Sign In New user? Start here.

एनएसडी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट

 
     
 

चिन्मय मांडलेकर

एनएसडी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट

मराठी मालिका, चित्रपट आणि रंगभूमी एक चेहरा सध्या चांगलाच गाजतोय तो म्हणजे अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकरचा. अभिनय आणि लेखन अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे फार कमी कलाकार मराठी मनोरंजन विश्वात बघायला मिळतात त्यातीलच एक म्हणजे चिन्मय हा आहे. त्याने अनेक मालिकांसाठी लेखन केले आहे. त्याच्या लेखनएवढाच त्याचा अभिनय सुद्धा तेवढाच प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे. त्याच्या या प्रवासाविषयी त्याने आमच्याशी केलेल्या गप्पा....

* नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी तिथपासून सुरवात करूयात...

- मी १७ वर्षांचा असताना असं ठरवलं होतं की मला अभिनयातच करीअर करायचंय. त्यानुसार अनेक स्पर्धांमध्ये एकांकिका-नाटक करीत होतो. त्यावेळी अशी माहिती मिळाली की दिल्लीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे आणि त्यातून अनेक मोठ मोठे कलाकार तयार झालेत. तेव्हाच ठरवले होते की आपणही तिथे जायचे. फक्त तेव्हा प्रॉब्लेम एवढाच होता की एनएसडी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रॅज्यूएशन पूर्ण करणं गरजेचं होतं. मग मी आधी ते पूर्ण केलं. त्याचवेळेला मी खूप जोमाने थिएटर करीत होतो. ग्रॅज्यूएशन झाल्यावर माझं पहिल्या अटेम्प्ट ला सिलेक्शन आणि अॅपडमिशन झालं. एनएसडी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण आज जे काही मी आहे किंवा जे काही माझं काम लोकं बघतात त्याचा एक मोठा बेस एनएसडीच्या ट्रेनिंगने तयार केलाय. म्हणजे मी तिथे सर्वकाही शिकलो आणि आता शिकण्यासारखं काहीच नाही असं नाहीये. कारण एनएसडी मध्ये फक्त रंगभूमीवरच्या अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं. कॅमेरासमोर उभं राहून कसा अभिनय करायचा हे शिकवत नाहीत. त्या सर्व गोष्टी मला तिथून बाहेर पडल्यावरच शिकायला लागल्यात. पण कलाकार म्हणून एक जे एक्सपोजर दिलं ते एनएसडी ने दिलंय. तिथे भारत भरातील वेगवेगळे कलाकार मला बघता आले. आपल्या डबक्याबाहेर काय विश्व आहे ते मला चांगलं कळू शकलं. म्हणून मी हे केलं म्हणजे खूप ग्रेट केलं असं कधीच समजत नाही. कारण जगामध्ये काय होतंय याची पुसटशी कल्पना मला एनएसडी मध्ये मिळाली. मला वाटतं हा माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा आहे.

* तू जेवढा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे तेवढाच लेखक म्हणून सुद्धा आहे. तू अभिनयासोबतच लेखनाचंही प्रशिक्षण तेथे घेतले ?

- नाही मी लेखनाचं प्रशिक्षण घेतले नाही. त्याचं झालं असं की अभिनेता म्हणून डिप्लोमा घेऊन परत आलो. सर्वजन करतात तसं स्ट्रगल मी सुद्धा करीत होतो. एक मालिकाही मिळाली ‘वादळवाट’. पण काही कारणास्तव माझा ट्रॅक सुरू व्हायला थोडा वेळ लागला. त्याकाळात अक्षरश: मी तीन-चार महिने बेकार बसून होतो. स्वत:ला रिकामं ठेवणं मला जमत नाही. तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर काम करतच होतो. पण पैसे कमवण्यासाठी काही करावे लागेलच ना..!‘वादळवाट’चे लेखक अभय परांजपे यांनी मी लिहिलेली एक एकांकीका पाहिली होती. ती पाहून ते मला चांगलं लिहितो म्हणाले होते. त्यानंतर त्यांनीच मला त्यांच्याबरोबर लिहायला बोलवले. अभय सरांबरोबर मी जवळजवळ तीन वर्षे वादळवाट लिहित होतो. ते एका अर्थाने माझं लेखक म्हणून प्रशिक्षण होतं. त्यांच्याकडूनच लिखाणाच्या ब-याच गोष्टी मला शिकता आल्या.

* लेखन आणि अभिनय या दोन्हींचा ताळमेळ कसा साधतोस ?

- खरंतर असं काही ठरवून मी करत नाही. ते करता करता जमत गेलं. तसं पाहिलं तर ‘वादळवाट’ लिहून संपल्यावर मी असं ठरवलं होतं की आता बस्स झालं आपण काय लेखक नाही आहोत. आपण आपल्या अभिनयावरच फोकस करूयात. पण त्यानंतर ‘असंभव’ सारख्या मालिकेची ऑफर आली आणि ‘असंभव’ला मला नाही म्हणता येईना. कारण ती माझी लेखक म्हणून पहिली स्वतंत्र मालिका होती. ‘असंभव’ या मालिकेनेच मला एक लेखक म्हणून समोर आणलं. त्यानंतर २००३ ते २००५ या काळात मी ती स्वत:ला सवय लावून घेतली. सकाळी शुटींग करून आल्यावर रात्री लिहायला लागलो आता ती सवय झाली आहे.

* लेखनाचा अभिनयासाठी आणि अभिनयाचा लेखनासाठी कसा फायदा होतो ?

- खूप जास्त फायदा होतो. लिखाणाचा अभिनयासाठी फायदा असा होतो की मी लेखक असल्यामुळे जरी मी एखादी गोष्ट लिहिलेली नसेल तरी लेखकाला काय म्हणायचं आहे हे मला चांगलं लक्षात येतं. हा माझा सगळ्यात मोठा फायदा...आणि अभिनेता असल्याचा फायदा हा की लेखक म्हणून लिहिताना अभिनेत्याला म्हणायला सोपी जातील असे डायलॉग लिहिणे. मी लिहिलेली वाक्ये कधी अभिनेत्याला बोलायला येत नाहीत किंवा कठीण वाटतात असं कधी होत नाही.

* एक अभिनेता म्हणून भूमिका निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतोस?

- मी मुंबईत आल्यावर हे विसरून गेलो होतो की मी एनएसडीतून आलोय. किंवा मी स्वत:ची ऒळख करून देतानाही सांगत नाही की मी एनएसडीतून आलोय. त्यामुळे एनएसडीतून शिकून आल्यामुळे तूम्ही माझ्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघा असं मी कधीच म्हणत नाही. दुसरा मुद्दा असा की मी एनएसडीतून आलोय म्हणून फक्त कलात्मक चित्रपटच केले पाहिजे असं नाहीये. मला मेनस्ट्रीम मधली कामं करायची आहे. मला फक्त अभिनेता नाही तर स्टार व्हायचं आहे. त्यामुळे त्याच्या अनुरूप जी कामं आहेत. आत्तापर्यंतचे माझी चित्रपट बघाल तर मी ‘गजर’ सारख्या वेगळ्या चित्रपटातही काम केले आहे, एक्सपरीमेंटल सिनेमेही केले आहे आणि मोरया सारखा सिनेमाही केला आहे. मी चांगला रोल आणि चांगला सिनेमा बघतो. लोकांचं मनोरंजन करू शकणारा, स्वत:ला समाधान देऊ शकणारा सिनेमा हवा. मुळात कोणताही सिनेमा करताना मी हेच बघतो की तो निर्माता हा सिनेमा पूर्ण करू शकणार आहे का..? आणि दुसरी गोष्टी म्हणजे त्या सिनेमातली भूमिका...या दोन्ही गोष्टी मला योग्य वाटल्या तेव्हाच मी तो सिनेमा करतो. म्हणूनच आत्तापर्यंत वेगवेगळ्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळाले.

* मराठीप्रमाणे हिंदीतीलही काही सिनेमांमध्ये तू काम केलंय...नुकत्याच येऊन गेलेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘शांघाय’ मध्ये तू दिसलास...त्याबद्दल सांग..

- इतरांप्रमाणे मी सुद्धा रीतसर ऑडिशन दिलं आणि कदाचित दिबाकर बॅनर्जी यांना माझं सादरीकरण आवडलं असेल म्हणून तो रोल माझ्याकडे आला. अनुभव फार छान चांगला होता.कारण दिबाकर बॅनर्जी एक उत्तम दिग्दर्शक आहेत. अभय देओल आणि फारूख शेख यांच्याबरोबर माझे काही सीन होते. ते दोघेही खूप छान अभिनेते आहेत. खूप मोठी माणसं असूनही खूप डाऊन टू अर्थ आहेत.

* सर्वांप्रमाणेच तूलाही स्ट्रगल करावा लागला..?

- खरंतर माणसाचा स्ट्रगल कधी थांबत नसतो. आधी काम मिळवण्यासाठी आणि नंतर काम टिकवण्यासाठी स्ट्रगल असतोच. आता प्रेक्षकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात तर त्यांच्या अपेक्षांवर खरं उतरण्याचं स्ट्रगल आहे. आज आपली मराठी चित्रपटसॄष्टी बघाला तर ती अजून बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे तुमचं काम लोकांपर्यंत पोहचवणं हे अख्ख्या इंडस्ट्रीचं स्ट्रगल आहे.

* सध्याच्या मराठी चित्रपटसॄष्टीबद्दल तूझं काय मत आहे ?

- मी हेच म्हणेन की वीसपूर्वी इंडस्ट्री जिथे होती त्यापेक्षा नक्कीच पुढे आली आहे. पण भारतातील इतर प्रादेशिक सिनेमांच्या तुलनेत व्यावसायिकदॄष्ट्या अजून आपल्याला खूप मजल गाठायची आहे. त्यांच्या सिनेमा एवढा मोठा प्रेक्षकवर्ग गाठायचा आहे. पण आज अनेक लोक मराठी इंडस्ट्रीकडे चांगल्या दॄष्टीने बघत आहेत. यातून चांगलंच होईल. मात्र काही बेसिक गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवं. जसं मराठी सिनेमांना मिळणारे थिएटर, डिस्ट्रिब्युशन, मराठी सिनेमांची होणारी रीकव्हरी किती होते याकडेही विचारपूर्वक बघायला हवं. मला असं वाटतं की जोपर्यंत मराठी इंडस्ट्रीत चार चांगले निर्माते येत नाही जे सातत्याने चित्रपटांची निर्मिती करतात तोपर्यंत मी म्हणणार नाही की मराठी इंडस्ट्री खूप पुढे निघून गेली. आपल्याकडे आजही निर्माते नाहीयेत आपल्याकडे फायनान्सर असतात. आणि त्यांना मार्ग दाखवणारे किंवा मार्गापासून भटकवणारे काही सल्लागार असतात. असं न होता तीन ते चार तरी निर्माते सक्षमपणे उभे रहायला हवेत. त्याची खूप गरज आहे.

* मराठीत हिरोपण असणारे अभिनेते नाही असं बोललं जातं त्याबद्दल तूझं काय मत आहे?

- जे असं बोलले असतील ते त्यांचे वयक्तीक मत आहे. मुळात हिरोपण असणं म्हणजे काय इथपासून सुरवात होते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हिरो दोन प्रकारचे असतात. एक हिरो असतो जो सुपर हिरो असतो जो आपण कधीच होऊ शकत नाही. आणि एक असा हिरो असतो ज्याच्याबरोबर आपण स्वत:ला आयडेन्टीफाय करत असतो. जो आपल्यासारखा वाटतो. मला असं वाटतं सध्या मराठीमध्ये प्रेक्षक अशाच हिरोला बघायला पसंत करतात. यालाही एका अर्थाने हिरोइझम म्हणतात. त्यामुळे खरं हिरोइझम कशात आहे हे तपासून बघायला हवं. आता साऊथ मध्ये काही हिरो खूप देखणे आहेत आणि काही अगदी सामान्य दिसतात. सर्वात मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे रजनीकांत यांचं...तो या जगातला एक मोठा सुपरस्टार आहेच.

* एक चांगला चित्रपट किंवा मालिका लेखक होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक वाटतात ?

- मुळात टॅलेंट आवश्यक आहे. तुम्हाला लिखाणाची आवड आहे का हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते असलेलं टॅलेन्ट सतत वाढवत कसं न्यायचं याकडे लक्षा द्यायला हवे. देवाने मला एवढं दिलंय आणि मी एवढ्यातच खूप आहे असं करून चालत नाही. सतत लिखाणाचे नवीन ट्रेन्ड येत असतात जरी कथानक तेच असले तरी जो नवी लेहजा असतो भाषेचा-लिखाणाचा त्याबाबत नेहमी अपडेटेड आणि अग्रेटेड असणं खूप महत्वाचं असतं. आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाण असणं गरजेचं आहे. मी जे करतोय तेच ग्रेट आहे असं म्हणून चालत नाही.

* इतक्या वर्षांच्या या प्रवासात तूझ्या घरच्यांचा कशाप्रकारे तूला पाठिंबा लाभत असतो?

- माझ्या परीवाराचा खूप पाठिंबा मला सतत लाभत असतो. माझ्या वडीलांचा सुरवातीच्या काळात मला खूप सपोर्ट मिळाला. आज ते नाहीत पण माझी बायको आहे. माझी मुलगी आहे. ब-याचदा लोकं विचारतात की तुम्ही घर आणि काम कसं मॅनेज करता. तर मी नेहमी सांगत असतो की मी मॅनेज नाही करत तर माझी बायको सर्व मॅनेज करते. कारण तिला माझं घरात नसणं अॅलडजस्ट करावं लागतं. मात्र त्यांचा मला नेहमी सपोर्ट असल्याने मी हे सर्व करू शकतो.

अमित इंगोले