Sign In New user? Start here.

‘लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचं दु:ख होतं नाही’ - आशिष चौघुले

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचं दु:ख होत नाही’-आशिष चौघुले

Interview of BMM president ashish chaughule
BMM president Ashish Chaughule
Add Comment

   * बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनाची तयारी कुठपर्यंत आलीये ?

   अधिवेशन आता दोन महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. आधीच्या संमेलनातल्या लोकांना रुचलेल्या, तसेच न रुचलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, बॉस्टन मंडळाच्या सहकार्याने प्रॉव्हिडन्स येथील संमेलन, ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ कसे करता येईल, यावर आमचा भर आहे. अधिवेशनाची तयारी जोरात चालू आहे. अधिवेशनातले बहुतेक सर्व कार्यक्रम ठरले आहेत. भारतातले कार्यक्रम निवडणे आणि त्यांचा व्हिसा मान्य होऊन ते कलाकार अमेरिकेत येणे, यात एक मोठ्ठी दरी असते. 'We are using project management skills from planing to execution phase'.

   * बीएमएमचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला अधिवेशनासाठी कोणत्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतात ?

   बृह्नमहाराष्ट्र मंडळाच्या या वटवृक्षाला ४८ फांद्या आहेत. म्हणजे बीएमएम या संस्थेंशी ४८ लहान मोठी मंडळे संलग्न आहेत. अधिवेशनात लोकांचा जसजसा सहभाग वाढत गेला तसतसे अधिवेशनाच्या स्वरूपात बदल होत गेले. अधिवेशनासाठी जवळजवळ १८ समित्या काम करतात आणि १५० ते २०० स्वयंसेवक अधिवेशनाच्या तयारीसाठी झटत असतात. या सर्वांशी संवाद साधून त्यांना वाटून दिलेल्या सर्व कामांची विचारपूस करणं, काही अडचणी असतील त्या सोडवणं, ह्या सर्वांची जबाबदारी माझी म्हणजेच अध्यक्षाची असते. सोबतच भारतातून येणा-या कलाकारांच्या व्हिसासाठी लागणा-या कादगपत्रांची सुद्धा जबाबदारी माझीच असते.

   * बीएमएमच्या या १६ व्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय असणार आहे ?

Interview of BMM president ashish chaughule

   अधिवेशनाची यावर्षी संकल्पना आहे ‘ऋणानुबंध’...ही संकल्पना वेगवेगळ्या लेव्हल्सवर एक्सपॅंड करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही तुमची नाती कशी वाढवता ? 'How do you go back to your roots..?', How do you interact with your nostalgic feelings..?' तर त्या अंगानी या अधिवेशनात थोडं वेगळेपण असेल...तसेच मुंबईच्या सिद्धीविनायकाच्या मुर्तीची आम्ही पहिल्यांदाच अमेरिकेत स्थापना करतोय. सोबतच बॉस्टनमध्ये २०० पेक्षा जास्त युनिव्हर्सिटी आहेत. या युनिव्हर्सिटीं सोबत महाराष्ट्रातील किंवा अमेरिकेतील इतर युनिव्हर्सिटी कशा इंटरॅक्ट करू शकतील या दृष्टीने या अधिवेशनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. जो आत्तापर्यंत कोणत्याच अधिवेशनात झालेला नाहीये. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रातील भारती विद्यापीठ, एमआयटी, भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान, शिक्षण प्रसारक मंडळ, डि. वाय. पाटील अशा ब-याच संस्था यात उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिवाय हे अधिवेशन किर्तीवंत, यशवंत आणि गुणवंत अशा प्रवृत्तीच्या लोकांचां एक संगम असेल...यंदा प्रथमच बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फ़े शाळा चालवणाऱ्या सर्वोत्तम शिक्षकालाही आम्ही सन्मानित करणार आहोत. उत्तर अमेरिकेत राबवलेल्या मराठी शाळा या उपक्रमाला २७ मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पुरस्कार जरी एकाला मिळणार असला तरी सर्वांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी गायनाची ‘सारेगमप’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतल्या लेखकांच्या, कवींच्या पुस्तकांचे प्रकाशनही अधिवेशनात करण्यात येईल जेणेकरुन त्यांच्या कलेची अनुभूती तुम्हा सर्वांना घेता येईल.

   * हे अधिवेशन भरवण्यामागचा नेमका उद्देश सफल होतो का ? की फक्त मनोरंजनासाठीच सगळी धडपड असते ?

   कसं आहे की, अधिवेशनाकडे बघण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेगळा असतो. काही लोक महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांना बघण्यासाठी येतात, काही लोक मित्र किंवा नातेवाईकांना एकत्र भेटायला मिळतं म्हणून येतात, काही लोकं त्यांचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी येतात, तसंच उत्तर अमेरिकेतील एखादा कलाकार म्हणतो की, मला माझी कला दाखवण्यासाठी एकाच छत्राखाली ४ हजार प्रेक्षक मिळतात त्यामुळे मी येतो. काही लोकं वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात, काही लोक मुलींचे लग्न जुळवण्यासाठी येतात, तर काही मेडीकल कॉन्फरन्ससाठी येतात. अशा वेगवेगळ्या नजरेतून अधिवेशनाकडे लोक बघतात. ओमी वैद्य(थ्री इडिएट फेम) सारखा अभिनेता आजही बीएमएमचे आभार मानतो, कारण त्याला अधिवेशनातूनच नाटकं सादर करण्याची संधी मिळाली आणि तो लोकप्रिय झाला. त्यामुळे तिथे येणा-या प्रत्येक व्यक्तीचे उद्देश अधिवेशनातून सफल होतात. त्यामुळे आपण नुसतं असं म्हणू शकत नाही की, मनोरंजनाचे कार्यक्रम चांगले केले म्हणजेच अधिवेशन यशस्वी झाले.

   * यात तिथल्या मराठी नागरिकांचं सहकार्य कसं मिळतं ?

   ज्या शहरात अधिवेशन आहे त्या शहरातील लोकांशी आम्ही संवाद साधून त्यांना स्वयंसेवक होण्यासाठी आवाहन करतो. तशी रितसर नोंदणी आम्ही करून घेतो. ज्यांना ज्या क्षेत्रात रूची आहे त्या त्या विभागांची कामे त्या लोकांकडे आम्ही वाटून देत असतो. कुणालाही कशाप्रकारचा मोबदला आम्ही देत नाही. हे मंडळ तुमचं आहे त्यामुळे घरचं कार्य समजून यात काम करायचं असतं. आणि अर्थातच या सर्वच लोकांना त्यांचे गुण, त्यांची कला वृद्धींगत करण्याची संधीही मिळतेच. त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आणि सहकार्य नेहमीच मिळत असतं.

Interview of BMM president ashish chaughule

   * इतकं मोठं अधिवेशन उभं करण्यासाठी खूप वेळ आणि मनुष्यबळ लागतं, मग स्वत:ची नोकरी-व्यवसाय सांभाळून हे कसं मॅनेज केलं जातं ?

   ‘जग्गनाथाचा रथ आपल्या गावातून ओढला गेला आणि त्यासाठी मदत केली गेली तर प्रत्येक माणसाला बरं वाटतं’. अधिवेशन सुद्धा एकप्रकारे रथ आहे आणि प्रत्येकाला वाटतं की यासाठी आपली काहीतरी मदत मिळायला हवी. व्यक्ती मधील गुणांना इथे खतपाणी घातलं जातं आणि हे सर्वांनाच आवडतं. सोमवार ते शुक्रवार काम करून बरेच लोक स्वत:तील पॅशन जपण्यासाठी उरलेले दोन दिवस कुणी संगीत शिकतं, कुणी नृत्य शिकतं तर कुणी काही शिकतं. त्यासाठी ते धडपडत असतात आणि अधिवेशन त्यांना त्यांचं पॅशन हजारो लोकांसमोर आणण्याची संधी देतं. त्यामुळे ते लोक वेळ काढतातच. शिवाय प्रत्येक मराठी माणूस हा चांगला होस्ट असतोच...आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना वेळ काढून चांगलं आदरातिथ्य देणं हे तो आपलं कर्तव्य समजतो. अधिवेशन सुद्धा याचाच एक भाग आहे. हजारो लोक जेव्हा तुमच्या गावात येतात तेव्हा त्यांनी जातांना नाव काढायला हवं की, ‘खूप छान व्यवस्था होती’. असं जर कुणी बोललं तर त्यांच्या कष्टाचं फलीत होतं.

   * महाराष्ट्रातील कार्यक्रमांची निवड कोणत्या निकषांवर केली जाते ?

   ब-याचदा काही लोकं आम्हाला विचारतात की तुम्ही फक्त उत्तर अमेरिकेतीलच कार्यक्रम का नाही ठेवत ? तर याचं कारण हे आहे की, इथे येणा-या प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. मागणी तसा पुरवठा आम्ही करत असतो. त्यानुसार अधिवेशनातील कार्यक्रमांचे तीन गट असतात. एक म्हणजे उत्तर अमेरिकेतील कार्यक्रम, भारतातील कार्यक्रम आणि तिसरे म्हणजे युवापिढींचे कार्यक्रम...तर उत्तर अमेरिकेतील कार्यक्रम निवडण्यासाठी आम्ही निविदा मागवतो. त्यांच्या कार्यक्रमांची सर्व माहिती-रूपरेषा तपासून बघतो. आमच्यासाठी कार्यक्रमांची निवड करणं तसं खूप कठीण असतं. त्यानुसार आता यावर्षी आमच्याकडे ६६ निविदा आल्या होत्या आणि त्यातील १५ कार्यक्रम आम्ही निवडले. सर्वांच्याच आवडी जोपासल्या जाव्यात म्हणून मग आम्ही भारतातीलही कार्यक्रम आणतो. त्यांची निवड करताना एकाच कलाकाराला पुन्हा पुन्हा न आणता, प्रत्येकवेळी काहीतरी नवीन असण्याला प्राधान्य देतो. त्यात नवीन कलाकारांना संधी देतो, शिवाय लेटेस्ट ट्रेंन्ड सुध्दा ध्यानात ठेवतो. अधिवेशनात पन्नास टक्के लोक हे ५५ वयोगटाच्या वरचे असतात. त्यामुळे त्यांना भावणारे कार्यक्रमही काळजीपूर्वक निवडले जातात. आमचा हाच प्रयत्न असतो की, प्रत्येक वयोगटातील लोकांना भावणारे कार्यक्रम असावेत.

   * दरवर्षी अधिवेशनाच्या खर्चाचा मुद्धा चर्चेत असतो, यावर्षी काय आणि कशी व्यवस्था झाली आहे ?

Interview of BMM president ashish chaughule

   पुण्याच्या कॉसमॉस बॅंकने आम्हाला यावर्षी मेगा स्पॉन्सरशिप दिली आहे. गेली दोन वर्ष ते आमची कार्यप्रणाली बघत होते आणि आमच्यावर विश्वास ठेवूनच त्यांनी आम्हाला मेगा स्पॉन्सरशिपची कमिटमेंन्ट दिली होती. ती त्यांनी पुर्ण केली. तसेच संजीवनी बिल्डर्स, कोलते पाटील डेव्हलपर्स, सुधीर मोरावेकर, सुगी बिल्डर्स यांच्यासारखे कॉर्पोरेट डोनर आणि अनेक इंडिव्हिज्युल डोनर्सनी आम्हाला सढळ हाताने मदत केली. त्यांच्यामुळेच हा डोलारा उभा राहतो आहे.

   * गेल्या अधिवेशनातील अव्यवस्थेवर महाराष्ट्रातील काही कलाकारांनी टीका केली होती, त्याबद्दल काय सांगाल ?

   मंडळाची आतापर्यंत १५ अधिवेशनं झाली त्यात शेकडो भारतीय कलाकारांनी आपली कला सादर केली, आणि आमच्यावतीने त्यांची चोख व्यवस्था ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक कलाकारांना हे चांगलंच माहिती असतं की इथे भारतासारख्या मोठ मोठ्या इव्हेंट कंपन्यांकडून आम्ही हे कार्यक्रम करून घेत नाहीत. इथे सगळे लोक आपली नोकरी, बिझनेस सांभाळून या उत्सवात सामिल होतात. एक कल्चरल कमिटमेंन्ट म्हणून हे सर्व करतात. जर इथे येणा-या कलाकारांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर याचा तुमच्या वयक्तीक अनुभवासाठी खूप फायदा होईल. मुळात हा कार्यक्रम, हा सोहळा कशासाठी होतोय याचाही विचार कलाकारांनी करावा. इथे कुणालाही पैशांचा फायदा होणार नसून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एकत्र येतात. त्यामुळे कलाकारांनी आमच्यात मिळून-मिसळून आम्हाला, आमच्या कार्याला समजून घ्यायला हवं तेव्हाच ही दरी कमी होईल. आणि याचा आनंद तुम्हाला आणि आम्हालाही घेता येईल.

   * बीएमएमच्या कार्याची तुमची दोन वर्ष कशी गेली ?

   ही दोन वर्ष नक्कीच चांगलीच गेली. माझ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचा जमाखर्च पाहिला तर, २०१२ हे वर्ष नक्कीच तृप्ततेत गेले. कारण माझ्या यशापयशाचे ठोकताळे मी effective work life balance वर ठरवतो. दिवसा ८ ते ५ ही वेळ व्यावसायिक जीवनात घालवतांना, संध्याकाळी ५ ते सकाळी ८ ह्या वेळेत, सामाजिक बांधिलकी देखील मला तेव्हढाच आनंद देते. सापेक्षतेपेक्षा मी नेहमी निरपेक्षतेवर भर देतो. कारण निरपेक्षतेमधे अपेक्षाभंगाचे दु:ख नसते. गेल्या वर्षभरात १४ मंडळांतील कार्यक्रमांमधे सहभागी होतांना, बृ. म. मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देतांना, सभासदांबरोबर समन्वय साधतांना एक अलौकिक समाधान लाभले. बॉस्टनचे २०१३चे अधिवेशन, मराठी शाळा, उत्तररंग, पॉडकास्ट, भारतातले, अमेरिकेतले कार्यक्रम, इत्यादी उपक्रमात साथ देणाऱ्या माझ्या कार्यकारिणीचे व स्वयंसेवकांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. या वर्षी मंडळांतून फेरफटका मारतांना, अध्यक्षांबरोबर सभासदांशी बोलतांना, बहुतांशी मंडळे कात टाकून सळसळत्या उत्साहाने वाटचाल करीत आहेत असेच आशादायी चित्र दिसते आहे.

   * बीएमएम अध्यक्षपदाचा हा अनुभव कसा होता ?

   खूप चांगला अनुभव होता. बीएमएम सारख्या संस्थेसाठी काम करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसं ‘लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचं दु:खं होत नाही’. जेव्हा तुम्ही एका सामाजिक आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी काम करता, तेव्हा इथे कुणीही तुमचा कर्मचारी नाही. तिथे तुम्ही तुमचे कॉप्रोरेट रूल्स लागू करू शकत नाही. जर लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत अवलंबली तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. आणि मला वाटतं की मी दोन वर्ष हेच उत्तमरित्या केलं. बीएमएमच्या कमिटीवर आधी मी काम केले होते, त्यामुळे मला चांगला अनुभव होता. लोकं काय स्विकारतील आणि काय स्विकारणार नाहीत याची चांगली जाणिव होती. मी जवळजवळ १७ ते १८ मंडळांना स्वत:चे पैसे खर्च करून भेटी दिल्या ज्या आत्तापर्यंत कोणत्याही अध्यक्षांनी दिल्या नाहीत. हे करण्यामागचा माझा उद्देश एकच होता तो म्हणजे बीएमएमच्या सभासदांशी संवाद, समन्वय साधणं. त्यासाठी त्या त्या गावात गेलो, त्यांच्या उत्सवांमध्ये सहभागी झालो. याचा माझ्यासाठी आणि मंडळाच्या कार्यासाठीही चांगला फायदा झाला.

   * ब-याचदा महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटी तिकडे होत असतील तर मग त्यांना तिथल्या मराठी लोकांच्या फायद्याचे प्रपोजल देता का ?

   पर्यटन आणि विविध उद्योगाची माहिती करून घेण्यासाठी भारतातून बिल्डर्स, वाईन ग्रोवर्स, विविध उद्योजक अमेरिकेतील विविध शहरांना भेटी देतात असतात. त्यातल्याच एका पुण्याच्या ग्रुपची आणि माझी भेट झाली. पुण्याचे साठ (६०) मराठी बिल्डर्स (बांधकाम व्यावसायिक) एकत्ररित्या अमेरिकेत बांधकामाच्या अभ्यासाच्या निमित्ताने (स्टडी टूर) आले होते. (आता या वाक्यात, तुम्ही पुणे, साठ, मराठी, किंवा एकत्र यापैकी कुठलाही शब्द अधोरेखित करून वाचू शकता!) अमेरिकेत आपण गुजराती समाजाने बांधलेले शांतीनिकेतन सारखे प्रकल्प बघतो तेव्हा मला अगदी मनापासून वाटतं की आपल्या मराठी कुटुंबांसाठी, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास अशा सौम्य हवामानाच्या राज्यात असे प्रकल्प व्हायला हवेत. पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकांसमोर मी नेमका तोच प्रस्ताव मांडला. मुंबई पुण्यातल्या जागा विकण्याव्यतिरिक्त, अमेरिकेतील मराठी समाजासाठी जर काही बांधकाम प्रकल्प केले तर त्याची चांगली दखल घेतली जाईल. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उत्तररंग विभागातील अग्रणी, क्लब ५५, ह्या सारख्या मंचावरून, अमेरिकेतील मराठीसमाजातील जेष्ठ आणि सेवानिवृत्तांसाठी वसाहतीचे जोरात प्रयत्न व्हायला हवेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाचा या विधायक कामासाठी, नक्कीच, पाठिंबा राहील.

  * बीएमएम अध्यक्षपदाचे काही महिनेच शिल्लक आहेत, पुढे काय प्लॅन आहे ? किंवा पुन्हा एकदा बीएमएम अध्यक्ष व्हायला आवडेल का ?

   खरंतर मला सांगायला खूप आनंद होतोय की, जेव्हा जुलै २०११ ला माझी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, तेव्हा मी काही टारगेट सेट केले होते. त्यात अनेक नवीन गोष्टी आल्यात त्याही पूर्णत्वाकडे जात आहेत. संस्थेसाठी जेव्हा आपण कुठलही कार्य करतो, तेव्हा पद हे महत्वाचं नसून संस्थेचे कार्य पुढे चालू राहणं जास्त महत्वाचं असतं. पुढे अध्यक्ष राहणार की नाही हे माहित नाही. पण संस्थेसाठी नेहमी काम करत राहणार कारण ग्लोबल मराठी कम्युनिटी एकत्र आणणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. त्यादॄष्टीनं माझी पावलं मी पुढे टाकतो आहे. देश-विदेशातील मराठी लोकांना एकत्र आणून गुजरातप्रमाणे सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र कसा करता येईल त्यादृष्टीने माझे नक्कीच प्रयत्न चालू राहतील. त्यासाठी मला जगभरातील मराठी लोकांचा पाठींबा हवाय. तसेच महाराष्ट्र सरकारबरोबर सुद्धा याविषयांवर माझी चर्चा झाली असून लवकरच यावर सरकार निर्णय घेणार आहेत.

- अमित इंगोले