|
निसर्गावर विजय मिळवणार्याची निसर्गापुढे शरणगती! "आमच्याच ह्क्काच्या सातही बेटाभोवतीच्या सागरावर अतिक्रमण करून, आमच्या पोटापाण्याचा व्यवसायावर नांगर फिरवून मुंबापुरी उभी करणारी परवा आपल्या या समुद्रानी पंधरा फूटी लाटांचा दणका दिला त्यावेळी पोटात पाय घेऊन बसले होते," मासेमारीचा आपला व्यवसाय नि अस्तित्व टिकवून ठेवलेल्या बांद्र्यातील चिंबईच्या छोटेखानी वसाहतातील घराच्या व्हरांड्यात बसलेले वयोवृध्द समोरील समुद्राच्या लाटाकडे पाहत शेजारी बसलेल्यांना सांगत होते, "आणि एक मोठी लाट आपल्या महापौर बंगल्याची भिंत जमिनदोस्त करते आहे, दिसत असतानाही आपल्या शुभाताई काहीच करू शकल्या नव्ह्त्या निसर्गावर विजय
मिळवणं सोपं असतं. पण निसर्ग कोपला की मग मात्र सगळे भुईसपाट होतात. "दादू, आहो आपल्या संपूर्ण जमातीलाच हद्दपार करण्याचं ठरविण्यार्यांनी आपल्या बांद्र्याहून वरळीपर्यंतचा भलामोठा सागरी सेतू उभा केला आहे," समुद्रात दूरवर दिसणार्या पूलाकडे बोट दाखवत तरूण सांगत होता, "आणि बरं का दादू, त्या पूलावरून बांद्र्याकडे येणार्या मोटार वाहनांसाठी बॅंडस्टॅंडपासून आपल्या या वसाह्तीतून कार्टर रोडपर्यंतच मोठा रस्ताही ते करणार होते. पण आपल्या आजूबाजूची मोठी बंगलेवाली मंडळी एकत्र आली आणि त्यांनी या रस्त्याला विरोध केला म्हणून आपली ही वस्ती वाचली. नाही तर आपणही रस्त्याखालीच असतो." "बापू म्हणतोय ते अगदी खरयं दादू," मळलेली तंबाखू दादूला देत दुसरे वृध्द सांगत होते,"काही नेते मंडळी आपल्या वसाहतीत येऊन गेली होती. रस्त्याखाली जाणार्या प्रत्येक कुटुंबाला म्हाडाची घरे मिळवून देतो सांगत होती. पण व्यवसायासाठी समुद्र किनार्य़ावर घरे द्यायची कुणाचीच तयारी नसल्यामुळे सगळ्यांनीच नकार दिलेला होता." "आणि दादू, आपल्या समुद्राच्या लाटांनी यंदा मुंबईकरांची जशी अद्दल घडविली तशीच समुद्रातूनच येणार्या पावसानेही मुंबईबरोबरच सगळ्या महाराष्ट्राच्या नाकी नऊ आणले आहेत," दुसरा तरूण आपली विडी पेटवित सांगत होता,"मे मध्ये येणारा पाऊस जुलैमध्ये असा बरसला की कोकणासह अनेक जिल्ह्यातील नदीनाल्यांना महापूर आले होते. पण आता तो असा नाहीसा झालाय की मुंबईकरांना वर्षभर पाणी कसे द्यायचे. शेतात पिकलंच नाही तर जनतेला जीवंत कसे ठेवायचे, या काळजीने राज्याच्या नि देशाच्या नेत्यांच्या डोळ्यात पाणी आलयं." "राजू, अरे निसर्गावर मिळवण्याची स्पर्धांच संपूर्ण जगात असली तरी प्रतिकूल निसर्गावर कशी मात करावी, हे मात्र सिंगापूरसारख्या सत्ताधिकार्यांकडून सगळ्यांनी शिकण्याची आवश्यकता आहे," मळलेली तंबाखू तोंडात टाकल्यानंतर दादू सांगत होते,"आम्ही गेल्याच महिन्यात तिथं जाऊन आलो. चार वर्षांपूर्वी तिथं गेला नातू तिथचं स्थायिक झाला. तो खोप आग्रह करत होता म्हणून आपला पारंपारिक उद्योग व सिंगापूरात कसा करतोय ते एकदा पाहून तरी यावं, म्हणूनच आम्ही सिंगापूरला गेलो होतो, आणि आमच्याच नातव्याच्याच नव्हे तर सार्या सिंगापूरवासियांच्या कर्तृत्वानी आम्हाला जिंकून घेतलं. "दादू, काय पाहिलं तुम्ही?" राजूनं विचारलं, "म्हणजे आम्ही जाऊ शकतो तिथं?" "तिथं जाण्यापेक्षा प्रतिकूल निसर्गाशी मुकबला करण्याचं त्यांचं कर्तृत्व आपणही शिकण्याची आज तातडीची गरज आहे," समुद्राकडे पाहत दादू सांगत होते, "अरे, बाबांनो समुदानी वेढलेल्या सिंगापूरात नद्या नाहीत, शेतीची जमीन नाही, पावसाचं पाणी साठवण्याची सोय नाही, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचीही मलेशिया आणि इतर देशातून आयात करणार्या सिंगापूरात अनेक उद्योग आणि जागतिक कीर्तीच्या व्यापारी संघटना आहेत. सिंगापूरची स्वच्छता, शिस्त, समृध्दी निसर्गावर विजय मिळवण्यापेक्षा प्रतिकूल निसर्गावर मात करण्याची जिद्द आपण अंगी बाळगली तर पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची टंचाईच्या नैसर्गिक संकटामुळे निसर्गावर शरणागती पत्कारायची वेळ आपल्यावरही कधीच येणार नाही. -वसंत खरे |