Sign In New user? Start here.

‘गोळाबेरीज’च्या संगीताचं गणित

‘गोळाबेरीज’च्या संगीताचं गणित

 
 
 

पु.ल.देशपांडे यांनी आपल्या व्यक्तिचित्रांवर अफाट प्रेम केलं आणि त्यांना पुस्तकात बंदिस्त करून न ठेवता एकपात्री प्रयोग, कथाकथन यांच्या रूपाने पुस्तकाबाहेर काढलं व देश- विदेशात फिरवलं. पुलंचं ‘क्ती आणि वल्ली’पुस्तक वाचताना या व्यक्तीरेखांबद्दल त्यांच्या मनात असलेला प्रेम, कौतुक आपल्याला जाणवतं. त्यांनी रेखाटलेलं प्रत्येक व्यक्तीचित्र विनोदाच्या वस्त्रप्रावरणात लपेटत हळूच त्यांच्या मनातला सल, दुख: उघड करण्याची हातोटी पुलंना नेमकी जमली होती. जीवनात सुखाबरोबर दु:खाचे आणि विनोदाबरोबर कारुण्याचे अस्तित्व रेखाटणा-या पुलंच्या अनेक विविधरंगी व्यक्तीरेखा"डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्स प्रा.लि." संस्थेच्या "गोळाबेरीज" या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन गेल्या. डॉ.देवदत्त कपाडिया यांची निर्मिती आणि क्षितीज झारापकर दिग्दर्शित चित्रपटात दिलीप प्रभावळकर, डॉ.मोहना अगाशे, सतीश शहा, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, प्रदीप पटवर्धन असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला दिसतात. पुलंची व्यक्तिरेखा निखिल रत्नपारखी यांनी आणि सुनिताबाईंची व्यक्तिरेखा नेहा देशपांडे यांनी सुरेख रंगवली आहे. पु.ल.देशपांडे यांच्याशी निगडीत चित्रपटाचं संगीत हा सुद्धा तितकाच आकर्षणाचा विषय आहे हे पुलंच्या सगळ्या चाहत्यांना माहितच आहे. या चित्रपटातली गाणी आणि पार्श्वसंगीत याबद्दलच्या उत्सुकतेपोटी "गोळाबेरीज" चे संगीतकार मिलिंद जोशी यांच्याशी केलेली ही बातचीत.

- पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दलच्या चित्रपटाचं संगीत तुम्हाला करायला मिळणार असं ठरलं तेंव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती ?

milind joshi

- खरंतर त्या वेळची माझी प्रतिक्रिया संमिश्र होती. त्यातला सगळ्यात मोठा भाग आनंदाचा असला, तरी त्यानंतर मनात लगेच उठणारी भावना होती ती जवाबदारीची. पु.ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व प्रत्येक मराठी मनाचा फार संवेदनशील असा कोपरा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काहीही काम करत असताना विशेष काळजी घ्यायला हवी हे लक्षात आल्यामुळे ती मोठी जवाबदारी वाटत होती.

- या चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुद्धा तुम्हीच केलंय का ?

- होय..! गोळाबेरीज चं पार्श्वसंगीत सुद्धा मीच केलंय. पार्श्वसंगीत करणं हे गाणी संगीतबद्ध करण्यापेक्षा वेगळं काम असतं. त्या त्या प्रसंगात घडणा-या घटनांचा परीणाम वाढवण्यासाठी पार्श्वसंगीत आवश्यक असतं. पार्श्वसंगीत प्रसंगाची मजा वाढवू शकतं. तसंच चुकीचं पार्श्वसंगीत प्रसंगाला मारक सुद्धा ठरू शकतं. ‘गोळाबेरीज’ मध्ये विविध व्यक्तीरेखांचा एक सुंदर असा कोलाज आहे. त्यामुळे या चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुद्धा विविध प्रकारचं करायला मिळालं.

- ‘गोळाबेरीज’ च्या गाण्यांबद्दल काय सांगाल ?

- ‘गोळाबेरीज’ मधे एकूण पाच गाणी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की, पु.ल. स्वत: एक उत्तम संगीतकार होते. या चित्रपटातल्या पाच गाण्यांपैकी तीन गाणी मूळ संगीत पु.ल. देशपांडे यांचं असलेली आहेत आणि एक गाणं सुधीर फडके यांचं मूळ संगीत असलेलं आहे. पु.ल.देशपांडे यांची ‘इंद्रायणी काठी’, ‘इथेच टाका तंबू’ आणि ‘नाच रे मोरा’ ही गाणी या चित्रपटाचे दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांना ‘गोळाबेरीज’ मध्ये हवी होती. सुधीर फडके यांचं संगीत असलेली सुप्रसिद्ध लावणी ‘जाळीमंदी पिकली करवंद’ कथानकाला धरून आवश्यक होती. ही इतकी सुप्रसिद्ध गाणी नव्याने रेकॉर्ड करणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.

- का ? अशी जुनी गाणी नव्याने रिमिक्स करणं आणि बाजारात आणणं ही नवी राहिलेली नाही. असे कित्येक अल्बम्स आपल्याला बजारात मिळतात.

- बरोबर आहे. पण ही गाणी मी रिमिक्स केलेली नाहीयेत. रिमिक्स च्या नावाखाली गाण्याला सूट न होणारे आवाज सुद्धा बेधडक वापरून केवळ नाचण्यायोग्य ताल त्या गाण्यांना जबरदस्ती चिकटवून ही गाणी केलेली नाहीत. या गाण्यांच्या अवीट गोडीला कुठेही धक्का न लागू देता, गाण्याचा बाज बिघडू न देता, नव्याने या गाण्यांचं संगीत संयोजन करण्यात आलं आहे. आजच्या आधुनिक रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी च्या मदतीने ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

- हो, पण ही झाली चार गाणी. पाचवं गाणं कोणतं आहे ?

- कितीही मोठा, आवडीच्या विषयाचा चित्रपट असला तरीही माझ्यासारख्या संगीतकाराला स्वत:चं असं ओरीजनल गाणं करायला मिळाल्याशिवाय समाधान वाटू शकत नाही. हे जे पचवं गाणं आहे ती माझी संगीतरचना आहे. या गाण्याची कथा फार सुरस आहे. दिग्दर्शक क्षितिज झारापकरांना पु.ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई यांची भेट, त्यांचा सहवास, लग्न असा तपशील असलेल्या मोंटाजसाठी एक नवीन गाणं हवं होतं. हे गाणं कसं आणि काय असावं याबद्दल त्यांनी सांगीतलेल्या गोष्टी फार आकर्षक होत्या. ते म्हणाले की, पु.लं. चं रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनवरचं, बंगाली साहित्य आणि संगीत यांच्यावरचं प्रेम आणि कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कवितेवरचं प्रेम या दोन्ही गोष्टींचा संदर्भ या गाण्यातून यायला हवा. हे संदर्भ आकर्षक असले तरी नेमकं करायचं काय यावर आम्ही विचार सुरू केला. त्या मंथनातून मग असं ठरलं की, एखादी बा.भ. बोरकरांची कविताच आपण संगीतबद्ध करून गाणं तयार करावं आणि बंगाली संगीताचा गोडवा या गाण्यामध्ये नकळतपणे का होईना यावा. बोरकरांच्या कवितेचा शोध सुरू केला. त्या शोधातून हाताला लागली बोरकरांची कविता "डाळिंबीची डहाळी अशी नको वा-यासवे झुलू, सदाफुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू." आणि गंमत म्हणजे हीच संपूर्ण कविता बोरकरांनी कोकणी भाषेत सुद्धा लिहिलेली आहे. मग काय, आमचा हा गाणं तयार करण्याचा प्रवास आणखीच रंजक होऊ लागला. कोकणी आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमधल्या ओळी एकत्र करून गाणं करावं. कोकणी ओळी गोवन पद्धतीच्या संगीतात पुरुषाच्या आवजात आणि मराठी ओळी स्त्रीच्या आवाजात आधुनिक भावगीताच्या ढंगात करायच्या ठरल्या. हे करताना आपसूकच समुद्र किनारा, निसर्ग सौंदर्य, तारुण्य आणि सोबतीला बोरकरांचे प्रणयमुग्ध शब्द या सगळ्यांमुळे संगीत रचनेचं एक अजब रसायन रूपाला येऊ लागलं आणि हे गाणं तयार झालं. "दाळमीचे ताळयेवरी वाऱ्यार धोल नाका, सब्दुलीच्या झॅतान अशें सांचे चल नाका."

- हे गाणं कुणाच्या आवाजात रेकॉर्ड झालंय ? कोकणी ओळी मीच गायल्या आहेत आणि मराठी ओळी मनीषा जोशी यांनी गायल्या आहेत. तुम्हाला कोकणी भाषा येते ?

- नाही. त्यासाठी मी सुप्रसिद्ध अभिनेते श्री. मोहनदास सुकठणकर आणि डॉ.घनश्याम बोरकर यांची मदत घेतली. त्यांनी मला कोकणी भाषेतल्या त्या ओळी उच्चारायला शिकवल्या. त्यांचा मी खूप आभारी आहे.

- गोळाबेरीज चित्रपटातली बाकी गाणी कुणी कुणी गायली आहेत ?

- "नाच रे मोरा " आणि "इथेच टाका तंबू" मधुरा दातार, "इंद्रायणी काठी’ जयतीर्थ मेवूंडी यांनी आणि ‘जाळीमंदी पिकली करवंद" देवकी पंडीत यांनी गायलं आहे.

- देवकी पंडीत यांच्या आवाजात लावणी रेकॉर्ड करायची कल्पना कशी सुचली ?

- त्याचं कारण असं आहे की, "जाळीमंदी पिकली करवंद" या मूळ गाण्यातल्या गायकीमध्ये उपशास्त्रीय संगीतातल्या ‘टप्पा’ या प्रकारच्या ताना वापरलेल्या आहेत. त्या गाण्यासाठी देवकी पंडित यांच्या सारख्या तयार आवाजाचीच आवश्यकता होती. ते मूळ गाणं सुद्धा सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांनी गायलेलं आहे.

- सध्या नवीन कोणकोणत्या प्रोजेक्ट्स वर काम सुरू आहे ?

- आणखी एका मराठी चित्रपटाची गाणी रेकॉर्ड झाली आहेत. त्याच्या पार्श्वसंगीतावर काम सुरू आहे. तसेच ईजिप्त मधल्या अलेक्झांड्रिया सिटी बद्दलची, डोम थिएटर मधे दाखवण्याची एक फार सुंदर अ‍ॅनिमेशन फिल्म बनते आहे. ती अलेक्झांड्रिया मधेच दाखवली जाणार आहे. त्या फिल्मचं पार्श्वसंगीत मी करतोय. काही जाहिरातींच्या जिंगल्स, काही संगीतकारांसाठी गीत लेखन अशी विविध कामं नेहेमी प्रमाणे सुरूच आहेत.

- तुम्ही तुमच्या संगीत रचनांचा स्टेज शो करता का ?

- हो करतो ना. माझ्या अनेक अप्रकाशित रचना आहेत. ज्या मराठीतल्या उत्तमोत्तम कवितांवर आधारित आहेत. शिवाय प्रकाशित असलेल्या माझ्या अनेक अल्बम्स मधली गाणी आहेत, जी श्रोत्यांना आवडलेली आहेत. अश्या गाण्यांचा कार्यक्रम मी सादर करत असतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे "रंग नवा". याच नावाचा माझा अल्बम सुद्धा प्रकाशित झालेला आहे.

- तुमच्या नवीन प्रोजेक्ट्स साठी शुभेच्छा.

- धन्यवाद .

Follow us on Facebook -