Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘सत ना गत’मधील नामीच्या आव्हानात्मक भूमिकेत पाखी हेगडे.

   संवेदनशील अभिनयासाठी वेगळी ओळख असणारी भोजपुरीमधील आघाडीची सिनेतारका म्हणजे पाखी हेगडे. ४५ हून अधिक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेल्या पाखी हेगडे यांनी गंगा मैय्या या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्च यांच्यासोबत देखील अभिनय केला आहे. कन्नड भाषिक आलेल्या पाखी यांनी भोजपुरी सिनेमात स्वत:चा वेगळा ठसा उमटविल्यानंतर साई सागर फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित, देविशा फिल्म्स प्रस्तुत ‘सत ना गत’ या चित्रपटाव्दारे मराठीत दमदार पदार्पण केलंय. अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविलेल्या ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’च्या यशस्वी निर्मितीनंतर निर्माते अभिजीत घोलप यांची ही आगामी कलाकृती आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘सत ना गत’ हा चित्रपट येत्या १३ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय या निमित्ताने पाखी हेगडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

   * तुमच्या करीअरची सुरूवात भोजपुरी चित्रपटातून कशी झाली ?

   - भोजपुरी सिनेसृष्टीत आज जवळपास ४० हून अधिक चित्रपटांमध्ये मी काम केले आहे आणी हे सर्वच चित्रपट स्त्रीप्रधान भूमिकांवर आधारीत होते. मै बनूंगी मिस इंडिया हा माझा टीव्ही शो खूप गाजला. त्यामुळे कलेला भाषेचे बंधन नसते असे मी मानते, आणि त्यानुसार वैविध्यपूर्ण चित्रपटांमध्ये काम करण्याकडे माझा कल असतो. भोजपुरी, बिहारी आणि आता मराठी अशा माझ्या प्रवासात मी नेहमीच स्त्रीप्रधान भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. आगामी ‘सत ना गत’ चित्रपटांमध्येही तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

   * ‘सत ना गत’ मधील नामीच्या मध्यवर्ती भूमिकेविषयी काय सांगाल ?

   - दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी मला याआधी ग्लॅमरस भूमिकांमध्ये पाहिले होते. त्यांनी मला नऊवारी गेटअपमध्ये यायला सांगून एक दिवसाचे चित्रीकरण करून ‘सत ना गत’ मधील नामी कॅरेक्टरसाठी मी परफेक्ट असल्याचे सांगितले. कादंबरीचे कथानक मला आवडलेच शिवाय या चित्रपटाची संपूर्ण कथा नामी या व्यक्तीरेखेभोवती फिरत असल्याने या भूमिकेला मी लगेचच होकार दिला. अशाप्रकारे ‘सत ना गत’ या आशयघन चित्रपटातून माझा मराठीत प्रवेश झाला.

interview of actress pakhi hegde

   * नामीची व्यक्तिरेखा साकारतानाचा अनुभव कसा होता ? काय विशेष मेहनत घेतली ?

   - नामीची व्यक्तिरेखा साकारताना मला कादंबरीची खूप मदत झाली. नामीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे कंगोरे, तिची मनस्थिती, सह कलाकारांनी दिलेल्या सुचना आणि दिग्दर्शक राजू पार्सेकर यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यातून कादंबरीमधील नामी पडद्यावर साकारली. मूळची मी वसईकर असल्याने मराठीशी माझे फार जुने ऋणानुबंध आहे. या भूमिकेसाठी कोल्हापूरी भाषेचा लहेजा हवा होता, तशी बोली भाषा आत्मसात करायला मला माझ्या असिस्टंटने मदत केली. नामीच्या भूमिकेसाठी मला अनेक तास बसून ग्रामीण लिक असणारा मेकअप करावा लागायचा, त्यातही नऊवारी साडीत काम करण्याचा हा अनुभव खूपच वेगळा होता.

   * मराठीतील आघाडीचे सुपरस्टार या चित्रपटात तुम्हाला सहकलाकार म्हणून लाभले याविषयी काय सांगाल ?

   - महेश मांजरेकर, भरत जाधव, सयाजी शिंदे हे सर्वच कलाकार अभिनयात आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप शिकण्यासारखा होता. महेश सरानी, राजू पार्सेकरांनी अभिनयातले बारकावे शिकवले ज्याचा मला नेहमीच उपयोग होईल. भरत जाधव हे देखील सांभाळून घेणारे सहकलाकार असून सेट्वर त्यांचा वावर अगदी सहजसुंदर असतो. सगळ्यांनीच माझा पहिला मराठी चित्रपट असल्याने मला सहकार्य केले.

   * लवकरच ‘सत ना गत’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय, त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगशील ?

   - भोजपुरीतील माझ्या अभिनयाची दखल प्रेक्षकांनी घेतलीच आहे, तशीच माझ्या ‘सत ना गत’ चित्रपटातील अभिनयाची दखल रसिक प्रेक्षकांनी घ्यावी अशी इच्छा आहे. प्रेक्षकांनी सकस कथानकावर बेतलेला हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पहावा आणि चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा हेच मी सांगेन...

- अमित इंगोले