Sign In New user? Start here.

हॅट्स ऑफ टू महेश आणि अभिजीत

हॅट्स ऑफ टू महेश आणि अभिजीत

 
 
 

अनेक हिंदी/मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटातून सर्वांच्याच परिचीत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी ‘मिफ्टा-२०११’ सोहळ्यासाठी नाटक विभागासाठी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या परिक्षणाची एकंदर प्रोसेस काय असते? त्यांचं या सोहळ्याबद्दलचं मत काय आहे? हे जाणून घेण्यासाठी या सोहळ्याच्या निमित्ताने भारती आचरेकर त्यांच्याशी केलेली बातचीत....

एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी कलेचा सन्मान करणा-या मिफ्टा सोहळ्याबद्द्ल काय वाटतं हे सांगताना त्या म्हणाल्या की," हा सोहळा म्हणजे फारच मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. पण मराठी सिनेमा आणि मराठी थिएटरची परंपरा बघता हे आधीच कुणीतरी करायला हवं होतं. पण उशिरा का होईना हे सुरू करण्यात आलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. मागच्यावर्षी मी काही कारणास्तव या सोहळ्याला जाऊ शकली नाही. पण जेव्हा मी ते बघीतलं तेव्हा अक्षरश: माझे डोळे दिपले. ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’च्या अभिजीत पाटीलचा आणि महेशचा Effort पाहून अगदी अभिमानाने उर भरून आला. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे नुसतंच लोकांना घेऊन जाणं आणि बागडणं नसून त्यातून काहीतरी भव्यदिव्य उभं राहिलं याचाच खूप आनंद झाला. त्यातही ते नुकतंच उभं राहिलंय, सर्वांचं भरभरून मनोरंजन सुद्धा केलंय. आपण हिंदीत अनेक मोठे सोहळे बघतो पण त्याचबरोबरीचा मराठीत सोहळा होतोय हे मला खूप जास्त अभिमानाचं वाटतंय. आणि या उपक्रमासाठी "हॅट्स ऑफ टू महेश अॅहन्ड अभिजीत".

या सोहळ्यात नाटक विभागासाठी त्या परिक्षक म्हणून काम पाहिलं, त्याबद्द्ल सांगतांना त्या म्हणाल्या की," नाटक विभागासाठी आम्ही तीन परिक्षक होतो. जे अर्ज या पुरस्कारासाठी आलेत त्यातून काही नाटकं आम्ही निवडून दिली. एकूण दहा नाटकांची निवड आम्ही केली आणि या नाटकांचा एक महोत्सवही पार पडला. मिफ्तासाठी परिक्षक म्हणून काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता.

नाटक निवडण्याच्या एकंदर प्रोसेस मध्ये तीन परिक्षकांत कधी वाद होतो का? असं विचारता त्या म्हणाल्या की," कधी कधी होतात, पण एक सेन्सिबिलीटी जी असते ना की, कधी प्रेक्षक म्हणून नाटक बघणार, कधी परिक्षक म्हणून बघणार. मी एक कलाकार म्हणून बघेल, श्रीरंग लेखक म्हणून बघेल, जयंत समीक्षक म्हणून बघेल. तेव्हा या सर्वांचं मत कुठेतरी एकत्र येईलच ना..! खूप मोठी फळी निर्माण होत नाही, म्हणजे मी १ गुणांवर आहे आणि दुसरा १० गुणांवर आहे, असं होत नाही. दोन विरूद्ध गोष्टी कधी कधी एकत्र येतात. आणि त्यातही दहा नाटकांमध्ये काय दुमत होणार नाही का..?

एखादी कलाकृती तुम्हाला खूप आवडलेली असते मग अशावेळी निवड प्रक्रियेत कधी तुमचा स्वार्थ आडवा आला, असं होतं का? यावर त्या म्हणतात की, " नाही...कारण तेव्हा आम्ही परिक्षकाच्या भूमिकेत असतो. त्यामुळे तो स्वार्थ होऊ शकत नाही. जर मला नाटक आवडतं म्हणून निवड करूया असा विचारही केला तर आम्ही ते योग्यरितीने जज करू शकणार नाही. त्यात पारदर्शकता येऊच शकत नाही. आणि असाप्रकार घडला तरी ते लगेच लक्षात येतं. आणि मी काही एकटी नाहीये आणखीही लोकं असतातंच ना.....

या सर्व प्रोसेस मध्ये प्रेक्षकांच्या मतांना कितपत ग्राह्य धरल्या जातं याबाबत त्या म्हणाल्या की," नक्कीच प्रेक्षकांच्या मतांना यात ग्राह्य धरल्या जाणार आहे. पण हा टेक्निकल भाग महेश बघतो. पण हे मात्र नक्की की या प्रोसेससाठी प्रेक्षकांचीही मते ते मागवणार आहेत.

सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आल्याची चर्चा आहे. त्याबद्द्ल तुमचं का मत आहे? यावर त्या म्हणतात की, " काय आहे की जेव्हापासून सिरीअल सुरू झाल्या तेव्हापासून नाटक वाल्यांचे वाईट दिवस आले आहेच. लेखक दुभंगले गेले, दिग्दर्शक दुभंगले गेले आणि कलाकारही दुभंगले गेले आहेत. या सर्वांचे दोन्ही दगडांवर पाय आहेत. आणि त्यात निर्माते बिचारे फसाताहेत. पण सध्या काही चांगली नाटकं येताहेत. आता सुनील बर्वेचा हर्बेरिअम उपक्रमच बघा ना...अनेक जुनी नाटकं त्याने परत रंगभूमीवर आणली आहेत. त्याला प्रेक्षकही खूप चांगला प्रतिसाद देताहेत. म्हणजे काय तर चांगली नाटकं जर निर्माण झाली तर त्यांना प्रतिसाद मिळणारंच. पण प्रेक्षकांना दोष देऊन चालणार नाही. जर प्रेक्षकांना तुम्ही चांगलं दिलंच नाही तर ते का येतील?

‘मिफ्टा’सारख्या पुरस्कार सोहळ्यामुळे मराठी सिनेमा किंवा नाटकाला खरंच फायदा होईल का? यावर त्या म्हणतात की," हो नक्कीच...कारण हे सगळं पाहणारा फक्त मराठी माणूस नाहीये. सगळीच लोकं हे बघतात. जगाच्या कानाकोप-यात ह्या गोष्टी पब्लिश होतातंच. त्यामुळे मराठी सिनेमा हा ग्लोबल होणारंच असं मला वाटतं. तसाही मराठी सिनेमा हा ‘श्वास’चित्रपटाच्या माध्यमातून, ‘विहीर’च्या माध्यमातून जागतीक स्तरावर जाऊन पोचला आहेच.

या क्षेत्रात नवीन कलाकारांना काय सांगाल..असं विचारता त्या म्हणाल्या की, " नाट्य कलाकारांना मी असं म्हणेन की, खरंच ज्यांना नाटकाची कास आहे, ज्यांना नाटकांबद्दल प्रेम आहे त्यांनी सिरिअल्समध्ये पैसा मिळतो म्हणून तिकडेच जाऊ नये. आणि नुसतंच मानधन बघू नये. तसा पैसा हा मह्त्वाचाच मुद्दा आहे. कारण आज महागाई एवढी वाढली आहे त्यामुळे असं सांगूनही चालणार नाही की तुम्ही नाटकच करा. पण एकदमंच दुर्लक्ष करू नका नाटकांकडे. आज स्टेजचा अनुभव किती फायद्याचा आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. मी जास्तीत जास्त काम हिंदीत केलं आहे. आणि मी मुळात थिएटरमधून आल्यामुळे एक वेगळाच रिस्पेक्ट तिथे मिळतो. आणि थिएटरमधून आल्याचा आत्मविश्वासही तुमच्या चेह-यावर दिसतोच ना. पण या नवीन कलाकारांनाही दोष देऊन चालणार नाही कारण नाटक शिकवणा-या चांगल्या व्यक्ती आता नाहीत. विजयाबाई सारख्या व्यक्ती नाहीत, चांगल्या संस्थाही नाहीत.