Sign In New user? Start here.

मराठी तडका असलेला रिमेक ‘नो एन्ट्री’ - अंकुश चौधरी

मराठी तडका असलेला रिमेक ‘नो एन्ट्री’ - अंकुश चौधरी

 
 
 

मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांना दिसणारा अभिनेता अंकुश चौधरी आपल्याला पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेला आणि अभिनय केलेला हिंदी ‘नो एन्ट्री’चा रिमेक असलेला ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याआधीही चित्रपट दिग्दर्शन करणा-या अंकुशचा या रिमेक सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी केलेली ही खास बातचीत...

* ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या सिनेमाबद्दल सांग.
- हा सिनेमा हिंदीत गाजलेल्या ‘नो एन्ट्री’ या सिनेमाचा मराठी रिमेक आहे. हिंदीत या सिनेमाचं जे कथानक होतं ते तसंच ठेवण्यात आले आहे. स्क्रिन प्ले सुद्धा तोच आहे. फक्त मराठी ट्रेंडमध्ये ही आम्ही तयार केली आहे. याआधी कन्नडा, तेलगू या भाषेंमध्येही ही फिल्म येऊन गेलेली आहे. त्यामुळे त्याचा आत्मा तोच ठेवून मराठी स्टाईलमध्ये ही फिल्म करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला वाटतं प्रेक्षकांनी फिल्म बघीतल्यावर कळेल की, मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे.

ankush chaudhary interview

* रिमेक असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन करताना काही वेगळी तयारी करावी लागली का ?
- खरंतर नाही करावी लागली. कारण, काय झाले की, आधी एक दुसरे दिग्दर्शक ही फिल्म दिग्दर्शित करणार होते. पण त्यांना ती सोडावी लागली आणि अचानक दिग्दर्शनाची धुरा माझ्याकडे आली. दुसरी गोष्ट म्हणजे ही फिल्म माझ्या आवडीची असल्यामुळे मला काम करताना त्रास झाला नाही. फक्त जबाबदारी एवढीच घेतली आहे की, हिंदीत ही फिल्म खूप गाजली होती. त्यामुळे तेवढीच किंवा त्यापॆक्षा जास्त मराठीतही गाजावी याची काळजी घेतली आहे.

* तू या सिनेमात कोणती भूमिका करतोय?
- यात मी प्रेमची भूमिका करीत आहे. जी सलमान खानने हिंदीत केली होती. ही भूमिका मी माझ्या स्टाईलनेच करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सर्वांनी आधी ठरवलं होतं की, आपण कलाकार आहोत, नकलाकार नाही. हिंदीतील कलाकारांनी केलेल्या कामासारखं आपण न करता आपल्या पद्धतीने करायचे. जसे भरत जाधव हे अनिल कपूर यांनी केलेली भूमिका करीत आहेत तर अनिकेत हा फरदीन खानने केलेली भूमिका करत आहे. मला वाटतं प्रेक्षकांना ही फिल्म नक्की आवडेल.

ankush chaudhary interview

* सई ताम्हणकरच्या बिकीनी सीनवर बरीच चर्चा सध्या होत आहे, खरंच सिनेमात याची गरज होती का ?
- हो म्हणायला काही हरकत नाही. हिंदीत बिपाशा बासूने केलेली भूमिका सई मराठीत करीत आहे. सिनेमातील इतर तीनही अभिनेत्री सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. कथानकानुसार त्यांच्या पतींना आकर्षीत करणारी वरचढ दिसणारी मुलगी हवी होती. बघताक्षणी ही लोकं जिच्या प्रेमात पडतील. त्यासाठी हे केलेले प्रयोग आहेत असंही म्हणायला हरकत नाही. खरंतर त्या शॉटकडे मी बिकीनी शॉट म्हणून बघतच नाही. तर ती कथानकाची गरज म्हणून करण्यात आलं आहे.

* या सिनेमाचं संगीतही चांगलंच गाजत आहे, त्याबद्दल काय सांगशील ?
- नकाश-सरगम यांनी संगीत दिलय. एक वेगवेगळ्या गाण्यांचं पॅकेज या सिनेमातून ऎकायला मिळेल. हिंदी सिनेमाची गाणी सुद्धा खूप गाजली होती. त्यामुळे मराठी गाणीही गाजावी यादृष्टीनेच संगीतकारांनी काम केलंय. हिंदीतील अनेक गाजलेल्या गायकांनी यात गाणी गायली आहेत. सोनू निगम, अनू मलिक, सुनिधी चौहान, वाजीद, जान्हवी प्रभू-अरोरा, प्राजक्ता शुक्रे, स्वप्निल बांदोडकर या सर्वांनी आपला आवाज यातील गीतांना दिला आहे. पण या सर्व मोठ्या मंडळींचं नाव वापरून गाण्यांना हिट करण्याचा आमचा मानस नाही. तर त्या त्या गाण्याला ह्या गायकांचा आवाज सूट होत होता म्हणून त्यांना घेण्यात आलं आहे.

ankush chaudhary interview

* रिमेक सिनेमासाठी दिग्दर्शन करण्याचा तूझा अनुभव कसा होता ?
- मस्त होता..! मुळात सर्व मसाला रेडी होता. फक्त मला मराठी तडका मारायचा होता. इतर सिनेमांना मी दिग्दर्शन करताना मला वर्ष-दिड वर्ष फक्त स्क्रिप्टवरच काम करायला लागायचं. त्यानंतर सर्व गोष्टी करायला लागायचो. तेव्हा कुठे फिल्म तयार व्हायची. त्यामानाने ह्या फिल्मसाठी सर्व तयारच असल्याने जास्त वेळ गेला नाही. मला वाटतं प्रेक्षकांनी ही फिल्म बघावी. कारण यातून त्यांचं धमाल मनोरंज होणार आहे.

अमित इंगोले.