Sign In New user? Start here.

भरपूर मनोरंजनाने भरलेली ‘येड्यांची जत्रा’ भरत जाधव

भरपूर मनोरंजनाने भरलेली ‘येड्यांची जत्रा’ भरत जाधव

 
 
 

सध्या मराठी इंडस्ट्रीतला आघाडीचा अभिनेता म्हणजे भरत जाधव. मालिका, नाट्क आणि चित्रपट अशा अनेक माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याची मुख्य असलेला ‘येड्यांची जत्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. या चित्रपटाची संकल्पना काय आहे, त्याची भूमिका काय आहे याबाबत त्याच्याची केलेली ही खास बातचीत....

* तुझी मुख्य भूमिका असलेल्या ‘येड्यांची जत्रा’ या चित्रपटाची संकल्पना काय आहे?

- हा चित्रपट टोटली कमर्शिअल आणि भरपूर मनोरंजनाने भरलेला असा आहे. या चित्रपटाचा विषय खुप चांगला आहे. ज्यात अजून कुणी हात घातलेला नाहीये आणि कुणी केलाही असेल तर तो एक संदेश म्हणूनच केला असेल. पण आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मॅसेज तर देतच आहोत. सोबतच हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी विनोदी ढंगाने आम्ही तो लोकांसमोर आणतो आहोत. त्यामुळे खुप धमाल या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

bhart jadhav yedyanchi jatra

* या चित्रपटात तू हा-याची भूमिका करतोय त्याबद्द्ल आम्हाला थोडं सांग.

- ज्याची जमीन वादात अडकली आहे तो म्हणजे हा-या...ज्याच्या जमीनीवर दोन गावातील लोक वाद करतात. तो हा हा-या...ती जमीन परत मिळवण्यासाठी त्याची होत असलेली ससेहोलपट मी साकारतोय. या चित्रपटात मी खुठेच विनोद करत नाही. जमीन परत मिळवण्यासाठी जी धडपड मी करतो त्याची गावातील लोक कशी वाट लावतात हे यात आहे.

* या चित्रपटाचे दिग्दर्शक नवीन आहे आणि अभिनेत्री सुद्धा नवीन त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

- नवीन नवीन असं काही नसतं. खरंतर जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हाच आवडली. त्याचं काम त्याच्या स्क्रिप्ट मधूनच पुढे आलं. मुळात हा विषय वेगळा होता आणि त्याकडे अशा पद्धतीने कुणी बघेल असं वाटलं नव्हतं. त्या विषयावर त्याने खुप चांगलं काम केलंय. चित्रपटात घडणा-या घटना त्याने अशा गमतीशीर आणल्यात की, वाचतांनाच आम्हाला खुप हसायला येत होतं. त्यामुळे चित्रपट पाहतांना आणखीन जास्त मजा लोकांना येईल. त्याचा पहिला जरी चित्रपट होता तरी तो डोक्याने क्लिन होता की, त्याला काय करायचं आहे. शिवाय नवखेपणाचा पहिलाच दिवस असतो. स्नेहा विषयी बोलायचं झालं तर तीने सुपरस्टार या कार्यक्रमातून स्वत:ला सिद्ध केलंच आहे. नवीन किंवा जुनं महत्वाचं काय आहे की, डायलॉगची समज असणं महत्वाचं असतं. आजही जुने भरपूर लोकं आहेत ज्यांना डायलॉगची समज नाहीये. तुम्हाला एखादा सीन दिला त्या सीन अर्थ काय आहे. तो तुम्हाला कळायला हवा. ते तिला चांगलं माहिती होतं.

* प्रेक्षकांना काय सांगशील ?

- सरकारच्या ग्राम स्वच्छतेसाठी अशाही काही योजना आहेत हे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळेल. शिवाय धमाल कॉमेडी सुद्धा पहायला मिळेल. प्रेक्षकांनी ह चित्रपट नक्की बघावा.

अमित इंगोले