Sign In New user? Start here.

Ashok Saraf

अशोक सराफ

अशोक सराफ यांचा जन्म ४ जून रोजी मुंबई मध्ये झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी. जी. टी. विद्यालयातुन त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची आवड होती. शिरवाडकरांच्या ’ययाती आणि देवयानी’  या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेने त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी रंगभूमीवर प्रवेश केला. १९७१ साली गजानन जहागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटाने त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. आणि १९७८ साली ’दामाद’ या चित्रपटातुन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

१९७५ साली दादा कोंडकेच्या ’पांडू हवालदार’ मधील हवालदाराची भूमिका गाजली. पांडू हवालदारमध्ये थेट दादांशी अभिनयाची जुगलबंदी करताना त्यांनी आपला ठसा उमटवला.तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांचे प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले.  ऐंशीच्या दशकात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला. आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. त्यांच्या सशक्त अभिनयासाठी उज्वल ठेंगडी दिग्दर्शित 'वजीर' पहायला हवा. राजकारण्यांची देहबोली त्यांनी अगदी हुबेहुब साकारली आहे.

अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवर्‍याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा पासून अलीकडच्या शुभमंगल सावधान आई नं.१ व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले.

’नवरी मिले नव-याला’, ’बीन कामाचा नवरा’, ’प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ’माझा पती करोडपती’, ’अशी ही बनवाबनवी’, ’भुताचा भाऊ’, ’बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ’धम्माल बाबल्या गणप्याची’, ’आमच्या सारखे आम्हीच’, ’नवरा माझा नवसाचा’, ’शुभमंगल सावधान’, ’साडे माडे तीन’ असे अनेक गाजलेले मराठी चित्रपट त्यांनी केले आहेत. तसेच ’करण अजुन’, ’गुप्त’, ’कोयला’, ’यस बॉस’, ’प्यार किया तो डरना क्या’, ’बंधन’, ’जोडी नं १’ ह्यासारखे हिन्दी चित्रपट ही त्यांनी केले आहेत. आणि अजुनही करत आहेत.

मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमात मध्ये सारखाच संचार अजूनही सुरू आहे. त्यांनी प्रत्येक माध्यमात अभिनयासाठी अनेक पारितोषिके आणि पुरस्कार मिळविले आहेत. ’हम पांच’ या झी वाहिनीवरील मालिकेने त्यांना विषेश लोकप्रियेता मिळवून दिली.


सात वर्षा नंतर अशोक सराफ यांनी 'अनधिकृत' या नाटकाद्वारे पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केले. ’सारखं छातीत दुखतंय’ ह्या  विनोदी नाटकामध्ये पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ यांनी सहकलाकर म्हणुन काम केले आहे. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करुन 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या.