Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

फॅंड्री ने माझ आयुष्य बदलले....!

त्याच काय हाय! म्या आज पतूर मुलींशी बोललो न्हाय पण मला आमच्या शाळेत चवथी मदी एक मुलगी व्हती ती मला लय आवाडायची पण ती पाचवीत शाळा सोडून गेली. मग काय न्हाय म्या तिचा इचार करणच सोडून दिल. पण फॅंड्री ने माझ आयुष्य बदलल अशाच काही शब्दात सोमनाथ ने झगमग टीम बरोबर आपला अनुभव शेअर केला.

चित्रपटात काम कसे मिळाले?

नागराज मंजुळे यांना मी अण्णाकाका म्हणतो. अण्णाकाकांचा आमच्या केम गावात सत्कार होता, त्यांच्या स्वागतासाठी आमच्या केमच्या ‘उत्तरेश्वर’ हलगी ग्रुपला बोलावलं होतं. मीपण आमच्या ग्रुप सोबत हलगी वाजवत असताना अण्णाकाकाचं माझ्याकडे लक्ष गेलं. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी माझी ऑडीशन घेतली. “काम करशील ना सिनेमात?” असे विचारले. मी नटतच “होय” म्हणालो. मला फार भारी वाटले पण काही वेळ गेल्यावर मला भीती वाटू लागली. हा सारा प्रकार माझ्यासाठी फारच नवीन होता. नवीन माणसात मिसळण्याची, कॅमेरासमोर उभं राहण्याची खूपच भीती वाटू लागली होती. मग मी दुसऱ्या दिवशी काम करणार नाही, असे सांगितले. अण्णाकाकांचे आमच्या गावात राहणारे मित्र सचिन बिचीतकर दादा आमच्या घरी येऊन खूप आग्रह करायचे. पण मी ते येणार म्हणून कळलं की पळून जायचो, मला लोक गावभर शोधायचे, मी घाबरून गावातल्या पाण्याच्या टाकीवर दडून बसायचो, कुणालाच सापडायचो नाही . घरातलेसुद्धा मला ‘सिनेमात काम कर’ म्हणून आग्रह करायचे पण माझ्या मनात भीतीचा गोळा उठायचा.एक दिवस अण्णाकाकांनी मला त्यांचे राष्ट्रपतींसोबत त्यांचे व सुरज पवार याचे ‘पिस्तुल्या’च्या वेळचे बक्षीस घेतानाचे फोटो दाखवले व मला म्हणाले, अरे तू नीट काम केलंस तर तुलादेखील असं अवार्ड मिळू शकेल. माझा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. मी जवळजवळ तीन महिने नाही म्हणत होतो.

एकदा अण्णाकाका म्हणाले तू एकदा माझ्यासोबत पुण्याला चल, तुला नाही बरं वाटलं तर मी तुला पुन्हा आग्रह नाही करणार. मी पुण्याला माझ्या भावासोबत गेलो. हळूहळू सर्वांच्या ओळखी होत गेल्या आणि मनातून भीती जाऊ लागली, अण्णाकाका म्हणतील तशी अॅक्टिंग करू लागलो आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी तर माझ्या रोजच्या जगण्यातल्या होत्या. त्यामुळे त्या जवळच्या आणि सोप्या वाटत गेल्या.

फॅंड्री मध्ये तू मुख्य भूमिका करणार आहे याची माहिती होती का?

एक दिवस अण्णाकाकांनी अचानक शुटींगची तारीख सांगितली . मी हळूच अण्णाकाकांना विचारलं , ‘माझा साईडचा रोल आहे ना?’ अण्णाकाका म्हणाले, ‘नाही, तुझी प्रमुख भूमिका आहे.’ पोटात भीतीचा गोळा आला, पण मी मनाची तयारी केली. शूट सुरु झालं, सीनमध्ये मला काय करायचाय हे अण्णाकाका मला करून दाखवायचे, मी फक्त ते सांगतील तस करायचो, त्यामुळे अॅक्टिंगचं टेन्शन मला कधी आलंच नाही. शूटमध्ये अनेक ओळखी झाल्या, रोज नव-नवे अनुभव येत गेले. फिल्ममध्ये माझ्या मित्राची भूमिका करणारा सुरज पवार फिल्मबाहेरही माझा चांगला मित्र झाला आहे.

शुटीगदरम्यान तुला काही दुखापत झाली होती का?

शुटींगदरम्यान मी आणि सुरज आमचं काम नसलं की क्रिकेट खेळायचो, मस्ती करायचो. त्यामुळे एकूण फिल्म करताना खूपच धमाल आली.एक सीन खूप धावपळीचा होता, त्याचवेळी नेमकी माझ्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती, फिल्मच्या कंटीन्यूटीमुळे पट्टी बांधता येत नव्हती, तसेच जखम झाली आहे, असे दिसू दयायचे नव्हते. मग मी अजूनच पाय धुळीत मळवून पळायचो, तशात पाण्यात बुडायचेही सीन दिले, थोडा त्रास झाला. पण माझ्या या जिद्दीने अण्णाकाकांसहित सगळ्यांनीच माझं कौतुक केलं.

शूट संपल्यावर बाकीच्या गोष्टी ही महत्वपूर्ण असतात तुला माहित होत का?

शूट संपल्यावर मी गावी परत आलो, मी खूप काय मोठं काम केलं आहे असं मला अजिबात वाटत नव्हतं किंवा ही फिल्म कशी होईल याचा मला अंदाजसुद्धा नव्हता, ज्या फिल्ममध्ये सलमान खान, शाहरुख खान असे हिरो असतात तीच फिल्म असते, माझ्यासारखा लहान, काळा मुलगा कसा काय हिरो असू शकतो असं वाटायचं. मी फोन करून अण्णाकाका व इतरांना सारखे विचारायचो, “फिल्म रिलीज कधी होणार?” गावातही मला सारखे विचारयचे. तर अण्णाकाका मला म्हणायचे, “अजून खूप काम बाकी आहे. वेळ लागेल.” मला प्रश्न पडायचा, फिल्म तर कधीच पूर्ण झालीय आणि हे अजून कसलं काम बाकी आहे? आपण उगीच फिल्ममध्ये काम केलं असं मला कधी-कधी वाटू लागलं. मग मला सांगण्यात आले की मुंबईत एडीटिंग, साउंड डबिंग चालू आहे. या गोष्टी मला काही कळत नव्हत्या, त्यामुळे विश्वास बसत नव्हता. पण शुटींगदरम्यान निर्माण झालेल्या बंधामुळे मला सगळ्यांची (विशेषत: दिग्दर्शन टीममधील गार्गीताई, प्रियांकाताई व पूजाताई यांची) आठवण यायची. मी सर्वाना फोन करायचो, फिल्म बद्दल विचारायचो. अण्णाकाका मधून अधून गावी आले की मला आवर्जून भेटून जात असत. पण फिल्म कशी होईल, ती थेटरला लागेल का, अण्णाकाका आधी म्हटल्याप्रमाणे मला अॅवार्ड मिळेल का अशा अनेक शंका मनात यायच्या.

सगळी कडे तुझ कौतुक होत आहे तुला कस वाटतय?

फिल्म पूर्ण झाल्यावर ती बऱ्याच फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होऊ लागली. पेपरमध्ये माझे फोटो यायला लागले, सगळीकडे बातम्या झळकायला लागल्या. फिल्मचं, माझ्या अक्टिंगचं कौतुक छापून यायला लागलं. मला खूप आनंद वाटत होता. एकदा माझी, अण्णाकाका व सुरजची मुलाखत झी २४ तास वर झाली आणि मी टीवीवर पण दिसलो, आता मला गावातले सगळेजण ओळखू लागले व आदराने पाहू लागले, मला ते फार भारी वाटू लागलं. माझे गावात फ्लेक्स लागले आहेत. त्यामुळे माझ्या घरचे, माझे नातेवाईक सर्वच माझ्यावर खूप खुश आहेत. फिल्मच्या प्रमोशनसाठी आणि अभ्यासासाठी मी पुण्यात अण्णाकाकांसोबत होतो, एकदा तेथील पाणीपुरीच्या गाडीवर मी आणि सुरज पाणीपुरी खात असताना तेथील मुलं फँड्रीचा प्रोमो मोबाईलवर पाहत होती व काय भन्नाट सिनेमा आहे असं बोलत होती, बहुतेक त्यांनी आम्हाला ओळखलं होतं...

पुणे फिल्म फेस्टिवलमधला तुझा अनुभव कसा होता?

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दोन्ही शोजना खूप गर्दी होती, फिल्म संपल्यावर अण्णाकाकांनी माझी ओळख करून द्यायला स्टेजवर बोलावले, मी वर गेलो तेव्हा खूप जोरात टाळ्या – शिट्ट्यांचा अक्षरशः गजर झाला, थेटरमधून बाहेर येत होतो तर लोक मला मिठी मारून माझं, माझ्या अभिनयाचं कौतुक करत होते, मला लोक सह्या मागत होते , मला एकदम सलमान खान झाल्यासारखं वाटत होतं. मी खूपच भारावून गेलो होतो. फेस्टिवलच्या निकालादिवशी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नाव जाहीर झालं तेव्हा अण्णाकाका खूप खुश झाले होते, त्यांनी मला मिठी मारली आणि मला स्टेजवर घेऊन गेले, अंजुम राजाबली - ज्यांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं त्यांनी तर मला उचलूनच घेतलं. जसं की अण्णाकाका मला म्हणाले होते की तुलाही बक्षीस मिळेल तसं मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि तेही इतकं मोठं बक्षीस मिळालं होतं.

तुझ्या वडीलांना काय वाटतय तुझ्या बद्द्ल?

माझे वडील पोतराज आहेत, मला आधी ह्यामुळे खूप न्यूनगंड वाटायचा, म्हणजे मी वडिलांना शूटवरसुद्धा येऊ नका असं सांगितलं होतं. मला खूप लाज वाटायची. ह्या फिल्मची कथा माझ्या कथेशी खूप मिळतीजुळती आहे, पण फिल्मच्या निमित्ताने माझ्या वडिलांचा फोटो पेपरमध्ये छापून आला तेव्हा मला खूप बर वाटलं.

आत पुढे काय करायच ठरवल आहे?

मी अभ्यासाचे महत्व न कळल्याने थोडा मागे आहे पण आता मी खूप मन लावून अभ्यास करतो, शिकण्याशिवाय पर्याय नाही, हे मला पटू लागले आहे. गार्गीताई, प्रियांकाताई व डॉ. प्रदीप आवटे हे सध्या मला अभ्यासातले शिकवत आहेत. यामुळे मला अभ्यासाची गोडी वाटू लागली आहे. आता अभ्यास आणि अभिनय दोन्ही अधिक शिकून खूप मोठे व्हावे, असे माझे स्वप्न आहे... या फिल्ममुळे मला हे स्वप्न पाहता आले. आधी असलेल्या भीतीची, न्युनगंडाची जागा आता आत्मविश्वास, स्वप्न यांनी घेतला आहे... ह्या फिल्ममधून माझी खरी कमाई हीच असावी.