Sign In New user? Start here.

मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा संघर्ष ‘फॅंड्री’ - नागराज मंजुळे

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा संघर्ष ‘फॅंड्री’ - नागराज मंजुळे

   बालपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि जेऊर गावात गेलं. वडार समाजातील निरक्षर घरातील हा मुलगा. नोकरी-धंद्यापेक्षा आपल्याला आवडेल तेच करण्याचा त्याचा हव्यास. कवी, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिका तो पार पाडतो. त्यालाही माहित नव्हते की, तो पुढे जाऊन दिग्दर्शक किंवा लेखक होणार आहे. सिनेमाची आवड लहानपणापासून होती एवढंच कारण त्याला सिनेमाकडे घेऊन आलं. पहिल्याच शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याच्या पहिल्याच ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्य संग्रहाला मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’ सुद्धा मिळाला. ह्या बहुरंगी कलाकाराचं नाव आहे नागराज मंजुळे...नागराजचा त्याच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मनंतर आता ‘फॅंड्री’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येतो आहे. त्याने दिग्दर्शनासोबतच या सिनेमाचं लेखनही केले आहे. तर निलेश नवलखा आणि विवेक कजरिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा अजून प्रेक्षकांसमोर यायचा आहे. मात्र सिनेसॄष्टीतील काही दिग्गजांनी हा सिनेमा बघून त्यावर अमूल्य अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निमित्ताने नागराजशी काही सिनेमाबाबत आणि काही त्याच्या सिने प्रवासाबद्दल केलेल्या गप्पा.....

   * ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तुझा ‘फॅंड्री’ हा सिनेमा येतोय त्याबद्दल सांग.

   - ‘फॅंड्री’ही एक ग्रामीण भागातील प्रेमकथा आहे. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा संघर्ष त्यात रेखाटण्यात आला आहे. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं. जे त्याला वाटतं की, हे आपल्या आवाक्यात नाही. तरी ते स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं. कथेला ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी ती एक हळूवार सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी अशी प्रेमकथा आहे.

director nagraj manjules interview

   * ‘फॅंड्री’ या अतिशय वेगळ्या टायटलचा काय अर्थ आहे ?

   - खरंतर या टायटलबद्दल मी आता काही सांगणार नाही. पण हे टायटल फिल्मशी अत्यंत निगडीत असं आहे. म्हणजे कथानकाशी एकजीव असं आहे. जेव्हा प्रेक्षक फिल्म बघतील तेव्हा त्यांना याचा अर्थ चांगल्या प्रकारे कळेल, असं मला वाटतं.

   * या सिनेमाचं वेगळेपण काय असणार आहे ?

   - मुळात ही कथा जरी प्रेमकथा असली तरी ती खूप वेगळी आहे. बुद्धदेवदास गुप्तांनी ही फिल्म पाहिली आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘अशी फिल्म आजपर्यंत भारतीय भाषेतच आली नाही’. तर श्याम बेनेगल म्हणाले की, 'This is very powerfull Film'....या दिग्गजांकडून मिळालेल्या ह्या कमेंट माझ्यासाठी माझा खूप मोठा सन्मान होता. मला वाटतं मी कितीही सांगितलं की, ही वेगळी फिल्म आहे. त्यापेक्षा लोकांनीच ती बघावी आणि मला सांगावं की त्यांना फिल्म कशी वाटली.

   * ‘पिस्तुल्या’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ही फिल्म तयार करताना काही दडपण होतं का ?

   - खरंतर मी फिल्म करताना कधीच काही दडपण घेत नाही. जे काम करायचं ते जबाबदारीने करायचं अशी माझी भूमिका नेहमी असते. शॉर्टफिल्म आणि पिचर फिल्म ह्यांचे कॅनव्हॉस अतिशय वेगळे आहेत. पण मी कधीही त्याचं टेन्शन घेत नाही. हाती आलेलं काम चांगलं कसं करता येईल याकडे मी जास्त लक्ष देतो. आणि असा विचारही करत नाही की, शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आता ह्या फिल्मलाही मिळायला हवा. फक्त मनापासून काम करतो.

director nagraj manjules interview

   * या सिनेमाच्या प्रोड्युसरबद्दल सांग.

   - निलेश नवलखा आणि विवेक कजरिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत. त्यांना रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये बोलवण्यात आले आहे. एशियातून फक्त चार निर्मात्यांना या फेस्टीव्हलमध्ये बोलवण्यात आले असून ‘फॅड्री’चे प्रोड्युसर म्हणून या दोघांना बोलवण्यात आले. सिनेमा रिलिज व्हायच्या आधीच हे यश बघून मला खूप आनंद होतोय. निर्मात्यांनी एक निर्माते म्हणून अतिशय चांगलं सहकार्य मला केले आहे.

   * सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल काय मत आहे ?

   - चांगलं वाटतं खरंच...काही दिग्दर्शक अतिशय चांगले सिनेमे तयार करीत आहेत. हिंदीच्या तुलनेत आजचा मराठी सिनेमा कथानकांसाठी खूप श्रीमंत असा आहे. पण काही सिनेमे सोडले तर अजूनही खूप बालिश सिनेमे मराठीत तयार होतात. या फिल्म्सचा फटका चांगल्या फिल्म्सला बसतो. त्याकडे लक्ष द्यायला हवं.

   * मराठी सिनेमांच्या मार्केटींगबद्दल काय मत आहे ?

   - आज चित्रपटांच्या मार्केटींगसाठी ऑनलाईन मिडियाला खूप महत्व प्राप्त झालं आहे. वेगवेगळ्या मनोरंजनक वेबसाईट्स, सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत लगेच पोहचता येतं. ब-याचदा काय होतं की, प्रिन्टसारख्या माध्यमाचा पैसे देऊन उपयोग करून घेतला जातो. पण ऑनलाईन मिडियात एखादं चांगलं काम काहीही मोबदला न घेता लोकांपर्यंत पोचवलं जातं. फेसबुकसारख्या साईटवरून तुम्ही लाखों लोकांपर्यंत पोहचू शकता. आज गावागावात फेसबुक चालतं. घराघरात कम्प्युटर आलं आहे, नेट आलं आहे. त्यामुळे ऑनलाईन मिडिया खरंच महत्वाचा आहे असं मला वाटतं.

   * कशा पद्धतीच्या फिल्म तुला भविष्यात करायच्या आहेत ?

   - खरंतर मी बॉलीवूड फिल्म्सच्या खूप चाहता आहे. पण त्यातही मी बघतो एकाच पद्धतीच्या कथा असतात. म्हणजे शहरी भागातून आलेला अभिनेता...त्यांच्या जाणिवा, त्यांचे अनुभव हेच पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. मात्र मराठी सिनेमा कथा आणि जाणिवांच्या बाबतीत अधिक विस्तृत आहे. त्यामुळे मी फिल्म मेकींगच्या दॄष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा मी माझ्या कथा मांडणार आहे. ‘फॅंड्री’सारख्या कथेवर फिल्म होऊ शकते असं मला वाटत नव्हतं. पण त्या माध्यमाच्या ताकदीच्या सहाय्याने ही फिल्म तयार झाली. माझ्याकडे खूप कथा आहेत ज्या कधी प्रेक्षकांनी वाचल्याही नसतील आणि बघितल्याही नसतील. जर एखादी ऎकलीही असेल तरी ती वेगळ्या दॄष्टीकोनातून प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल.

   * सिनेमाकडे तू कसा वळलास ?

   - खरंतर माझे भाऊ, माझे काही मित्र ह्यांनी कधीही विचार नव्हता केला मी सिनेमा तयार करेन. काही जणांना आज वाटतं की, नागराज अचानकपणे फिल्ममध्ये कसा आला. मात्र मी अचानक सिनेमात आलो नाही. खरंतर लहानपणापासून मला सिनेमाची खूप आवड होती. अमिताभ, मिथून, जितेंद्र यांचे सर्वच सिनेमे मी पाहिलेले आहेत. शाळेला सुट्टी मारून मी सिनेमाला जायचो. सोबतच माझी आत्या मला लहान असतांना गोष्टी सांगायची. ती गोष्टी सांगण्याची आवड माझ्यातही निर्माण झाली. मग मी सुद्धा लोकांना नवीन पाहिलेल्या सिनेमांच्या गोष्टी अधिक रंजकपणे सांगायचो. मला सुद्धा माहित नव्हतं की, मी सिनेमा करेन. पण अचानक मित्रांच्या सोबतीने मी या माध्यमाकडे वळलो. कॉलेजला असताना नाटक करायचो, लिहायचो. त्यानंतर जाणिवपूर्वक सिनेमा करण्यासाठीच मी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. फिल्म करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तेव्हा मग मी ‘पिस्तुल्या’ ही शॉर्टफिल्म केली. मी स्वत: शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यातून दाखवला आहे.

   - अमित इंगोले