Sign In New user? Start here.

मिफ्ता एक सांस्कृतीक चळवळ

मिफ्ता एक सांस्कृतीक चळवळ

 
 
 

मिफ्ता पुरस्कार सोहळ्याचं हे दुसरंच वर्ष असून त्याला प्रत्येक स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदीतील मोठ मोठ्या सोहळ्यांसारखं या सोहळ्याचं स्वरूप आहे. शिवाय या सोहळ्याच्या एकंदर संकल्पनेत अनेक मोठ्या कलाकारांचं मार्गदर्शन सुद्धा लाभत आहे. दरवर्षी होणा-या या सोहळ्याचं काहीना काही वैशिष्ट्य असावं असा आयोजकांचा आग्रह आहे. त्यानुसार या सोहळ्यात एका खास कार्यक्रमाचं सादरीकरण केल्या जाणार असून या कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.....

मिफ्ता पुरस्कार सोहळा या संकल्पनेबद्दल एक दिग्दर्शक या नात्याने बोलतांना ते सांगतात की, "मिफ्ता ही महेश मांजरेकर आणि अभिजीत पाटील यांची उत्तम अशी संकल्पना आहे. सध्या आपल्याकडे गेल्या दहा वर्षात असं झालंय की, मराठी सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय. तरीही आज महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्यावर बॉलिवूडचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या या चित्रपट परिवाराला एकत्र आणण्याचा प्रयत्न या सोहळ्यामागचा आहे. मुळात मराठी रंगभूमीला आणि चित्रपटांना एक मोठी परंपरा असूनही हिंदीमध्ये आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही. त्यामुळे एक सांस्कृतिक चळवळीचं स्वरूप म्हणून मी मिफ्ताकडे बघतो. शिवाय या सोहळ्यात आपण फक्त कलाकारांचाच सन्मान करत नाहीत तर सामाजिक आणि साहित्य क्षेत्राय उल्लेखनीय कार्य करणा-या अनेक व्यक्तीमत्वांनाही सन्मानित करतो. गेल्यावर्षी डॉ.प्रकाश आमटे यांना सन्मानीत केले होते. यावर्षीही तसाच एका व्यक्तीमत्वाचा सन्मान करण्यात येणार आहे.

लंडनमध्ये होणा-या सोहळ्यात तुमची काय भूमिका आहे? यावर ते म्हणाले की, " मिफ्ता सोहळ्याच्या अवॉर्ड सेरमनीच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ही आपल्या मराठी कलेच्या परंपरेवर आधारीत अशी आहे. एकप्रकारे नॉस्टेलजिया ही थिम या सोहळ्याची असणार आहे. यात सेट डिझाईन प्रदिप मुळे करतोय, म्युझिक अजित परब आणि राहूल रानडे करताहेत, सोनिया परचुरे नृत्यदिग्दर्शन करते आहे, प्रशांत दळवी, राजेश देशपांडे हे लिखाण करताहेत. आणि या कार्यक्रमात एकूण १०० ते १२५ प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. गायकांमध्ये सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी यांच्यापासून ते नवीन गायकांपर्यंत सर्वच यात गाणार आहेत. सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून आम्हाला आता कार्यक्रमाची रात्रंदिवस तालीम करायची आहे..

प्रेक्षकांना तुमची एक नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. आता तुम्ही मिफ्ता पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमाचे दिग्दर्शन करणार आहात. कसा होता हा अनुभव..? यावर ते म्हणाले की, " अनुभव खूप चांगला आहे कारण सर्वांचच यासाठी खूप सहकार्य लाभतंय. गेल्यावर्षी मी अमेरिकेत झालेल्या साहित्य संमेलनासाठी एका नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय अनेक इव्हेंट्सचही दिग्दर्शन मी केलं असल्याने तो अनुभव माझ्याकडे आहेच. त्याचा इथे खूप फायदा झाला मला...पण मिफ्तासाठी जे करतोय ते सगळं माझं एकट्याचं नाहीये..माझा टेक्निकल दिग्दर्शक संतोष मांजरेकर आहे. शिवाय सतीश पडवळ, अभिजीत बोरकर, श्रीपाद पद्ममाकर असे अनेकजण माझ्याबरोबर आहेत. हळूहळू या सोहळ्यात अनेकांचा सहभाग वाढत जाणार आहे. कारण यातून फक्त एकाचा फायदा होणार नसून मराठी कलेचा फायदा होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यात खूप जणांचा सहभाग आहे. गेल्या तीन पिढ्य़ात यात आहेत म्हणजे विक्रम गोखले, वंदना गुप्तेंपासून आत्ताच्या नवोदित स्टारपर्यंत सर्वच यात आहेत. सुरवातीला या कार्यक्रमाच्य दिग्दर्शनाची वैयक्तीक जबाबदारी माझ्यावर सोपविल्यानंतर मला थोडं टेंन्शन आलं होतं. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे ती भिती कमी झाली.

गेल्यावर्षी दुबईतील मिफ्ता सोहळ्याचे अनुभव सुद्धा त्यांनी सांगीतले, " एक पुरस्कार सोहळा भारतात करण्याऎवजी दुबईत करतो असंच वाटत होतं पण तिथे गेल्यानंतर जे वातावरण समोर आल्म ते खूप चांगलं होतं. खूप चांगला प्रतिसाद मिळाला तिथे...आजही त्या सोहळ्याची आठवण काढणारे भेटतात तर खूप छान वाटतं. तिथली एक खास आठवण सांगायची म्हणजे ज्या ठिकाणी सोहळा झाला ते भव्य आणि प्रसिद्ध थिएटर होतं. त्याची आठवण अशी की, मिफ्ता सोहळा झाल्यानंतर ते पाडून टाकण्यात येणार होतं. त्यामुळे ते थिएटर मिफ्ता सोहळ्यासाठीच थांबळं होतं असं वाटत होतं.

गेल्यावर्षी हा सोहळा दुबईला झाला, यावर्षी लंडनला होतोय आणि पुढल्यावर्षी न्युयॉर्कला होणार आहे. भारतात कधी होणार का? यावर ते म्हणतात की, " होणार ना....! सध्या आमची कन्सेप्ट अशी आहे की, मराठी सिनेमा भारताबाहेर गेला पाहिले पाहिजे त्याला एक ग्लोबल व्यासपिठ मिळायला पाहिजे. पण हळूहळू तो डेव्हलप झाला की, भारतातही त्याचे मुळं रूजवली जातीलच...

शेवटी प्रेक्षकांना आवाहन करतांना ते म्हणाले की, " आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रात उत्तम कलाकृती निर्माण झाल्या असून त्याच्यापासून आपण फार लांब गेलेलो आहे. तर ही पोकळी भरून काढावी. आणि या सोहळ्याला येणारे कलाकार हे पाहुणे म्हणून येताहेत असं न समजता त्यांना आपल्याच घरातील सदस्य समजून त्यांच्याशी वागावे. आणि या सोहळ्याला त्यांनी प्रचंड प्रतिसाद द्यावा....

आता मिफ्ता सोहळ्यात प्रेक्षकांना फक्त पुरस्कार सोहळाच बघायला मिळणार नाहीतर प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेला एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम पहायला मिळणार आहे. ज्यात मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार भूमिका करणार आहेत.....

-अमित इंगोले.