zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज

"आयडिया सारेगमप - महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज" ची उद्या महाअंतिम फेरी. स्वरवंतांचे हे युद्ध आता अधिकच रंगात आलेय. वातावरण खूपच गरमागरमीचे आणि अटीतटीचे! कोण जिंकणार हे युद्ध ? प्रेक्षकांची उत्कंठा चांगलीच ताणली गेलीय. पुण्याचा आवाज ठरणार आहे "आयडिया सारेगमप - महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज"! या महाअंतिम फेरीत दाखल झालेले तिन्ही स्वरवंत पुण्याचेच. हृषिकेश रानडे, मधुरा दातार आणि अमृता नातू आता ठाकलेयत आमनेसामने! उद्या महाअंतिम फेरीत या तिघांमध्ये होणार आहे. स्वरांचे तुंबळ युद्ध....! या स्वरयुद्धात बाजी मारणारा योद्धा ठरेल,महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज!
गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेली ही सुरांची मैफल आता कळसाध्यायावर आलीय. अमृता, मधुरा आणि हृषिकेश हे तिघेही स्वरवंत आता कसून तयारीला लागलेयत. सुरांची शस्त्रं परजली जाताहेत... तर दुसरीकडे परीक्षकांची मने जिंकण्यासाठी तिघेही आपापल्या परीनं सुरांची बाजी लावाताहेत. ’महाराष्ट्राचा आवाज सर्वोत्कृष्ट’ ठरण्याचं कुणाचं स्वप्न सत्यात उतरेल....? विजयाचं दान कुणाच्या पदरात पडेल....? ही स्पर्धा झालीय आणखीनच अटीतटीची... तितकीच प्रतिष्ठेचीदेखिल!
"आयडिया सारेगमप - महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज" मध्ये परीक्षकांच्या मतांचे महत्‍त्व पन्नास टक्के आणि प्रेक्षकांच्या मतांचे महत्‍त्व पन्नास टक्के आहे. त्यामुळे महाअंतिम फेरीत तिन्ही स्वरवंत मान्यवर परीक्षक आणि रसिक प्रेक्षक दोघांनाही जिंकून घेण्यासाठी आपल्या भात्यातील एकाहून एक सरस शस्त्र उपसतील आणि स्वरांची चौफेर आतषबाजी करतील.
प्रेक्षकांनी आपापला लाडका आवाज निवडायला आत्‍तापासूनच सुरुवात केलीय. पण या कलाकारांच्या उद्याच्या परफार्मन्सवर प्रेक्षक शिक्कामोर्तब करणार आहेत. मुंबईचा हर्षद वालावलकर म्हणतो, "या कार्यक्रमामुळे मी हृषिकेशचा जबरदस्त फॅन झालोय. सगळ्या प्रकारची गाणी त्यानं ज्या ताकदीनं पेललीयत ते पाहून त्याला सलाम करावसा वाटतो. तोच ठरायला हवा "आयडिया सारेगमपचा - महाराष्ट्राचा आजचा आवाज!" पुण्याची दीप्ती भोसले म्हणते, "मी तर अमृतालाच मतं देतेय. तिची अदा.. तिचा ऍटिट्यूड सिम्पली फॅण्टास्टिक! आय लव्ह यू अमृता!" तिने सादर केलेल्या ’सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ गाण्याला साक्षात लतादीदींनी दाद दिली होती. ’हे सावळ्या घना’ किंवा ’का धरिला परदेस’ सारखी वैविध्यपूर्ण गाणी ज्या आत्मविश्वासानं आणि एकाग्रतेनं तिने पेश केली, त्याने रसिकांचीच नव्हे तर परीक्षकांचीही तबियत खुश झाली होती. सुराज सारंगला मधुराच जिंकून यायला हवीय. तिने गायलेल्या ’घनराणी’, ’गेले घायचे राहुन’ किंवा ’जांभुळ पिकल्या झाडाखाली’ या गाण्यांवर तरुण वर्गच काय ८० वर्षाच्या आजी सुलोचना साळवीसुद्धा बेहद खुश आहेत. डोंबिवलीची विनीता झांबरे आणि मुंबईचा गिरीष दीक्षित यांना हृषिकेशने गायलेल्या ’त्या फुलांच्या गंधकोषी’ आणि ’मेरा रंग दे बसंती चोला’ गाण्यांनी मोहिनी घातलीय. परीक्षक आणि रसिक प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी संपूर्ण पर्वात सादर केल्यानंतर आता तिघेही स्वरवंत सज्ज झालेयत महाअंतिम फेरीसाठी! या महाअंतिम फेरीत कुंणाचं पारडं जड होतंय. हे लवकरच उघड होईल.
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणा-या या सुरेल महाअंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण रसिकांना झी मराठीवर उद्या सायंकाळी साडे सात वाजता पहाता येणार आहे. या महाअंतिम फेरीत अमृता नातू. हृषिकेश रानडे आणि मधुरा दातार यांच्याबरोबरच अजित परब, अमोल बावडेकर, उदेश उमप, योगिता गोडबोले, विभावरी आपटे, संजीवनी भेलाडे, पुष्कर लेले हे या पर्वातील अन्य गायकही आपला खास परफॉर्मन्स देणार आहेत. स्वरांच्या या आतषबाजीत लढत रंगेल ती मात्र मधुरा, अमृता आणि हृषिकेश यांच्यातच! उद्या ठरेल आयडिया सारेगमपच्या या पर्वाचा बाजीगर कोण....? उद्या ठरणार आहे "आयडिया सारेगमप - महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज"....!

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions