Sign In New user? Start here.

आशा भोसले

 

Asha Bhosle

आशा भोसले

आशा भोसले ह्या भारतातील एक सुप्रसिद्ध गायिका व भारताच्या भारतरत्‍न गानकोकीला लता मंगेशकर यांच्या छोट्या बहिण. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला.  त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे मराठी रंगभुमीशी जवळचे नाते होते. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षीच वडिलांची छत्रछाया हरविल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी आशाजींवर व लताजींवर आली. त्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब मुंबईला आले. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी दोन्ही बहीणींनी अभिनयाबरोबर गायनालाही सुरुवात केली.

वयाच्या सोळाव्या वर्षी कुटुंबाच्या इच्छे विरुद्ध जाऊन त्यांनी ३१ वर्षींय गणपत भोसले यांच्या बरोबर लग्न केले. पण त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही आणि त्यांना पुन्हा आपल्या घरी पुण्याला यावे लागले. तोपर्यंत गीता द्त्‍त,  शमशाद बेगम आणि लता मंगेशकर चित्रपटांमध्ये पाश्वगायिका म्हणुन नावारुपाला आल्या होत्या.

आशा भोसलेंनी १९४३ साली संगीत दिग्दर्शक दत्‍ता डावजेकर यांच्या ’माझे बाळ’ या मराठी चित्रपटातील ’चाल चाल नव बाळा’ गाण्यापासुन आपल्या चित्रपट करियला सुरुवात केली. १९४८ साली ’चुनरिया’ चित्रपटामध्ये ’सावन आया’ या गीतापासुन त्यांनी आपल्या हिन्दी चित्रपट करियला सुरुवात केली. पण १९५७ साली निर्माता-निर्देशक बी. आर. चोपडा यांचा ’नया दौर’ हा आशाजींचा पहिला सुपरहिट चित्रपट. या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायिलेली गीते भरपुर लोकप्रिय झाली, ज्यामध्ये ’मांग के साथ तुम्हारा’, ’उडें जब जब जुल्फें तेरीं’ या गीतांचा समावेष होता. या चित्रपटाच्या लोकप्रियते नंतर बी. आर. चोपडा यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधील गाणी आशाजींकडूनच गाऊन घेतली. त्यामध्ये वक्‍त, गुमराह, हमराज, आदमी और इंसन आणि धुंध हे चित्रपट होते. १९६६ साली ’तीसरी मंजिल’ मध्ये आर. डी. बर्मन यांनी संगीत दिलेल्या ’आजा आजा मैं हू प्यार तेरा..’ ह्या गाण्यामुळे त्यांना भरपुर प्रसिद्धी मिळाली. तीसरी मंजिल मध्ये त्यांनी ’ओ हसीना जुल्फों वाली’, ’और ओ मेरे सोना रे’ ही गीते सुद्धा गायिली. आशाजींनी गायिलेले गीते सफल झाल्यानंतर आर. डी. बर्मन जास्त करुन आपल्या संगीतातील गाण्यांसाठी त्याचीच निवड केली. १९८० साली आशाजींनी आर. डी. बर्मन यांच्या बरोबर विवाह केला.

सत्‍तरच्या दशकात हिन्दी चित्रपटातील प्रसिद्ध कॅब्रे डांसर हेलन यांच्यासाठी आशा भोसले यांचा आवाज अगदी हक्काचा समजला जायचा. आशा भोसलेंनी हेलनसाठी ’तिसरी मंजिल’(१९६६) मध्ये ’ओ हसीना जुल्फों वाली’, १९७१ साली  ’कारवां’ मध्ये ’पिया तू अब तो आजा’, १९७२ साली ’मेरे जीवन साथी’ मध्ये ’आओ ना गले लगा लो ना’ आणि १९७८ साली ’डॉन’ मध्ये ’ ये मेरा दिल यार का दीवाना’ अशी सुपरहिट गाणी गायिली.

आशा भोसलेंना पाश्वगायिका म्हणुन ७ वेळा फिल्म फेयर अवार्ड मिळाले ते असे
१९६६ ’दस लाख’ मध्ये ’गरीबों की सुनो’,
१९६८ ’ शिकार’ मध्ये ’पर्दे में रहने दो’,
१९७१ ’कारवां’ मध्ये ’पिया तू अब तो आजा’,
१९७२ ’हरे रामा हरे कृष्णा’ मध्ये ’दम मारो दम’,
१९७३ ’नैना’ मध्ये ’होने लगी है रात’,
१९७४ ’प्राण जाय पर वचन न जाय में’ मध्ये ’चैन से हमको कभी’,
१९७८ ’डॉन’ मध्ये ’ये मेरा दिल यार का दीवाना’ या गाण्यांसाठी.

१९८१ साली ’उमराव जान’ मध्ये गायिलेल्या ’दिल चीज क्या है’ या गजलसाठी आणि १९८६ साली ’इजाजत’ मध्ये ’मेरा कुछ सामान तुम्हार पास पडा है।’ या गीतासाठी आशा भोसलेंना नेशनल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. आशाजींना १७ वेळा महाराष्ट्र राज्याकडुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ह्याच्याशिवाय त्याना बरेच अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत, ज्यामध्ये नाइटेंगल ऑफ एशिया अवार्ड १९८७, मध्यप्रदेश सरकार कडुन १९८९ साली लता मंगेशकर अवार्ड, १९९७ साली ’जानम समझा करो’ या एलबम साठी स्क्रीन वीडियोकोन अवार्ड, एम टी. वी. अवार्ड, चॅनेल वी अवार्ड, १९९९ साली महाराष्ट्र सरकार कडुन लता मंगेशकर अवार्ड, २००० साली सिंगर ऑफ मिलेनियम दुबई, २००२ साली बीबीसी लाइफ टाइम एचिवमेंट अवार्ड, यांसारख्या अनेक राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय अवार्डचा समावेष आहे.

२००१ मध्ये आशा भोसलेंना फिल्म जगतातला सर्वोत्‍त्म ’दादा साहेब फाळके’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. गेल्या सहा दशकामध्ये आशाजींनी १२००० पेक्षाही जास्त गाणी गायिली आहेत. हिन्दी शिवाय त्यांनी मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिल, मलयालम या भाषेंमध्ये ही गीते गायिली आहेत. तसेच इंग्रजी आणि रुसी मध्ये सुद्धा त्यांनी गाणी गायिली आहेत.