Sign In New user? Start here.

मिफ्ताला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

मिफ्ताला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद

 
 
 

भारताबाहेरील सर्वात जुन्या महाराष्ट्र मंडळाचं मिफ्ता सोहळ्याला सहकार्य लाभत असल्याने हा सोहळा नक्कीच यशस्वी आणि सर्वांसाठी यादगार होईल असंच या सोहळ्याच्या निमित्ताने अनेकांशी बोलतांना वाटले. स्थानिक कार्यची जबाबदारी महाराष्ट्र मंडळाने सांभाळली असून त्यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त असलेले श्री.गोविंद काणेगांवकर यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधला....

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र मंडळाचे ट्रस्टी असलेले काणेगांवकर मिफ्ताबद्दल सांगतात की, " मिफ्ता पुरस्कार सोहळा हा लंडनला होतोय याचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय. या सोहळ्याला लंडनमध्ये यशस्वी करण्यासाठी अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. नुसतं महाराष्ट्र मंडळंच नाहीतर लंडन शहरातील सर्वच मराठी लोकं य सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वांसाठी हा सोहळा एक खास यादगार ठरणार आहे.

नुकतेच या सोहळ्याचे आयोजक अभिजीत पाटील आणि काही मराठी कलाकार या सोहळ्याच्या प्रमोशनसाठी लंडनला जाऊन आलेत त्याबद्दल सांगतांना ते म्हणतात की, " या सोहळ्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप मोठ्या प्रमाणावर तिकीटं विकली गेली आहेत. या सोहळ्याकडे इथले लोक भारतातून येणारा एक कार्यक्रम असं न बघता त्यांचा स्वत:चा कार्यक्रम असल्यासारखंच मिफ्ताकडे बघताहेत...

मिफ्ता सोहळ्यात त्यांची नेमकी काय भूमिका आहे, याबद्दलही त्यांनी सांगीतले ते म्हणतात की, "महाराष्ट्र मंडळ हे जगातलं भारताबाहेरील पहिलं मराठी मंडळ असून जेव्हा आम्हाला असं समजलं की, हा सोहळा इथे होतोय तेव्हा आम्ही अभिजीत पाटील यांना पत्र लिहीलं, त्यात नमूद केलं, की कोणतीही अपेक्षा न बाळगता आम्ही या सोहळ्यासाठी तुम्हाला जी हवी ती मदत करू. त्यामुळे या सोहळ्या संदर्भात आमची हीच भूमिका आहे की, आम्ही त्यांना या सोहळ्यासाठी खुल्या हाताने मदत करणार आहोत.

या सोहळ्यामुळे लंडनमधील मराठी मंडळांना काही फायदा होणार का? असं विचारता ते म्हणतात की, " दूरचा जर विचार केला तर नक्कीच या सोहळ्याचा आम्हाला फायदा होणार...कारण यासाठी येणा-या कलाकारांशी आमची ओळख होईल. आणि याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे आम्ही संयुक्त मराठी मंडळ स्थापलं असून लंडनमध्ये विखुरलेल्या अनेक मराठी लोकांना एकत्र आणण्य़ासही याची मदत होईल...

या सोहळ्याचे आयोजक अभिजीत पाटील आणि महेश मांजरेकर यांच्याबद्द्ल बोलतांना ते म्हणाले की, "अभिजीत पाटील हा खरंच खूप अ‍ॅक्टीव्ह माणूस असून या सोहळ्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. महेश मांजरेकर हे स्वत: मंडळात येऊन गेलेत. महेश मांजरेकरांशी माझी काही वैयक्तीक ओळख नाहीये पण अभिजीतशी आधीच ओळख आहे. या दोघांनीही खरंच ही चांगली संकल्पना समोर आणली आहे. हिंदुस्थानाच्या बाहेर मराठी कलेला नेणं हे खूप कौतुकाचं आहे.

पुरस्कार सोहळ्याची तारीख जवळ आली असून सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली आहे, याबद्दलही त्यांनी सांगीतले ते म्हणाले की, " मुख्य सोहळा हा २५ तारखेला होणार आहे आणि २३-२४ तारखेच्या कार्यक्रमांची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. २४ ला कलाकार आणि स्थानिक मराठी लोकांमध्ये होणारी क्रिकेटची मॅच ही महाराष्ट्र मंडळाच्या पेशवा क्रिकेट क्लब येथे खेळली जाणार आहे.

लोकांमध्ये या सोहळ्याचा उत्साह कसा आहे? असं विचारता त्यांनी सांगीतले की ," खूप जास्त उत्साह आहे लोकांमध्ये...कारण लोकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना जवळून भेटता येणार आहे, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात हा सोहळा होणार असल्याने या सोहळ्याला साधारण प्रेक्षक येतील असं विचारता ते म्हणाले की, " इंडिगो-२ या थिएटरची कपॅसिटी १२०० च्या जवळपास आहे. आणि प्रमोशला लोकांचा प्रतिसाद पाहता हजारच्यावर तरी प्रेक्षक या सोहळ्याला हजेरी लावतील असं मला वाटतं...

महाराष्ट्र मंडळाबद्दल सांगतांना ते म्हणतात की, " मुळात आमच्या मंडळाच्या घटनेतच असं नमूद आहे की मराठी कला, संस्कृती, भाषा इथे रुजवायची. त्यामुळे त्यासाठी अनेक उपक्रम आम्ही राबवितो. इकडे जन्मलेल्या मराठी मुलांना मराठी शिकविण्याचा आमचा जास्त प्रयत्न असतो. त्यांचं काय होतं की त्यांचे मित्र इंग्लिश असतात, सतत इंग्लिश बोलत असतात, चित्रपटही त्याच भाषेतील पाहतात. त्यामुळे त्यांना मराठीची ओळख व्हावी म्हणून या गणपतीत बालकलाकारांचा एक मराठी कार्यक्रम आम्ही आयोजीत केला आहे. त्यातून ते मराठी बोलण्याचा निदान प्रयत्न करतात. मराठी भाषेबाबत आणखी एक असं की, आम्ही शक्यतो आमचं माहिती पुस्तक मराठीत काढतो. शिवाय नवीन साहित्यावर आम्ही चर्चा सुद्धा घडवून आणतो.

एकंदर काय तर मिफ्ता परदेशात होत असल्याने फक्त मराठी कला क्षेत्रालाच फायदा हॊणार नसून तिथल्या स्थानिक मराठी मंडळांनाही उभारी मिळणार आहे एवढं मात्र नक्की....

-अमित इंगोले.