Sign In New user? Start here.

‘झकास’ अंकुश चौधरी

‘झकास’ अंकुश चौधरी

 
 
 

झी टॉकीजची प्रस्तुती ट्वेंटी ट्वेंटी एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेला आणि ग्लॅमरचा धमाका, सळसळत्या तरूणाईचा जोशपूर्ण रोमॅंटिक ‘फुल ऑन’ तडका अर्थात ताज्या दमाचा ‘झकास’ चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. झी टॉकीजची ही थ्री इन वन मनोरंजनाची ‘झकास’ रोमॅंटिक, युथफुल पर्वणी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतेय. या चित्रपटात तीन भूमिका आणि दिग्दर्शनाची धुरा अशी चौरंगी कामगिरी अंकुश चौधरी सांभाळतोय. युवापिढीचा ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अंकुशबरोबर केलेल्या या झकास मनमोकळ्या गप्पा.....

* तुझ्या आजवरच्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगशील?
१९८९ -९० या सुमारास ‘महाराष्ट्राची लोकधारा’ पासून सुरू झालेला प्रवास..त्यानंतर अनेक महाविद्यालयीन एकांकिका, ऑल द बेस्ट’ नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण..केदारबरोबरच ‘हसा चकट फू’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर प्रवेश..नंतर ‘आभाळमाया’ आणि हर्षदा खानविलकर बरोबर ‘बेधुंद मनाच्या लहरी’ सारख्या मालिका केल्या. रंगभूमीवर ‘ऑल द बेस्ट’ दणक्यात सुरू होतं. नवी नाटकंही मिळत होती. सोबत मालिका करत होतोच. अभिनय कारकीर्द म्हटलं तर भरात होती. पण तरी उराशी स्वप्न होतं ते मोठ्या पडद्याचं! ‘सुना येती घरा’ या चित्रपटात काम करायची पहिल्यांदा संधी मिळाली. अशोक सराफ आणि अलका कुबल यांच्या त्यात महत्वाच्या भूमिका होत्या. माझी त्यातली भूमिका तर छोटीच होती पण मोठ्या पडद्यावरचं ते पदार्पण होतं, त्यामुळे माझ्यासाठी त्याचं महत्व माझ्यासाठी मोठं होतं. याच दरम्यान राजीव पाटील यांचा ‘सावरखेड एक गाव’ चित्रपट हाती आला. या चित्रपटाने खरंतर मला हिरो बनवलं. यानंतर ‘मातीच्या चुली’, ‘आई शप्पथ’, ‘जत्रा’, ‘यांचा काही नेम नाही’, ‘यंदा कर्तव्य आहे’, माझा नवरा तुझी बायको’, ‘इश्श’, चेकमेट’, ‘उलाढाल’, ‘रिंगा रिंगा’, ‘लालबाग परळ’, आणि अगदी अलिकडचा ‘प्रतिबिंब’ असे अत्यंत मोजके चित्रपट नावावर जमा झाले. यात संख्या फार नव्हती पण केवळ आपल्या नावावर चित्रपटांची संख्या वाढवण्याचा माझा भर होता. कारण मला स्वत:लाच आनंद मिळाला नाही तर माझ्या प्रेक्षकांना मी आनंद कसा देऊ शकणार होतो?

* अभिनयात गर्क असताना दिग्दर्शनाकडे मोहरा वळवण्याचं कारण ?
- माझा मित्र केदार शिंदे याच्याबरोबर किंवा राजू पाटील, संजय जाधव याच्याबरोबर काम करताना मी त्यांना दिग्दर्शक म्हणून पहात होतो. त्यांना निरखत असताना माझ्यातला दिग्दर्शक मला खुणावत होता. केदारबरोबर मी ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून मी काम केलं. ‘अगंबाई अरेच्चा’ करताना खूप काही शिकलो. या चित्रपटासाठी सहायक नृत्यदिग्दर्शक आणि फाईट सिक्वेन्सेस देखिल करायची संधी मिळाली. आणि त्याला झी टॉकीजने पूर्ण साथ दिली. ‘साडे माडे तीन’ चित्रपटाव्दारे दिग्दर्शक म्हणून मी उभा राहूई शकलो. झी टॉकीज पाठीशी असल्यानं चित्रपटावर पूर्णत: लक्ष केंद्रित करता आलं. तो चित्रपट कसा चालेल, त्याच्या वितरणाची, प्रमोशनची सगळी जबाबदारी झी टॉकीजने उचलल्यानं आणि प्रशांत घैसास सारखा निर्माता बरोबर असल्यानं मी निश्चिंतपणे दिग्दर्शनाची धुरा सांभाळू शकलो. या चित्रपटाच्यावेळी मी आणि सचित पाटीलने आधी संपूर्ण पेपरवर्क तयार केलं होतं. त्यामुळे अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, हे तिघे महारथी असतानाही आम्ही संथपणे आणि समर्थपणे चित्रपटाची धुरा सांभाळू शकलो. आता ‘झकास’ चित्रपट करताना मी गेले वर्षभर केवळ या चित्रपटावत लक्ष केंद्रित करून होतो. पूर्ण चित्रपटाचे पेपरवर्क तयार झाल्यानंतर आम्ही चित्रीकरणाला सुरवात केली. ‘झकास’मध्ये मी दिग्दर्शनाबरोबरच प्रमुख भूमिकाही सांभाळणार होतो. परंतु सगळे पेपरवर्क तयार असल्याने डीओपी संय्य जाधव आणि मी कॅमेरा आता कुठे आणि कसा फिरणार याबाबत एका लाईवर असायचो.

ankush chodhari

* अ‍ॅक्टिंग करताना तुझ्यातला दिग्दर्शक अभिनेत्यावर प्रभावी ठरतो, असं वाटतं?
- मला वाटतं, माझ्यातल्या अभिनेत्याला दिग्दर्शकाकडून काय हवंय, याची नीट कल्पना असते. तसेच माझ्यातील दिग्दर्शकाला माझ्यातल्या अभिनेत्याची मर्यादा आणि त्याची शक्तिस्थाने नीट माहित असल्याने कुणावरच कुणीही हावी होण्याचा प्रश्न येत नाही.

नाटकाकडे आता साफ पाठ फिरवलीयस असं काहींचं म्हणणं आहे, त्यावर काय सांगशील ?
- मी नाटकाकडे साफ पाठ फिरवली असं अजिबात नाही. चांगली भक्कम भूमिका असेल तर नक्कीच मी ती स्वीकारेन. नुकतेच हर्बेरियमच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ नाटकासाठी सुनीव बर्वेने विचारले होते. परंतु मी तेव्हा ‘झकास’च्या कामात अत्यंत गर्क होतो आणि एखाद्या गोष्टीला आपल्याला शंभर टक्के न्याय देता येत नसेल तर समोरून विचारलेय म्हणून केवळ मैत्रीखातर हो म्हणायचे माझ्या तत्वात बसत नाही. अनेक भूमिका मला याच कारणाने सोडाव्या लागल्या.

* मराठी चित्रपटात अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून वावरताना मराठी चित्रपटांचं मर्म कशात आहे असं वाटतं?
- मराठी चित्रपटांचं मर्म त्याच्या कथेत आहे. आजवरचा कुठलाही हिट चित्रपट पहा, तुम्हाला याचं उत्तर सापडेल. मराठी प्रेक्षकाला सर्वात आधी भावते ती गोष्ट, त्यानंतर स्टारकास्ट ट्रिटमेंट आणि लुक.अर्थपूर्ण, आशयघन चित्रपट यांच्याइतकीच निखळ मनोरंजक चित्रपटाची गरज आजच्या सर्वसामान्य प्रेक्षकाला जास्त आहे. त्यामुळेच रोजच्या धकाधकीतून आणि ताणतणावातून त्याची मुक्तता करून देणा-या, दोन घटका त्याला सगळ्या दैनंदिन विवंचनातून बाहेर काढणा-या मनोरंजनाची खरी गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न ‘झकास’च्या निमित्ताने मी केला, असं मला वाटतं.

* ‘झकास’ बद्द्ल आणखी काय सांगशील ?
- ‘झकास’ ही रोमॅंटिक फनफिल्म आहे. सामान्य प्रेक्षकाला दोन तास खदखदून हसवणारा आणि संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारा चित्रपट मला बनवायचा होता आणि तसा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. माझा हा ‘झकास’ प्रयत्न प्रेक्षकाच्या चेह-यावर हसू फुलवू शकला तर माझे सार्थक झाले असे मी म्हणेन! ‘झकास’ ही आजच्या तरूणाची कथा आहे. ज्याचं स्वप्न शहरात येऊन आपलं नीट बस्तान बसवण्याचं आहे. मात्र शहरात जाऊन नोकरी मिळवायची तर राहण्याची गैरसोय..ही सोय जमवली तर ग्रामीण लुक आडवा येतो. या सगळ्यातून मार्ग काढत या चित्रपटाचा नायक ‘झकास’ शक्कल लढवतो. त्याची ही शक्कल प्रेक्षकांना तुफान हसवेल, अशी खात्री आहे.

ankush chodhari

* ‘झकास’चा युएसपी काय आहे?
- ही कथा जरी तरूणांची असली तरी तो केवळ तरूणांचाच चित्रपट नाही. हा संपूर्ण कुटुंबाला हसवणारा, त्यांचे निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. ‘झकास’ ही ‘त्याची’ कथा आहे. तो शहरात आला ते कष्ट करून..घाम गाळून..पैसे कमवायला! लहानपणी शिकवलं होतं. माणसाला रोजच्या जगण्यासाठी फार काय लागतं? त्याची मुलभूत गरज असते ती अन्न, वस्त्र आणि निवारा..! त्यासाठीच खरंतर तो शहरात आला पण शहरात आल्यावर त्याची गरज झाली...रोटी, गाडी आणि मकान! शहरात आल्यावर त्याची मैत्री झाली तीन तरूणींशी. या तिघींनी त्याला शहरात बस्तान बसवायला त्याला मदत केलीय. तिघीही त्याच्यावर जिवापाड प्रेम करताहेत. पण या तिघी एकत्र आल्या तर...तर त्याचं काय होईल? दीपक नायडू यांची कथा, नितीन दिक्षित यांची पटकथा आणि संवाद, संजय जाधव यांचे छायांकन, अभिजीत कवठाळकरचे संगीत, अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील जितेंद्र जोशीची गीते, अशा विविध रंगानी नटलेली ही ‘झकास’कॉमेडी असून अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, पूजा सावंत, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, विकास समुद्रे यांच्या यात मह्त्वाच्या भूमिका आहेत. तर अतुल परचुरे, जयवंत वाडकर यांनीही यात बहार उडवलीय. नव्या वर्षाचा मनोरंजनाचा हा जबरदस्त फुलटॉस अर्थात ‘झकास’ घेऊन झी टॉकीज महाराष्ट्रभरात अवतरत आहे.

 

 
 
 

Other Interview link