Sign In New user? Start here.

Interview of atul todankar

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

माझ्यासाठी वेगळी ठरणारी भूमिका - अतुल तोडणकर

   ‘बेस्ट’ मध्ये नोकरी करता-करता अभिनय क्षेत्रातही स्वत:चा खास ठसा उमटवलेला अभिनेता म्हणजे अतुल तोडणकर. एकांकिका ते साक्षात सुपरस्टार शाहरुखबरोबर केलेली जाहिरात हा प्रवास त्याच्यासाठी काही सोपा नक्कीच नव्हता. मात्र, आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर अतुल तोडणकर हे नाव मनोरंजन क्षेत्रात चमकताना दिसतंय. ‘फू बाई फू’ या लोकप्रिय शो चा तो विजेता ठरला आणि घराघरात जाऊन पोहचला. या लोकप्रिय कार्यक्रमाने तर त्याच्या या प्रवासाला वेगळीच कलाटणी मिळाली. ‘फू बाई फू’ नंतर ‘पिंजरा’, ‘पुणेरी मिसळ’, ‘एकापेक्षा एक’ अनेक लोकप्रिय कार्यक्रमांसोबतच नाटकं आणि सिनेमांमधील बहुरंगी भूमिका अतुलच्या वाट्याला आल्यात. असा हा बहुरंगी अभिनेता या ‘माझा मी’ सिनेमात आपल्या अभिनयाचे रंग भरणार आहे. या भूमिकेबद्दल अतुलशी साधलेला संवाद....

   * ‘माझा मी’ या सिनेमातील तुझी भूमिका काय आणि कशी आहे ?

   - ‘माझा मी’ या टायटलवरून तुम्हाला कळले असेल की ही एका व्यक्तीची कहाणी आहे. सिनेमात हे महत्वाचं पात्र रंगवलंय अभिनेता प्रसाद ओकने. या मुख्य पात्राबरोबर त्याच्या लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत त्याची आजन्म साथ देणा-या लक्ष्याची मी भूमिका केली आहे. ही भूमिका ऎकल्यानंतरच मी ठरवलं की ही भूमिका मला करायचीच आहे. या भूमिकेचं वेगळेपण सांगायचं तर आपल्या इंडस्ट्रीत कोणत्याही कलाकाराच्या नावाखाली एखादा टॅग लागतो. विनोदी अभिनेता, अ‍ॅक्शन अभिनेता, रोमॅंटिक हिरो असा टॅग लागतो. ज्यावेळी तुम्हाला वय वर्ष १५ ते वय वर्ष ५५ अशा प्रवासातलं जेव्हा तुम्हाला कॅरेक्टर मिळतं तेव्हा तुमच्या अभिनयातून तुम्हाला सर्वच भाव दाखवता येऊ शकतात. कॉमेडी, नॉटीनेस, रोमॅंटिक, गृहस्थाश्रमातील काही स्वभाव विशेष असेल अशा सर्वच गोष्टी दाखवता येतात. उगाच बेरींग न घेता म्हातारं कॅरेक्टर कसं करायचं हे मला चांगलं माहित असल्यामुळे मी पटकन या भूमिकेला होकार दिला.

   * या भूमिकेने तुझ्यावर असलेला विनोदी कलाकाराचा शिक्का पुसला जाणार का ?

   - हो नक्कीच ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी ठरणार आहे. याआधी ‘पिंजरा’ या मालिकेत एक अतिशय वेगळा रोल करून प्रयत्न केला गेला होता. पण सिनेमा, नाटक आणि मालिका हे तिनही माध्यमं वेगळी आहेत. त्यामुळे ‘माझा मी’ सिनेमातील ही भूमिका खूप वेगळी आहे ज्यात मला वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन दाखवायला मिळताहेत.

   * प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाची भूमिका तुम्हाला करायला मिळते आहे याबद्दल कसं वाटतंय ?

   - खरंतर हा खूप योगायोग आहे कारण मला नाटकातले प्रशांत दामले आणि सिनेमातले लक्ष्मीकांत बेर्डे हे दोन अभिनेते खूप आवडतात. आवडण्यामागचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे भयंकर एनर्जी, प्रसन्नता आहे. मला ते एवढे आवडतात की मी माझी हेअर स्टाईल सुद्धा लक्ष्या मामासारखीच ठेवली होती. अनफॉर्च्युनेटली मी या क्षेत्रात थोडा उशीराच आलो, त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करायची माझी ईच्छा तशीच राहिली. लवकरात लवकर प्रशांत दामलेंबरोबर काम करायची ईच्छा पूर्ण व्हावी अशी अपॆक्षा आहे. लक्ष्या मामासोबत काम करायला नाही मिळालं पण त्यांच्या नावाची भूमिका करायला मिळाली याचा आनंदही मला खूप आहे.

   * ‘माझा मी’ या सिनेमाचं वेगळेपण काय सांगता येईल?

   - ‘माझा मी’ या सिनेमाविषयी वेगळेपण असं आहे की, या सिनेमामधील प्रत्येक कॅरेक्टरला एक वयाची रेंन्ज आहे. म्हणजे जसं मी आणि प्रसाद लहानपणापासून म्हातारपणापर्यंत जवळचे मित्र असतो. आजपर्यंत मराठी सिनेमात असं झालं की नाही मला माहिती नाही, पण सिनेमातील प्रत्येक पात्रांचं ऎकमेकांशी नातं असलेला हा पहिला सिनेमा असेल. त्या नातेसंबंधातूनच याची कथा फुलत जाते.

   * या सिनेमात काम करण्याचा अनुभव कसा होता ?

   - प्रसादला मी आधीपासून ओळखतो. प्रसाद ओकसारख्या चांगल्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळणं खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यासमोर काम करताना बरंच शिकायला मिळतं. अशा फार कमी व्यक्ती आहे आपल्या इंडस्ट्रीत त्यापैकी एक प्रसाद ओक आहे. तसेच उदय टिकेकर हे जवळजवळ माझ्या मोठ्या भावासारखेच आहेत. या सिनेमात माझा रोल मोठा किंवा छोटा असा काही भाग नव्हताच. म्हणजे सीन संपला की सगळे ऎकमेकांशी गंमत करायला, मस्ती करायला एका ठिकाणी यायचे.

   * एकीकडे अनुभवी कलाकार आणि दुसरीकडे नवीन निर्माते-दिग्दर्शक हा अनुभव कसा होता ?

   - बेसिकली मला नवीन जुनं ही गोष्टच पटत नाही. नवीन असतात म्हणजे काय त्यांचं नाव नवीन असतं. काम कधी नवीन नसतं. मीही कधीकाळी नवीनच होतो. एकतर तुम्ही इतक्या क्रिएटीव्ह फिल्डमध्ये आहात जिथे तुमचं काम आणि नाव बोलतं. तुमचं काम चांगलं असलं तर तुमचं नाव होतं आणि नाव झालं की चांगलं काम करावंच लागतं. या मताचा मी आहे त्यामुळे कोण नवीन कोण जुना हा मुद्दाच नाहीये. ‘माझा मी’चे दिग्दर्शक-निर्माते यांच्याबाबत सांगायचं झालं तर ही खूप गोड माणसं आहेत. निर्माता म्हटला की कुणीही दोन हात लांबच असतो पण यांच्याबाबतीत तसं नाहीये. ते खूप आधीपासूनच आपल्यातलेच असल्यासारखे वागले. हा खरंच त्यांच्या खूप मोठेपणा आहे.

   * प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा ?

   - सिनेमा बघावा यासाठी की हा सिनेमा प्रत्येकाचा आहे. सिनेमाचं नावंच तसं आहे ‘माझा मी’. लहानांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांशीच रिलेट करणारा हा सिनेमा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस माणूस स्वत:साठीच जगत नसतो, प्रत्येक वेळेस माणूस स्वत:च्या मर्जीनेच जगतो असं काही नसतं, बरेचदा आपल्याला इतरांसाठी जगावं लागतं. मग ते इतर कोण तर आपल्याच घरातील लोक असतात आणि मग अशा वेळेस मी स्वत:साठी काय केलं ? याचा विचार जेव्हा करायला आपण बसतो, तेव्हा लक्षात येतं की, आपण आपल्यासाठी काहीच केलं नाही. ह्या ओळी आजच्या धकाधकीच्या लाईफमध्ये सगळ्यांनाच लागू पडतात. अशाच काहीशा मुद्द्यावर आमचा सिनेमा बेतला आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‘माझा मी’ बघावा.

- अमित इंगोले