Sign In New user? Start here.

व-हाड निघालंय लंडनला

व-हाड निघालंय लंडनला

 
 
 

गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा चांगलाच बदललेला दिसून येतोय. त्यात नवनवीन प्रयोग केले जात आहेत, नवीन विषय हाताळले जात आहे. त्यामुळे मराठी सिनेमा ऑस्करपर्यंत जाऊन पोहचला आहे. मराठी सिनेमातील हाच बदल, मराठीची हीच प्रगल्भता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात यावी म्हणून मराठी इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर अवॉर्ड अर्थात ‘मिफ्टा सन्मान पुरस्कार’ सोहळ्याची स्थापना झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा सोहळा लंडनमध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने या सोहळ्याचे मुख्य आयोजक आणि ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक श्री.अभिजीत पाटील यांच्याशी केलेली बातचीत....

‘मिफ्टा’चे शिल्पकार असलेल्या श्री पाटील यांनी मिफ्टाबद्दल अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या ते सांगतात की," मी ब-याच वर्षांपासून कामानिमित्ताने परदेशात फिरतोय. त्यामुळे अनेकदा बघतो की, भारताबाहेरील आणि भारतातील मराठी Second Generation आणि Third Generation हे बॉलिवूड किंवा ‘सांस बहू’ मालिकांमुळे हिंदी कार्यक्रमांकडे आणि India कडे जास्त वळायला लागली आहे. त्यामुळे आपल्या मराठी स्टार्सना थोडं International Glamour देऊन, मराठी फिल्म्स थोड्या आणखी अपग्रेड करून भारताबाहेरील तरूण मराठी मुलांना आणि लोकांना तो दाखवता येईल. सोबतच मराठी फिल्म्सना एक Global Exposure तसंच चित्रपटांच्या Shooting Opportunitiesचाही दुहेरी फायदा होऊ शकतो. हा आमचा मुख्य हेतू आहे. परदेशातील लोकांना मराठी मनोरंजनाची साधनं उपलब्ध करून देणं. सर्व मराठी लोकांना, स्टार्सना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घड्वणं. हाही यामागचा हेतू होता. यासाठी महेश भाई आणि मी चर्चा केली आणि लगेच ‘मिफ्टा’ या इंटरनॅशनल अवॉर्डची स्थापना केली. आणखी एक सांगायचं म्हणजे हा सोहळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी Paris, Switzerland, Holland या आणि इतरही देशातील मराठी मंडळांना, तसेच कंपन्यांना आम्ही या सोहळ्याच्या प्रचारासाठी, या सोहळयाला स्पॉन्सर करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. जेणेकरून ‘मिफ्टा सोहळा’ अधिक ग्लोबल होईल. मला खात्री आहे की यावेळी या सोहळ्याला युरोपियन शहरातील जास्तीत जास्त लोकं येतील. आणि दुबईतील मिफ्टाप्रमाणे लंडनमधील मिफ्टालाही प्रचंड प्रतिसाद मिळेल.

एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणा-या सोहळ्याची संकल्पना कशी सुचली याबद्द्ल बोलतांना ते म्हणाले की," मराठी संस्कृती, मराठी सिनेमा, नाटक यांना अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवणं हा मुख्य मुद्दा होता. मग बीएमएमच्या फिलाडेल्फियाला, अमेरिका झालेल्या अधिवेशनाच्यावेळी मी आणि महेश भाई भेटलो आणि त्यांना सांगितलं की भाई अशी एका अवॉर्ड सोहळ्याची स्थापना करतोय. त्यांनी लगेच तो मुद्दा उचलून धरला. आणि कसं आहे की एकदा जर महेश भाईला काही सुचलं, त्यांच्या डोक्यात काही आलं की, काही चिंताच शिल्लक राहत नाही. ते लगेच म्हणाले की, "चलो Lets do it". शिवाय मी आत्तापर्यंत चार ते पाच ‘iifa’पुरस्कार अतिशय जवळून पाहिलेत. त्यातील अनेक चांगल्या गोष्टींचा मी अभ्यास केला. आणि महेश भाई या सगळ्या सोहळ्यांमध्ये नेहमी सहभागी असतात. त्यामुळे त्यांनाही त्या गोष्टींचा चांगला अभ्यास आहे. हेच अनुभव ‘मिफ्टा’साठी आमच्या चांगल्याच कामात पडत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘iifa’च्या वेळी आमच्या एका कमिटीची मिटींग सिटी ऑफ टोरांटोच्या मेअरच्या ऑफीसमध्ये ठेवण्यात आली होती. या कमिटीत शाहरुख खान मिळून आम्ही सात व्यक्ती होतो. आणि त्यात मराठी प्रतिनिधी म्हणून मी होतो. ही खरंच मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं मला वाटतं.

दुबईतील सोहळ्याला त्यातील अनेक वैशिष्ट्यांमुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मग यावेळी लंडनमधील ‘मिफ्टा’चं काय वैशिष्ट्य असणार असं विचारता ते म्हणाले की, "खरं सांगायचं तर दुबईचा सोहळा खूपच दमदार झालाय. पहिलाच सोहळा असूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काही गोष्टींकडे आम्ही यावेळी खास लक्ष दिलंय एक म्हणजे गेल्यावेळी २००च्या जवळपास लोकं आम्ही घेऊन गेलो होतो. यावेळी ती संख्या ३५० च्या घरात जात आहे. हा खरंच चांगला प्रतिसाद आहे. यावेळी आणखी एक आकर्षण म्हणजे लंडन शहरातील ‘इंडिगो-२’ थिएटर ज्यात हा सोहळा होणार आहे. तसंच या सोहळ्याबद्द्ल आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे परदेशातील अनेक मराठी कमिटींना हाताशी घेऊन हा उपक्रम आम्ही करतोय.

सोहळ्याची तारीख अगदी अगदी जवळ आली असल्याने या सोहळ्याची तयारी कुठपर्यंत झालीय याबाबतही त्यांनी सांगितलं ते म्हणतात," गेल्यावेळी आम्ही अगदी वेळेवर तयारी सुरू केल्याने घाई झाली होती. मात्र याखेपेला वेळेच्याआधी आम्ही सर्व तयारी सुरू केली आहे. सर्व लोकांच्या Visa Process ला सुरवात झाली आहे. गेल्यावेळी दिड महिन्यात सगळं पॅचअप केलं होतं यावेळी मात्र दिड महिन्याआधी लंडनला दोन वेळा जाऊन या सोहळ्याचा प्रचार करण्यात आला आहे. येत्या ६ तारखेला मी आणि महेश मांजरेकर लंडनला जाऊन या सोहळ्याची मोठी घोषणा करणार आहोत. त्यामुळे सध्यातरी मला वाटतं की तयारी जोरात सुरू आहे.

‘राजा राणी ट्रॅव्हल्स’ने हा सोहळा आयोजित केला असल्याने या सोहळ्याला येणा-या प्रेक्षकांसाठी काही खास पॅकेजेस आहेत का? आणि परदेशातील इतरही सोहळ्यांना तुम्ही पार्टनर असता. यावर ते म्हणाले की, " खरं सांगायचं तर एकही जाहिरात न करता खूप Enquiries आल्या आहेत. त्यामुळे ग्रुपसाठी, म्हणजे मित्रांचे ग्रुप, फॅमिलीजसाठी एक Platinum Pass Tour असं खास पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये त्यांना मराठी स्टार्ससोबत जाता येईल, त्यांच्याच हॉटेलमध्ये राहता येईल, त्यांच्याबरोबर सोहळ्यात सहभागी होता येईल, कलाकारांबरोबर क्रिकेट मॅचही खेळता येईल. आणि इतर सोहळ्यांबद्दल बोलायचं झाल्यास मी म्हणेन की, आधी ट्रॅव्हल कंपनी म्हणजे लोकांना काश्मिरला घेऊन जाणं, देश भ्रमण करण्यासाठी घेऊन जाणं यापूरतीच मर्यादीत होतं. पण आता मात्र ते स्वरूप बदललं आहे. आता परदेशातील Exibition, Convention ला लोकांना घेऊन जाणं हे सध्या मोठ्या प्रमाणात केलं जातंय. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मी परदेशात फिरत असल्याने एक High Level Network निर्माण केलं आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की, आम्ही येत्या काळात ७ ते ८ मोठे उपक्रम राबविणार आहोत. त्यात एक बीएमएमचं अधिवेशन, साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव आदी उपक्रम आहेत ज्यांना आम्ही Travel Partner आहोत.

कुठलाही मोठा सोहळा म्हटलं की, खर्चाचा मुद्दा येतोच. एवढ्या मोठ्याप्रमाणात केल्या जाणा-या या सोहळ्याचा खर्च कसा केला जातो? यावर ते सांगतात की," यासाठी लागणार सगळा खर्च हा Sponsors कडून येतो. आणि एक अभिमान वाटतो की, गेल्या सोहळ्याच्या दबदब्यामुळे यावेळी खूप Sponsors यासाठी उभे झाले आहेत. मह्त्वाचं म्हणजे ७०% स्पॉन्सर्स आधीच आमच्याशी जुळले आहेत.

शेवटी या सोहळ्याला येणा-या प्रेक्षकांना संदेश देतांना ते म्हणाले की," तीन गोष्टी एक म्हणजे आपण महाराष्ट्र आणि इंडियाचे प्रतिनिधी म्हणून तिथे जातोय याची जाणीव असावी, दुसरी गोष्ट मराठी फिल्म्स आणि नाटकांचा प्रचार करण्याची कुठलीही संधी आपण चुकवता कामा नये आणि तिसरं म्हणजे हा `मिफ्टा' हा पुरस्कार सोहळ्याला आपण एक फॅमिली म्हणून जातोय याचीही जाणीव सगळ्यांनीच ठेवावी, असं आवाहन मी सर्व प्रेक्षकांना करतो.

तात्पर्य हेच की, या स्पर्धेच्या जगात महाराष्ट्रातील आपली प्रगल्भ परंपरागत कला, संस्कृती मागे राहू नये. या गोष्टींना जागतीक स्तरावर एक मान मिळावा. परदेशात जन्मलेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या मायबोलीची, संस्कृतीची माहिती व्हावी. मराठी कलेची, सिनेमाची एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी या उद्देशानेच अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर यांनी मिफ्टा या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची सुरवात केली हे नक्की...! मिफ्टाच्या सर्वच आगामी उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा....!