने नुकतेच १२०० भागांचा टप्पाही पार केला आहे शिवाय यामध्ये प्रथमच ’काळ्या मातीतं मातीतं’ ही नऊ भागांची मालिका यानिमित्‍ताने प्रसारित होणार आहे हे विशेष. काळ्या मातीतं या मालिकेत अण्णा वैद्यची भूमिका केली आहे भगवान पाचोरे यांनी तर पोलीस उपाधिक्षक संजय पाटील यांची भूमिका रवी साळवे यांनी केली आहे.विवेक देशपांडे यांनी ह्या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे तर शशिकांत वापीलकर यांनी छायाचित्रण केले आहे. समाजातील निराधार महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन स्वत:च्या स्वार्थापोटी त्यांचा बळी घेणा-या अशा अण्णा वैद्यसारख्या प्रवृत्‍तीपासून सावध राहण्याचा एक सामाजिक संदेशच या मालिकेतून देण्यात आला आहे. तेंव्हा पहायला विसरू नका ’काळ्या मातीतं मातीतं’ क्राईम डायरीमध्ये दिं १३ जुलै ते २३ जुलै पर्यंत दुपारी १ वा. आणि पुन:प्रसारण रात्री ११:३० वा. फक्‍त ई टीव्ही मराठीवर.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions