| तनुजा पंचमी यांच्या स्वरांनी सजला ’स्वरपंचमी’चा सोहळा |
|
तनुजा पंचमी यांच्या गीतांचा ’स्वरपंचमी’ या आल्बमचे प्रकाशन नुकतेच यशवंत नाट्यगृहात महाराष्ट्राचे माजी महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले. या आल्बममध्ये यशवंत देव यांनी स्वरबध्द केलेली तनुजा पंचमी यांची गाणी आहेत. कविवर्य वि.दा.करंदीकर यांची गझल, वसंत निनावे यांची लावणी, पाडगांकर यांचं भक्तीरसपूर्ण गीत,दिलीप पांढरपट्टे यांचं कोळीगीत,इत्यादी गीते असून त्यांचा आस्वाद श्रोत्यांसह माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार कविवर्य शंकर वैद्य,रामदास कामत,पं.शंकर अभ्यंकर, लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी घेतला. रंगमंचावर तनुजा पंचमी यांच्यासह संगीत दिग्दर्शक यशवंत देवही उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदक होते भाऊ मराठे.या आल्बममधील काही गाण्यावर अभिनेत्री मधूरा वेलणकर हिनेही नृत्याविष्कार केला. या आल्बमचे प्रकाशन करताना महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार म्हणाले,’संगीताचा बेसुरपणा संपवून काहीसा सुरेलपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लीच गाणं आणि संगीत म्हणजे केवळ गोंगाट नि गजबजाट अशा परिस्थितीत तनुजा पंचमीसारख्या एखाद्या गुणी गायिकेची ही सुमधुर गाणी ऎकायला मिळाली आणि खरोखरच आनंद झाला. सूरचं माणसाचं जीवन आनंदी बनवतात त्यावर मी एक शेर सादर करतो’. ’जिन्हे शक है वो करे खुद की तलाश, हम तो सूर को ही बादशाह समजते है,’ तनुजाच्या आल्बमला मन:पूर्वक शुभेच्छा! तर या प्रसंगी आपल मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले,’संगीताच्या या मैफलीत माझ्यासारख्या नटाचं काय बरं काम? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु सुप्रसिध्द तबलजी लालजी गोखल्यांचा पुतण्या असलेल्या आमच्या घरात संगीताची परंपरा आहे. मी स्वत: किशोरीताई आमोणकर, आशा खाडिलकर, फय्याज यांच्या शास्त्रीय गाण्यांचा एक चाहता आहे. त्यांच्या गाण्यांमुळेच माझा ’कान’ बर्यापैकी तयार झाला आहे. त्यामुळेच आज तनुजाची गाणी ऎकली आणि हिच्या आवाजाला शास्त्रीय बैठक असल्यानेच इतकी विविध रंगी गाणी इतक्या सुंदर नजाकतीत ती सादर करू शकली ही खात्री पटली.तिचा अल्बम खरोखरच लोकप्रिय होईल यात शंकाच नाही. |