Sign In New user? Start here.

‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे

* ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे *

 
 
 

नाट्यसंगीत म्हटलं तर आज अनेक तरूणांच्या कपाळावर आठ्या यायला लागतात. कारण ते क्लिष्ट आहे. त्यातील राग समजत नाही. वैगेरे वैगेरे कारणं...मात्र सद्या परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील नाट्यगीतं अतिशय लोकप्रिय झाली. खास करून तरुणांनीच ती जास्त डोक्यावर घेतली. या चित्रपटातील ही नाट्यगीतं ज्यांनी गायिली ते आनंद गंधर्व आनंद भाटे यांच्यांशी एका खास मुलाखतीत झगमग प्रतिनिधी अमित इंगोले यांनी केलेल्या गप्पा.....

आनंदजी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात सांगतांना म्हणाले, "आमच्या घरात आधीपासूनच संगीताचं वातावरण होतंच. माझे आजोबा भाटे बुवा हे बालगंधर्वांच्या काळातील गायक आणि अभिनेते होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, त्याद्वारा ते त्यांनी अनेक संगीत नाटकं बसविली होती. आधीपासून आमच्या घरात बालगंधर्वांचं संगीत ऎकलं जात होतं. त्यामुळे आधीपासूनच संगीत मनावर बिंबवल्या गेलं होतं. माझी संगीताची आवड पाहून माझ्या बाबांनी मला बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे संगीत शिकायला पाठवले. तेव्हापासून बालगंधर्वांच्या गाण्याचं माझं शिक्षण सुरू झालं".

तुमच्या पहिल्या मैफिलीची काय आठवण सांगता येईल? त्यात काय गायिलं होतं? असं विचारता ते म्हणाले, "माझ्या स्मरणातल्या मैफिल म्हणजे अखिल भारतीय नाटय परिषदेच्या दोन मैफिल. त्यातील एक पुण्यात आणि एक मुंबईत झाली होती. त्यावेळी मी दहा वर्षाचा होतो. त्या कार्यक्रमांतर्गत मी दोन दोन नाट्य पदं सादर केली होती. त्या दोन मैफिली खास लक्षात आहेत. एक छोटा मुलगा बालगंधर्वांची गाणी गातो, हे तेव्हा खूप औत्सुक्याचं झालं होतं. त्यानंतरच मग दूरदर्शनवर ‘आनंद गंधर्व’ कार्यक्रम आला, तो त्याच काळातला..."

त्यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी कुणी आणि कशी दिली? "अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी मला ही ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली. आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आलं".

आनंदजी हे एका आयटी कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत असून आपली नोकरी सांभाळून ते गायन सुद्धा करतात. याबद्द्ल विचारता ते म्हणाले, "ते थोडं असं झालं की, सॉफ्टवेअर हा माझ्या आवडीचा विषय आहे. आणि गाणं हे माझं पॅशन आहे. आणि आधीपासूनच आमच्या घरातही तसं शिक्षणाचंच वातावरण होतं. माझी आई गोखले इन्स्टिट्य़ूटमध्ये प्रोफेसर आणि बाबा वकील त्यामुळे शिक्षण पूर्ण करायचं हे आधीच ठरलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यात माझे गुरूजी पंडीत भिमसेन जोशी यांचा खूप मोठा आधार मला लाभला. त्यांनीही मला दोन्ही रिंग चालू ठेवण्यात खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळेही हे शक्य झालं असं मला वाटतं".

पंडीत भिमसेन जोशी यांच्याकडेही आनंद भाटे यांनी संगीताचे धडे गिरवले. त्यांच्याबरोबरचे देखील अनुभव यावेळी त्यांनी बोलून दाखविले. ते म्हणतात, "मी जेव्हा शास्त्रीय संगीत शिकायला सुरवात केली, ती यशवंत बुवा मराठे यांच्याकडे. पण पुढे शास्त्रीय गायक म्हणून मोठं व्हायचं आहे. तर ते गाणं कुणासारखं असावं, तर ते पंडीत भिमसेन जोशींसारखं हे मनात होतंच. त्यामुळॆ त्यांना जाऊन विचारलं आणि त्यांनी मला शिकवायला होकार दिला. हे मी माझं भाग्य समजतो. तो क्षण माझ्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण ठरला, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्यासारख्या दैवी व्यक्तीमत्वाचा मला इतके वर्ष सहवास लाभला, ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे". (यावेळी तोडी रागातील एक बंदीश आनंदजींनी गायिली.)

नाट्यसंगीत हि संकल्पना खरंतर आजच्या तरूण पिढीला माहितीच नाही. त्यामुळे नेमकं नाट्यसंगीत काय असतं? असं विचारता ते म्हणतात, "पूर्वी संगीत नाटकं जी व्हायची तर त्या नाटकातीक कथेला पुढे नेणारं संगीत म्हणजे नाट्यसंगीत...ती गाणी उगंच तिथे टाकलेली नसतात. त्याने त्यातली कथा पुढे सरकत असते".

संगीत नाट्य सम्राट बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात त्यांनी अनेक गाणी गायिली असून त्या चित्रपटासाठी गाणी गात असतांनाचे अनुभव त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "खरंतर बालगंधर्व यांच्या जीवनावर चित्रपट निघाला. हे खूप चांगलं झालं. कारण बालगंधर्वांच ते युग, त्यांचं संगीत या चित्रपटाच्या रूपाने तरुणांपर्यंत पोहचलं. नितीन देसाईंनी भव्य असा हा चित्रपट तयार केला. सुबोध भावेने अप्रतिम असा अभिनय केला. सगळ्या गोष्टींचा एक असा योगच जुळून आला होता. सर्वच चांगलं झालं. त्यामुळे प्रेक्षकांचा फिडबॅक जो येतोय तो खूप चांगला येतोय. वयस्कर लोकं तर चित्रपट पहायला होतेच, शिवाय तरूण सुद्धा तेवढ्यात संख्येने आले होते. या चित्रपटातील गाणी तरुणांच्या आयपॉडवर लागतात हल्ली. हे या चित्रपटाचं खूप मोठं यश आहे, असंच मी म्हणेन".

या चित्रपटानंतर नाट्यसंगीताचे सुवर्ण युग परत येईल असं वाटतं का? यावर ते म्हणाले, "हो....! गोडी नक्कीच वाढेल. कारण आम्हाला जो फिडबॅक मिळतोय, त्यात तरूणांचा मोठा वाटा आहे. काय व्हायचं की, शास्त्रीय संगीत म्हटलं की, आपल्याला नाहीच कळणार असा माईंड ब्लॉक असायचा. मात्र अशी जर ऎकण्याची सवय लागली, तर आपलं संगीत नक्कीच पुढे जाईल असं मला वाटतं".

शास्त्रीय संगीतात वेगवेगळी घराणे आहेत. नेमकं काय असतं ते? यावर ते म्हणतात की, जस जसं शास्त्रीय संगीत विकसीत होत गेलं. वेगवेगळ्या लोकांनी आपआपल्या स्टाईल्स नुसार त्यांच्या शागिर्दांना शिकवलं. आणि त्यानुसार ती वेगवेगळी घराणी पडत गेली. त्या त्यानुसार त्या घराण्यांची वैशिष्ट्ये तयार होत गेली. काही घराणी सुरप्रधान गायकी करतात. काही घराणी शब्दप्रधान आहेत. पण एखाद्या घराण्याच्या गायकाने दुस-या घराण्य़ाचं गायिलं, तर ते काही गैर नाहीये. किंवा निषिद्ध नाहीये. पंडीत भिमसेनजी यावर बोलायचे की, गायकाने आपल्या घराण्याचा बेस जरूर ठेवावा. सोबतच इतरही घराण्यांच्या चांगल्या गोष्टीही शिकाव्यात. ते चौकटीत फार बंद करण्याची गरज नाही.

शास्त्रीय संगीतात वेगवेगळी घराणे आहेत. नेमकं काय असतं ते? यावर ते म्हणतात, "जस जसं शास्त्रीय संगीत विकसीत होत गेलं. वेगवेगळ्या लोकांनी आपआपल्या स्टाईल्स नुसार त्यांच्या शागिर्दांना शिकवलं. आणि त्यानुसार ती वेगवेगळी घराणी पडत गेली. त्या त्यानुसार त्या घराण्यांची वैशिष्ट्ये तयार होत गेली. काही घराणी सुरप्रधान गायकी करतात. काही घराणी शब्दप्रधान आहेत. पण एखाद्या घराण्याच्या गायकाने दुस-या घराण्य़ाचं गायिलं, तर ते काही गैर नाहीये. किंवा निषिद्ध नाहीये. पंडीत भिमसेनजी यावर बोलायचे की, गायकाने आपल्या घराण्याचा बेस जरूर ठेवावा. सोबतच इतरही घराण्यांच्या चांगल्या गोष्टीही शिकाव्यात. ते चौकटीत फार बंद करण्याची गरज नाही".

बालगंधर्वांच्या गायकीचा खूप जास्त प्रभाव तुमच्या गायकीवर आहे. कोणता प्रकार होता त्यांच्या गाण्याचा? यावर ते सांगतात, "बालगंधर्वांचं गाणं हे आधीपासून घरी ऎकलं जायचं. बालगंधर्व हे आमच्यासाठी दैवत आहेत. जसं मी मघाशी म्हणालो की, शास्त्रीय गायन कुणासारखं असावं तर भिमसेनजी सारखं तसं नाट्यगीत कुणासारखं असावं तर बालगंधर्वांसारखं असं मी म्हणेन. पंडीतजी आणि बालगंधर्व हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे साहजिकच या दोघांच्या गाण्याचा प्रभाव माझ्या गायकीत दिसतो. आणि तो दिसला की खूप बरं वाटतं".

यानंतर आम्ही थोडं दिवाळीकडे वळलो. आणि त्यांना विचारलं की, तुमच्या मनातली दिवाळी कशी आहे? आणि सद्या साजरी कशी करता? तर ते म्हणाले, "लहानपणापासूनच दिवाळी म्हटली की, एन्जॉय करायचा. धुडगुस घालायचा, असा एक सण मनात आहे. शाळेला सुट्टी असते. घरी सगळं गोड धोड असतं. सर्व नातेवाईक एकत्र येतात. एकंदर ते वातावरण अतिशय आनंदाचं असतं. माझ्या खास लक्षात असलेली दिवाळी म्हणजे माझ्या दोन बहिणी आहेत. त्यातली किशोरी परांजपे पुण्यात आणि दुसरी प्रज्ञा गोंधळेकर ही युकेला असते. आत्तापर्यंत एक दोनदाच फक्त दोघीही एकत्र आल्यात. आम्ही सर्व एकत्र आलोत. तर ह्या सर्व दिवाळ्या खास लक्षात राहतात".

झगमगच्या सर्वच रसिक वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

-अमित इंगोले.