zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra तिन्हीसांजा - १९ जूनला प्रदर्शित
E-mail

जगण्याविषयी स्वत:च्या स्वतंत्र संकल्पना असलेली आजची पिढी एकत्र कुटुंबातून विभक्‍त कुटुंबात अधिक रममाण होताना दिसत आहे. भौतिक उत्‍कर्षाच्या मागे लागलेल्या आजच्या पिढीतील काही प्रतिनिधींना आपल्या जन्मदात्या मातापित्यांचा विसर पडलेला दिसतो. जास्त उत्‍पन्न, अधिकार, आराम अशा पाय-या चढताना, क्षणभर थांबून खरी सुख-शांती-समाधान कशात आहे याचा विचारही या पिढीला करावासा वाटत नाही. यातूनच मुलांकडे, वयोवृध्द आईवडीलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जोडीदारसोबतच्या सहजीवनात सामंजस्य नाही असे कितीतरी प्रश्न पुढे आले आहेत. समाजातील हेच बदलते चित्र ’सुधाकर डाळींबकर फिल्म्स’ बॅनरच्या ’तिन्हीसांजा’ या मराठी चित्रपटातून रेखाटण्यात आले आहे. येत्या १९ जुनला हा चित्रपट मुंबई, पुण्यात प्रदर्शित होत आहे.

सुधाकर डाळींबकर निर्मित, पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित ’तिन्हीसांजा’ हा चित्रपट वृध्द मातापिता व त्यांचा उच्चशिक्षित नव्या पिढीतील मुलगा संदीप यांच्या तरल भावसंबंधांवर आधारला आहे. चित्रपटाचा नायक संदीप हा आपल्या मातापित्याचा एकुलता एक मुलगा. छोट्या खेड्यात राहून हाल अपेष्टा सहन करुन संदीपला शिक्षण देतात, त्याला इंजीनिअर करतात. संदीपच्या लग्नानंतर मात्र सगळी समीकरणच बदलतात. संदीप आपल्या वृद्ध आई-वडिलांची रवानगी वृध्दश्रमात करतो. आयुष्याच्या तिन्हीसांजेला आपला मुलगाच आपला आधार बनेल अशी प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते. पण काहींच्या वाट्याला तिथेही उपेक्षाच नशिबी येते. अशा मातापित्यांची हतबलता रेखाटणारा भावस्पर्शी चित्रपट म्हणजे ... ’तिन्हीसांजा’.

रमेश देव, संदीप कुलकर्णी, आशालता वाबगावकर, सुलेखा तळवळकर, अरूण नलावडे, सुमन मस्तकार, विठ्ठल उमप, आत्माराम भेंडे, यतिन कार्येकर, चित्रा नवाथे, सुधाकर डाळींबकर आदी कलाकारांच्या महत्‍त्वपूर्ण भूमिका असलेल्या ’तिन्हीसांजा’ चित्रपटास यंदाच्या ’झी गौरव’ पुरस्कारात सर्वोत्‍कृष्ट संवादाच्या पुरस्काराने तर ’संस्कृती कलादर्पण’ पुरस्काराच्या ४ विभागातील नामाकंनाने गौरविण्यात आले आहे.

’तिन्हीसांजा’ चित्रपटाची हदयस्पर्शी कथा दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांची असून पटकथा-संवाद पुंडलिक धुमाळ यांच्यासोबत शंतनू गणेश रोडे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील भावस्पर्शी गीतांच्या ओळी सुधीर मोघे यांनी लिहिल्या असून त्यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्‍की यांच्या संगीताची साथ लाभली आहे. सुरेश वाडकर, देवकी पंडित, चारुदत्‍त आफळे यांच्या आवाजात ती स्वरबध्द करण्यात आली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण देबू देवधर यांनी केले असून कला दिग्दर्शन शमीम खोपकर यांचे आहे. चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित ’धर्मा रामोशी’ चित्रपटाला अनेक आंतराष्ट्रीय महोत्स्वात नामांकने मिळाली असून ’बंजर’ चित्रपटाला ब्रॉडकास्ट इंडियाचा सर्वोत्‍कृष्ट डिजीटल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

धावपळीच्या जगात विसरलेली नाती, प्रेम आणि माया यांची जाणीव करून देणारा ’तिन्हीसांजा’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी १९ जून पासून चित्रपटग्रृहात दाखल होत आहे.

Click on Image for Big View
 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions