Sign In New user? Start here.

टाइमपास हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट - वैभव मांगले

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

टाइमपास हा माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट - वैभव मांगले

टाइमपास या चित्रपटाला समस्त प्रेक्षकवर्गाचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. या यशामागचं गमक तुम्हाला काय वाटतं ?

वैभव - टाइमपासच्या निमित्ताने मला एक प्रामुख्याने हे जाणवलं की जर तुम्ही आपला चित्रपट प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवला तर ते थिएटरपर्यंत येतात हे नक्की आणि जर तो चित्रपट उत्कृष्ट असेल तर प्रेक्षक त्याला उचलुन धरतात. झी आणि एस्सेल व्हिजनच्या टीमने हे काम नेहमीप्रमाणे चोखपणे केलं आहे. शिस्तबद्ध पद्धतीने चित्रपटाचं मार्केटींग आणि प्रसिद्धी करून तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवल्यास चांगला प्रतिसाद मिळतो हे आजवर " साडे माडे तीन ", " दे धक्का ", " काकस्पर्श ", " दुनियादारी " ते आता टीपीनेही सिद्ध केलंय. या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावरच टीपीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघून मी भारावून गेलोय शिवाय अचंबितही झालोय आणि यासाठी त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

तुम्हाला प्रेक्षकांकडुन कशा प्रतिक्रिया मिळत आहेत ?

वैभव - माझ्यापर्यंत प्रेक्षकांच्या अनंत प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपट तर त्यांना आवडतोय शिवाय माझ्या कामाचंही ते भरभरून कौतुक करत आहेत. माझं काम आवडल्याचं कळवत आहेत. फू बाई फू या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर ज्या प्रकारचं फेम आणि प्रसिद्धी मला मिळाली होती अगदी त्याच प्रकारचं प्रेम मला टीपीमुळे प्रेक्षकांकडून मिळतंय. त्यामुळे टीपी हा माझ्या करिअरमधला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरलाय असं मी मानतो.

टीपीमधील तुमच्या लेले ऊर्फ शाकाल या पात्राबद्दल काय सांगाल ?

वैभव - लेले ही सहाय्यक व्यक्तिरेखा चित्रपटाच्या पुर्वार्धात विनोदी ढंगाने येत असली तरी उत्तरार्धात ती व्यक्तिरेखा अत्यंत गंभीर आहे. अल्लड वयातल्या मुलीची काळजी वाटणारा बाप ते मुलगी भिन्न आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या मुलाच्या प्रेमात पडलीय हे कळल्यानंतरचा असहाय्य बाप.. ही भूमिका खुप आव्हानात्मक होती. शिवाय रवीने या व्यक्तिरेखेचं डिझाईन खुप सुंदर पद्धतीने केलं आहे विशेषतः पडद्यावर जेव्हा लेलेंचं पात्र येतं किंवा दगडू-लेलेचा सामना होतो तेव्हा वाजणारं " इन्सानियत के दुश्मन " हे पार्श्वसंगीत त्या दृश्यात आणखीनच धम्माल उडवुन देतं. माझ्या मते कॅरेक्टरचं महत्त्व वाढवण्याचा हा सुंदर प्रकार आहे. दगडु आणि प्राजक्ताच्या प्रेमाला विरोध करणारं माझं एकमेव पात्र आहे आणि ते लेखनातून खुप चांगलं मांडलंय पण या पार्श्वसंगीतामुळे ते अधोरेखीत करण्याचं काम रवी आणि त्याच्या टीमने केलंय. यामुळे माझ्या पात्राला एक वेगळी ओळख मिळाली आणि लेले हा प्यार का दुश्मन आहे हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्याचं काम कमी वेळात झालं. चित्रीकरणाच्या वेळीच काय अगदी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत असाही काही प्रकार असेल असं वाटलं नव्हतं पण पडद्यावर ते बघुन आणि प्रेक्षकांच्या टाळ्या हशे बघून मी पण अचंबित झालो. आता मला शाकाल अशी नवी ओळख मिळालीये , रस्त्याने जाताना लोक पण शाकाल शाकाल म्हणून ओरडत आहेत त्यामुळे आपलं काम लोकापर्यंत योग्यरितीने पोचलंय याचं समाधान आहे.

टीपीला व्यावसायिक यश तर मिळतंच आहे शिवाय प्रेक्षक स्वतःहुन सोशल नेटवर्क साइट आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून संदेश, फोटो पाठवत आहेत.. या प्रतिसादाबद्दल काय सांगाल.. ?

वैभव - माझ्या मते हे ख-या अर्थाने टीपीच्या टीमवर्कचं यश आहे. टीपीचं दिग्दर्शन, संवाद, संगीत, अभिनय अशा सर्वांचीच कामगिरी चोख झाली आहे. शिवाय प्रेक्षकांची नाडी अचूकपणे ओळखण्यात या टीमला यश आलंय. प्रेक्षकही चित्रपटाशी स्वतःला रिलेट करत आहेत. स्वतःचा भूतकाळ आठवत आहेत, दगडु-प्राजक्ता मध्ये स्वतःला, लेलेमध्ये कुणाला तरी शोधत आहेत. त्या गोष्टी कुठे तरी जुळून आल्या की त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आज टीपीची रिंगटोन तयार झालीये, संवाद व्हॉट्स अपवर शेअर होत आहेत आणि हा त्यांचा मनापासूनचा प्रतिसाद आहे असे मी मानतो, थोडक्यात प्रेक्षकांची मने जिंकण्यात टीपीला यश आलंय असं म्हणता येईल.

टीपीमधील दगडू आणि प्राजक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीये. त्या दोघांच्या अभिनयाबद्द्ल काय सांगाल ?

वैभव - या सिनेमाचा सगळ्यात मोठा युएसपी म्हणजे दगडू आणि प्राजक्ताचा निरागसपणा हाच आहे. आणि तो आपल्या भुमिकेत उतरवण्यात प्रथमेश आणि केतकी यशस्वी झालेत. हा निरागसपणा त्यांनी शेवटपर्यंत जपलाय आणि हे अगदी सहजपणे आलंय. बहुतेकवेळा अभिनय करण्याच्या नादात हा निरागसपणा, भाबडेपणा, सहजता आपण गमावुन बसतो. पण या मुलांनी हे आव्हान चांगल्याप्रकारे पेललंय, अर्थात यामागे रवीचंच कौशल्य आहे त्याच्यामुळेच हे सर्व काही सहजशक्य झालंय.

टीपीने अवघ्या ५ दिवसांतच १० कोटींचा आकडा पार केलाय. येणा-या काळात तुम्ही टीपीकडुन आणि प्रेक्षकांकडुन काय अपेक्षा ठेवताय ?

वैभव - खरं सांगु का, चित्रपटाच्या कमाईचे, त्या आकडेवारीचे हिशोब मी सांगत नाही कारण माझा त्यात फारसा अभ्यास नाही. पण हा सिनेमा आपल्या मराठी जगतासाठी इतिहास रचणारा आहे. मराठीमध्ये काही दिवसांपूर्वी आलेली विनोदी सिनेमांची लाट खरं तर प्रेक्षकांनीच हाणून पाडलीये आणि आता टीपी सारख्या हलक्या फुलक्या प्रेमकथेला ते भरभरुन प्रतिसाद देत आहेत याचाच अर्थ अश्या गोष्टी त्यांच्या मनाला भावत आहेत. यामुळे मराठीमध्ये जे नवीन दिग्दर्शक येऊ पाहत आहेत त्यांना टीपी मधून निश्चितच प्रेरणा मिळेल असं मला वाटतं आणि त्यातून आपल्या मराठी सिनेइंडस्ट्रीचा फायदा व्हावा एवढीच माझी अपेक्षा आहे.