Sign In New user? Start here.

 

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

प्रत्येकाला स्वत:ची वाटेल अशी कथा ‘माझा मी’ - अतुल वनगे

   मराठी चित्रपटाचं रूप बदलत असल्याने अनेक नवीन निर्मात्यांसाठी चित्रपट निर्मितीची दारे उघडली गेली. त्यामुळे अनेक नवीन निर्माते मराठी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात येताहेत. त्यात काही मोठी लोकप्रिय नावं आहेत तर काही नवीन नावं आहेत. हे निर्माते नवीन जरी असले तरी त्यांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टीकोन अतिशय वेगळा आहे. नवीन काहीतरी करण्याची त्यांच्यात जिद्द असल्याचे दिसून येते. मराठी फिल्म इंडस्ट्रीत अतुल वनगे आणि निनाद वनगे हे दोन नव्या दमाचे निर्माते दाखल झाले आहेत. त्यांच्या ‘एव्हीएनव्ही मोशन पिक्चर्स’ची पहिलीच निर्मिती असलेला ‘माझा मी’ हा सिनेमा येत्या २३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेनिर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकल्याच्या निमित्ताने निर्माते अतुल वनगे यांच्याशी केलेली ही खास बातचीत....

   ‘माझा मी’ ची कथा ही माझ्याच एका कवितेवर आधारीत आहे. साधारण २००७ साली ही कविता मी केली होती. तेव्हापासूनच या कवितेवर चित्रपट करायचा याची गाठ मनात बांधून ठेवली होती. पण २००७ साली चित्रपट करता येईल अशी परिस्थीती नव्हती. मग गेल्या वर्षी हा सिनेमा करायचा या दृष्टीने अनेक हालचाली आम्ही सुरू केल्या. माझा भाऊ निनाद आणि अनेक लोकांना घेऊन त्यावर चर्चा सुरू झाल्या, शेवटी सर्व फायनल करून सिनेमाचं काम सुरू झालं. चित्रपट निर्मितीचा मुळात मला काहीच अनुभव आधी नव्हता. फक्त लहानपणापासून असलेली सिनेमाची आवड सोबत घेऊन निर्मिती क्षेत्राचा हा प्रवास सुरू केला. हळूहळू हे लक्षात यायला लागलं की, सिनेमाच्या निर्मितीसाठी आवडीसोबतच अनेक गोष्टींची माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. त्यानुसार अनेक गोष्टींचा अभ्यास मी केला. या सर्व प्रोसेसमध्ये सर्वात जास्त मदत मिळाली ती माझा भाऊ निनादची...निनादने या सिनेमाच्या निर्मितीसोबतच दिग्दर्शनाची सुद्धा जबाबदारी उचलली त्यामुळे बरीच कामे सोपी झाली. मला खूप आनंद होतोय की माझं स्वप्न पूर्ण होतंय.

   ‘माझा मी’चं कथानक मी लिहिलेल्या ‘माझा मी कधीच नव्हतो’ या कवितेवर आहे. ही कविता कुठल्या एका अनुभवावर नसून मी जवळून पाहिलेल्या अनेक गोष्टी, अनेकांचे अनुभव त्यात रेखाटले. प्रत्येकालाचा जगताना जे अनुभव येतात तेच यात आहे....

   जन्मताच मी माझ्या आई-बाबांचा होतो,
माझा मी कधीच नव्हतो,
जवानीत मी माझ्या प्रेयसीचा होतो,
माझी मी कधीच नव्हतो,
लग्नानंतर मी माझ्या बायकोचा होतो,
माझा मी कधीच नव्हतो...! (अतुल वनगे)

   चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव जरी मला नसला तरी आम्ही सर्व टीम सोबत चर्चा करायचो. मी प्रोड्युसर आहे म्हणून पैसे देऊन मोकळा झालो असे केले नाही. चित्रपटाच्या प्रत्येक निर्णयात मी असायचो. काय हवंय, काय नको, कसं करता येईल या सर्वात माझा सहभाग असायचा. इतकंच नाहीतर कलाकारांच्या निवडीत सुद्धा माझा सहभाग असायचा. प्रसाद ओक याने यात मुख्य भूमिका केली आहे. ती भूमिका फक्त प्रसादच योग्य पद्धतीने साकारू शकतो याचा मला विश्वास होता. आयुष्यातील वेगवेगळ्या स्टेजेसच्या तीन भूमिका त्याने केल्या आहेत. कॉलेज गोईंग तरूणापासून ते एका वृद्ध माणसाचा रोल त्याने निभावलाय. त्या त्या वयात लागणारे हावभाव, विचार करण्याची पद्धत, स्वभावातील बदल या सर्व बाजू प्रसादने खूप चांगल्या रितीने साकारल्या आहेत.

   चित्रपट निर्मितीच्या पहिल्याच अनुभवाबद्दल सांगायचं झाल्यास, मला कलाकारांनी नवीन असल्यासारखं कधी जाणवूच दिलं नाही. सर्व कलाकारांनी खूप चांगला सपोर्ट केला. कुठल्याही प्रकारचे हेवेदावे न करता ऎकमेकांशी मनमोकळेपणाने वागायचे त्याचा कामासाठीही खूप फायदा झाला. सेटवर गमतीच्यावेळी गमंत आणि कामाच्यावेळी काम अस वातावरण असायचं. वेगवेगळ्या सीन्सवर चर्चा व्हायची. कलाकार सुद्धा सजेशन्स द्यायचे त्यामुळे पहिलीच निर्मिती म्हणून जे दडपण होतं ते राहिलंच नव्हतं. प्रत्येक शूटींगला मी लोकेशनवर असायचो, त्यामुळे कलाकारांचा कामाचा उत्साह अनुभवायला मिळाला. शेवटच्या गाण्याचं शूट हे सकाळी १० पासून ते दुस-या दिवशी सकाळी ५ पर्यंत चालू होतं. इतका वेळ सतत काम करूनही त्यांच्यात कोणताही आळस नव्हता. प्रत्येकवेळी नव्याने ते कॅमेरासमोर यायचे.

   ‘माझा मी’ साठी माझे काका म्हणजे सुभाष वनगे यांनीच संगीत दिलंय. गेली कित्येक वर्ष ते संगीत क्षेत्रात आहेत. लहानपणापासून त्यांना आम्ही ऎकत आलोय त्यामुळे इतर कुणाला घेण्यापेक्षा त्यांनाच संगीत देण्यास तयार केले. आणि त्यांनी केलेली गाणी अतिशय चांगली झाली आहेत. तसेच निनादने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले होते, त्यामुळे त्यालाच मी दिग्दर्शन करायला सांगितले आणि त्याने ते उत्तमरित्या केले सुद्धा...दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, आम्ही नवीन असल्याने आम्हाला जरी जास्त कळत नसले तरी आमचे कलाकार आणि तंत्रज्ञ खूप अनुभवी आहेत याचा खूप फायदा सिनेमासाठी झाला.

   ‘माझा मी’ या सिनेमातून मनोरंजनासोबतच संदेशही देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो स्वत:साठी फार कमी असतो. एकप्रकारे तो इतरांसाठीच जगत असतो. जसं लहान असताना आई-वडीलांच्या सांगण्याप्रमाणे जगतो, त्यापुढील टप्प्यांमध्ये जगत असताना तो त्याचा कधीच नसतो. जन्माला येणा-या प्रत्येकाचंच हे कथानक आहे असं आपण म्हणू शकतो. सिनेमा बघतांना प्रत्येकाला असे वाटेल की, कुठेतरी ही कथा त्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे सर्वांनाच हा सिनेमा नक्कीच आवडेल याचा मला विश्वास आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा आवर्जून बघावा, आणि वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडतांना स्वत:साठीही कसं जगता येईल याचा विचार करावा असं मला वाटतं’.

   माझ्याच कवितेवर सिनेमा तयार करण्याचं स्वप्न या ‘माझा मी’ च्या माध्यमातून पूर्ण होतंय. आता थांबायचं नाहीये. पुढे बरेच प्रोजेक्टस आहेत. सोबतच हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. मराठीला जास्त प्राधान्य देऊ हेही तितकेच खरे....

- अमित इंगोले