Sign In New user? Start here.

मराठी पाऊल पड्ते पुढे

 
 
 

मिफ्ता या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याबद्द्ल बोलतांना निर्मात्या म्हैसकर म्हणाल्या की, " मिफ्ताने मराठी फिल्म जगताला, मराठी लोकांना एका इंटरनॅशनल पातळीवर नेण्याचं जे काम हाती घेतलंय. जे मला खूप आवडलेली गोष्ट आहे. ज्यातून मराठी रंगभूमी, चित्रपट त्यातील कलाकारांना ग्लोबल पातळीवर नेलं जातंय, गेल्यावर्षी दुबईत होतं यावर्षी लंडनला आहे. याला आपण असं म्हणू शकतो की आपण एक एक पाऊल पुढे चाललोय.

परदेशात होणा-या या सोहळ्याच्या माध्यमातून मराठी सिनेमाचा कितपत विकास होईल असं तुम्हाला वाटतं?यावर त्या म्हणाल्या की, खरंतर या पुरस्कार सोहळ्यामुळे मराठी सिनेमाचा विकास होईलंच असं म्हणता येणार नाही. पण सगळ्या लोकांना त्याची ओढ राहते की पुढच्या वर्षी मिफ्ता होणार आहे. त्याच्यासाठी उत्तम सिनेमे बनवायचे आणि करत असलेल्या कामाचा दर्जा वाढविला जाईल. शिवाय याचं प्रोत्साहन मिळेल सर्वाना.....

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात त्या कशा आल्यात, याची सुरवात कशी झाली याबद्द्ल सांगताना त्या म्हणाल्या की, "मुळात ही माझी आवडच होती. तसं पाहिलं तर एक वेगळा विषय घेऊण चित्रपट करावा अशी कायम माझी इच्छा होती. मी चित्रपट बघातांनाही जे नॉर्मल चित्रपट असतात ते बघत नाही. वेगळे विषय असणारे चित्रपट मी नेहमी बघते. आणि ज्या पद्धतीने सुखांतचा विषय माझ्यासमोर आला इच्छा मरणाचा मला खूप आवडला. स्क्रिप्ट आवडली. आणि जर करायचा तर मग असा चित्रपट करायचा. अशी इच्छा होती. ती ‘सुखांत’च्या पूर्ण झाली. मी मुळात आर्टीस्ट असल्याने कला माझ्यात भिनलेली आहे. माझ्या घरातल्यांचा सपोर्टही मिळाला आणि फायनॅनशिअल सपोर्ट सुद्धा मिळाला. म्हणून मी निर्मिती क्षेत्रात आले.

फाईन आर्ट आणि एक शास्त्रीय नॄत्य कलाकार तुम्ही आहात त्याबद्दल काय सांगाल ? यावर त्या म्हणतात की, " या क्षेत्राला मरण नाही. आयुष्यभर तुम्ही त्यात शिकू शकता आणि त्यात प्रोग्रेस करू शकता. प्रत्येक मुलांनी कुठला तरी आर्ट फॉर्म शिकावा अशी माझी इच्छा आहे. मलाही दोन मुली आहेत. दोघीही आज नृत्य शिकतात. मला ते एक पर्सनल लिव्हिंग असतं. एखादा आर्ट फॉर्म स्वत:मध्ये असणं म्हणजे पर्सनल प्रोग्रेस असं मला वाटतं. mifta

तुमच्यातील या कलांचा चित्रपट निर्मिती करताना कसा फायदा झाला? असं विचारता त्या म्हणाल्या की, " खरंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात मी नवीनच होती. ‘सुखांत’ हा चित्रपट तसं पाहिलं तर माझ्यासाठी शाळाच होता. आणि कलांचा फायदा म्हणजे स्क्रिप्ट, कथानक, अभिनय हे मला कळतं त्यामुळे कुठे ना कुठे त्याचा फायदा होतंच गेला. मला या चित्रपटाचं स्क्रिप्ट खुप आवडलं होतं.

‘सुखांत’ नंतर कुठल्या कलाकृती तुम्ही निर्मित केल्यात? यावर त्या म्हणाल्या की, " ‘सुखांत’नंतर झी टॉकीजबरोबर तेंडुलकर आऊट करून झालाय. आणि सध्या ‘चालीस चौरासी’ हा हिंदी चित्रपटाची निर्मिती मी केली आहे. त्याचं शूटींग पूर्ण झालं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘मिफ्ता’च्या माध्यमातून आणखी काय केलं जावं असं तुम्हाला वाटतं? यावर त्या म्हणाल्या की, "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उत्तम चित्रपटाची निर्मिती व्हावी. त्यानंतर पुढची दारं ओपन होतील असं मला वाटतं. शिवाय यांचा थिएटरकडे पण कल असायला पाहिजे. चित्रपटांबरोबरच रंगभूमीचाही विकास होणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे अनेक चांगले आणि दिग्गज थिएटर आर्टीस्ट आहेत. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच त्यांनाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं.

बदलत्या मराठी सिनेमाबद्द्ल सांगतांना त्या म्हणाल्या की," खरंतर खूप चांगलं पाऊल पडतंय सगळीकडे असं वाटायला लागलंय. माझं सुरवातीपासून मत होतं की, मराठी कलाकार हे उत्तम कलाकार आहेत. आज जर कुठलाही हिंदी चित्रपट तुम्ही बघीतला तर त्यात मराठी कलाकार एखाद्या चांगल्या भूमिकेत असतोच. मराठी विक्रम गोखलेंना घ्या ते अमिताभ बच्चन यांना तोडीस तोड अभिनय करतात. याचं उदाहरण ‘खुदा गवाह’ चित्रपटातून आपल्याला पहायला मिळालं, त्यानंतर ‘अग्निपथ’ मधून पहायला मिळालं. म्हणजे "आय टू आय रोल" होता तो. आता आपल्याकडे खूप गोष्टी कळायला लागल्या आहेत. सद्याचाच ‘बालगंधर्व’ बघा, त्यात सुबोध भावेने काय अभिनय केलाय. तसंच हरिश्चंद्राची फॅक्टरी बघा काय दिग्दर्शन, काय अभिनय की तुम्ही भारावून जाता. परेश मोकाशी ने तर १९३१ चा काळ अगदी तसाच आपल्यासमोर उभा केला आहे. हे खरंच खूप चांगले बदल आहेत मराठी सिनेमातले...आणि आपण हेही दाखवतो की असे विषय घेऊन आम्ही चित्रपट करू शकतो आणि ते यशस्वीही करतो. आणि आपल्याकडे हे सगळं करण्याची क्षमता आहे. बॉलिवूडमध्ये कसं सगळं शान शौकीन असतं. पण आपल्याकडे रिअलिस्टीक विषयांना आता हाताळलं जातंय.

भविष्यात निर्मितीचे काय प्लॅन्स आहेत? यावर त्या म्हणाल्या की, उत्तम स्क्रिप्टवर काम करणं मला नक्की आवडेल. वेगळ्या जॉनरचा चित्रपट करायला आवडेल. घाई अगदी करणार नाही. एकामागून एक चित्रपट काढत बसणार नाही. चांगल्याच चित्रपटांची निर्मिती मी करणार आहे.

-अमित इंगोले.