Sign In New user? Start here.

मराठी फिल्म इंडस्ट्रीत ‘मिफ्ता’चं वेगळं स्थान

Bharat Patil interview

मराठी फिल्म इंडस्ट्रीत ‘मिफ्ता’चं वेगळं स्थान

 
 
 

मिफ्ता या पुरस्कार सोहळ्याची मुळ संकल्पना ही राजाराणी ट्रॅव्हल्सचे संचालक अभिजीत पाटील यांची असून त्यांच्या या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी पाठिंबा दिला. राजाराणी ट्रॅव्हल्स हे या सोहळ्याचे ट्रॅव्हल पार्टनर तर आहेतच शिवाय को-प्रमोटर्स सुद्धा आहेत. त्यानुसार त्यांच्याकडे या सोहळ्यासाठी येणा-या प्रत्येकाच्या व्यवस्थेची जबाबदारी, म्हणजेच हॉटेल व्यवस्था, व्हिसा, इव्हेंट लोकेशन आदी अनेक महत्वाच्या जबाबदा-या त्यांना पार पाडाव्या लागतात. एकूण ३५० लोकांना सोबत नेणार असल्याने त्यांच्या व्हिसा प्रोसेस कशा होतात? त्यात काय अडचणी येतात ह्याबद्द्ल आणखी जाणून घेण्यासाठी राजाराणी ट्रॅव्हल्सचे कार्यकारी संचालक भरत पाटील यांच्याशी केलेली बातचीत.....

मिफ्ताबद्द्ल बोलतांना राजाराणी ट्रॅव्हल्सचे कार्यकारी संचालक भरत पाटील यांनी सांगितले की, " It is a Platform of marathi industry. आज दादासाहेब फाळके हिंदी इंडस्ट्रीचे निर्माते म्हणून ओळखले जातात. ते मराठीसाठी ओळखले जात नाही. Take it to that मिफ्ता हा उपक्रम आम्ही सर्वांनी हाती घेतला. माझे मोठे भाऊ अभिजीत पाटील यांची ही संकल्पना असून त्यासाठी महेश भाई ताबडतोब पुढे आले आणि त्यांनी या सर्वासाठी सपोर्ट करण्याचे ठरविले. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, पहिल्या वर्षातंच मिफ्ताला प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा अतिशय जोरदार प्रतिसाद लाभला. आणि आज मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिफ्तानं एक वेगळं स्थान आणि नाव निर्माण केलं आहे.

या सोहळ्यातील त्यांची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले की, " मला सांगाताना खूप अभिमान वाटतो आहे की, राजाराणी ट्रॅव्हल्स फक्त या सोहळ्याचे ट्रॅव्हल पार्टनरंच नाहीतर को-प्रमोटर्स सुद्धा आहोत. पण जरी आम्ही प्रमोटर्स असलो तरी मिफ्तासंबंधीचा आमचा मेजर रोल हा लॉजेस्टीकचा आहे. नवीन लोकेशन, हॉटेल, व्हिसा क्लिअर करणं, ट्रॉन्सपोर्ट कॉर्डिनेशन हे सर्व आम्ही सांभाळतो. आणि जो मेन शो आहे त्याचं श्रेय हे महेश भाईंना जातं.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकारांना एकत्र सोबत नेणं, त्यांच्या व्हिसा प्रोसेस पूर्ण करणं सोपं काम नाहीये, कसं केलं जातं हे सर्व? त्यात अनेक अडचणी येत असतील? असं विचारता ते म्हणाले की, " अडचणी येतात असं नाही म्हणूया.....!कारण आज जेव्हाही एखादा व्हिसा रिजेक्ट झाला तर आपण काऊंन्सिलेटला शिव्या घालायला लागतो. हा त्यांच्यावर एक धब्बाच झाला आहे. पण त्यांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, लिमिटेशन आहेत. We have to respect that. आता युके कांऊन्सिलेटबद्द्ल असं बोललं जात होतं की, ते लवकर व्हिसा देत नाहीत. उशिर करतात वैगेरे....मात्र युके कांऊन्सिलेट बरोबर आमचं खूप चांगलं को-ऑर्डिनेशन झालं. त्यांनी खूप मदत केली व्हिसासाठी...मिफ्तासाठी येणा-यांचे ३६० च्या जवळपास व्हिसा पास झाले असून त्यातील दोन ते तीनच व्हिसाज रिजेक्ट झाले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका एका आठवड्याच्या आत ह्या व्हिसा प्रोसेस कम्प्लिट करण्यात आल्या.

मिफ्ताच्या व्हिसासाठी नेमकी काय प्रोसेस आहे याबद्द्लही त्यांनी सांगितले, ते म्हणाले की, " मिफ्तामध्ये दोन प्रकारचे व्हिसाज असतात. एक म्हणजे रेग्युलर टुरिस्ट व्हिसा आणि दुसरा म्हणजे एण्टरटेनर व्हिसा....हा व्हिसा या सोहळ्यात परफॉर्मन्स करणा-या सर्वांकडे असणं आवश्यक असतो. या दोन्ही कॅटेगरीज मध्ये आपल्याला फक्त दोन किंवा चार रिजेक्शन्स आलीत. हे युके कांऊन्सिलेटच्या इतिहासात प्रथमच घडलं आहे.

गेल्यावर्षीचा प्रतिसाद पाहता यावेळी कलाकारांबरोबरच किती प्रेक्षकांनी व्हिसासाठी अप्लाय केलं? यावर ते सांगतात की, " गेल्यावर्षीचा प्रतिसाद बघता आम्ही कलाकरांना सोबत नेण्याची क्षमता दोनशेवर जाऊ नये असं ठरवलं होतं. पण ह्यावर्षी इंडस्ट्रीचा प्रतिसाद इतका मिळाला की, फक्त इंडस्ट्रीमधून जवळ जवळ सव्वा तीनशे लोकं यावेळी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे अनेक टूरिस्ट ज्यांना मिफ्ता टीमसोबत यायचं होतं, ती संख्या आम्ही वाढवू शकलो नाही. तरीसुद्धा आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, ६५च्यावर टूरिस्ट आम्हाला जॉईन करताहेत. हाच आकडा शंभर, सव्वाशेच्यावर जाऊ शकला असता पण जे कलाकार तिथे परफॉर्म करणार आहेत त्यांना सोबत न घेणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळे आधी इंडस्ट्री करिता व्हिसाज ओपन केले त्यानंतर टूरिस्टसाठीची प्रोसिजर आम्ही सुरू केली. आता आमची जी काही हॉटेलची, तिकीटची कपॅसिटी होती ती संपली आहे.

लंडनमधील मराठी लोकांसाठी हा सोहळा कसा यादगार ठरेल याबद्दलही ते सांगतात की, " एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी इंडस्ट्री अशी एकत्रीत कधीच देशाच्याबाहेर गेली नाहीये. पहिलाही प्रयत्न आम्ही दुबईला केला होता. गेल्यावर्षी २०० कलाकार आम्ही सोबत घेऊन गेलो. पण ह्यावर्षी ३५० च्यावर ती संख्या जाऊन पोहचली आहे. आणि त्यात अनेक मोठ मोठी माणसं असल्याने हा सोहळा सर्वांसाठी नक्कीच यादगार होईल हे तितकंच खरं आहे. त्याशिवाय हा सोहळा आणखी एका गोष्टीने लक्षात राहणार आहे. ती म्हणजे या सोहळ्याचं व्ह्येन्य़ू इंडिगो-२ थिएटर. या थिएटरमध्ये मायकल जॅक्सन, मॅडोना अशा प्रसिद्ध कलावंताचे शो झाले आहेत. आता मराठी इव्हेंट आहे म्हणून एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये न घेता तो सर्वांच्या लक्षात रहावा म्हणून एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये घेण्याचं महेश भाईंनी ठरवलं. करायचं तर मोठ्या तो-यात करा नाहीतर नका करू अशी त्यांची भूमिका आहे. शिवाय यावर्षी सोहळ्या दरम्यान केल्या जाणा-या कार्यक्रमाची थिमही अतिशय वेगळी असून प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल.

सोहळ्याला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. एकंदर सर्व प्रोसेसची काय स्थिती आहे? यावर ते म्हणतात की, " अजूनही आम्हाला अतिशय जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आजही अनेक अॅहप्लिकेशन व्हिसासाठीचे येत आहेत. पण ज्यांचे व्हिसा व्हॅलिड आहेत त्यांच्या प्रोसेस आम्ही सध्या करतोय. पण जसं तुम्ही म्हणालात की काहीच दिवस शिल्लक राहिलेत त्यानुसार आज नंतर आम्ही कुठलेही व्हिसा प्रोसेस करणार नाहीये.

एकंदर काय तर मिफ्ता सोहळ्याचं हे दुसरंच वर्ष असून कलाकारांबरोबरंच प्रेक्षकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. त्यानुसार यावर्षी मिफ्ताला येणा-या कलाकारांची संख्या वाढून ३५० च्यावर गेली. शिवाय अजूनही लोकांचे अर्ज येणं सुरूच आहेत. म्हणजेच काय तर पुढे या सोहळ्याला आणखीही मोठा प्रतिसाद मिळणार असून मराठी चित्रपट आणि रंगभूमीच्या आपल्या पारंपारिक विश्वात या सोहळ्याला एक वेगळंच महत्व मिळणार आहे.

-अमित इंगोले.