Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

‘दुनियादारी’ माझे ड्रिम प्रोजेक्ट - दिग्दर्शक संजय जाधव

interview of director sanjay jadhav
Sanjay jadhav
Add Comment

मैत्रीचा, प्रेमाचा नवा अर्थ उलगडून सांगणारी सदाबहार, टवटवीत प्रेमकथा घेऊन ‘झी टॉकीज’, एस्सेल व्हिजन आणि ‘व्हिडोयो पॅलेस’प्रस्तुत ड्रिमिंग ट्वेंटींफोर सेव्हन निर्मित एक ड्रिम प्रोजेक्ट असलेला आधीपासून जोरदार चर्चेत असलेला ‘दुनियादारी’ हा अत्यंत देखणा चित्रपट शुक्रवारी १९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतोय. या ड्रिम प्रोजेक्टबद्दल सांगतायत दिग्दर्शक संजय जाधव....

   कॉलेजमध्ये असताना सुहास शिरवळकर ‘दुनियादारी’ कादंबरी माझ्या हाती लागली आणि मी प्रेमातच पडलो त्या कादंबरीच्या. या कादंबरीने माझ्या मनावर जे गारूड केलं ते आजतागयत. मी टेक्निकल इंजिनियर, इंडस्ट्रीशी तेव्हा माझा काहीही संबंध नव्हता. पण जेव्हापासून या कादंबरीवर चित्रपट यायला हवा, असं सारखं वाटायचं. मी या क्षेत्रात आलो. सिरीयलच्या निर्मितीत उतरलो तेव्हादेखिल या कादंबरीवर काहीतरी करण्याचा विचार होता. पण तोवर त्याच्या मालिका रूपांतराचे हक्क अन्य मंडळीनी घेतल्याचं कळलं. मी सुहास शिरळकरांचा खूप मोठा चाहता होतो. आमची ‘बेधुंद मनाची लहर’ मालिका सुरू असताना या सेटवर शिरवळकर मला भेटायला आले. या भेटीत मी दुनियादारी वर काहीतरी करण्याचा विचार असल्याची इच्छा त्यांच्याकडे बोललो. त्यांनीही मला होकार दर्शवला आणि सविस्तर चर्चेसाठी आठवडाभरात त्यांच्या भेटायचे ठरले. पण दुर्दैवाने त्यानंतर दोनच दिवसात शिरवळकराच्या निधनाची बातमी कानावर आली. मी अक्षरश: हललो. त्यानंतर काही दिवसांनी श्रीमती शिरवळकरांची भेट घेऊन ‘दुनियादारी’चे चित्रपटांसाठीचे हक्क मी मिळवले. या हक्कांसाठी अनेकजण प्रयत्न करीत होतेच. प्रत्येकाच्या मनात वेगळी दुनियादारी आहे. प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन दुनियादारीबद्दल होतं. मी देखिल वेगळ्या पद्धतीने ‘दुनियादारी’चा विचार करीत होतो. चिन्मय आणि मी एका फार्म हाऊसवर सलग एक आठवडाभर गेलो आणि शांतपणे याचा स्क्रिनप्ले करायला बसलो. जवळजवळ बारा ड्राफ्ट केले तरी समाधान होत नव्हतं. नंतर पुन्हा काही बदल करण्याचं स्वातंत्र्य घेतलं पण त्यासाठी श्रीमती शिरवळकरांची परवानगी घेणं गरजेचं होतं. या ड्राफ्टवर सगळं आपसूक मार्गी लागत गेलं. सुरवातीला कुणीही निर्माता माझ्याबरोबर नव्हता. पण मी मिफ्टाहूण परतताना विमानात नानूभाईंना ही कथा ऎकवली आणि नानूभाई प्रेमातच पडले कथेच्या. नानूभाई निर्माता म्हणून माझ्यामागे उभे राहिले. कास्टिंग माझ्या डोक्यात आधीच तयार होतं. आम्ही सगळे वेगवेगळ्या निमित्ताने नेहमी भेटायचो. सगळ्यांची परस्परांशी मैत्री होती पण तरी इतके गहीरे सूर सर्वांचे परस्परांशी जुळलेले नव्हते. मला या चित्रपटात जो मूड हवा होता, जी मैत्री दाखवायची होती ती पराकोटीची होती. मला मैत्रीचा परफॉर्मन नको होता. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी वर्कशॉप घ्यायचं ठरवलं. त्यासाठी पहिलं नाव माझ्यासमोर आलं ते संजय मोनेंचं. मोने सगळ्यांना खी सिनियर आहेत त्यांच्याबद्दल टीममधील सर्वांना आदर आहे. यामुळे या वर्कशॉपसाठी सगळे तयार झाले. या वर्कशॉपमुळे सगळ्याम्ची थॉट प्रोसेस बदलली. वर्कशॉपने मिरॅकल केलं. सई म्हणाली के, या चित्रपटाने अभिनेत्री म्हणून मी काय मिळवणार आहे मला मला माहित नाही पण माणूस म्हणून मला खूप शिकायला मिळालं. सगळ्यांच्या जवळजवळ अशाच प्रतिक्रिया होत्या.

interview of director sanjay jadhav

   यानंतर पहिलं शेड्युल लागलं. लोकेशन पुण्याचं कृषी विद्यालय नक्की झालं. पण ते आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं. म्हणून सांगलीतील एका कॉलेजचं लोकेशन पक्कं झालं. सगळ्या कलाकारांच्या तारखा मिळवून तिकडे शेड्युल लागणार इतक्यात परीक्षांचं वेळापत्रक लागलं. परीक्षांमुळे सांगली रद्द झालं. मग शालिनी पॅलेसमध्ये कॉलेजचा सेट उभा करायचं ठरवलं. पण तिथेही नेमकी अडचण आली. शेवटच्या क्षणी मित्रांची यारीच कामी आली. सुशांत शेलार माझ्यामागे उभा झाला त्याने कलानिधीची मदत मिळवून दिली आणि पुण्याला कृषी महाविद्यालयात चित्रीकरण करायचे ठरले. या चित्रीकरणाच्या वेळी आनंद अभ्यंकर होता. आनंददादा मोठ्या सेटवरून निघाला आणि जे घडलं ते सगळ्यांनाच हादरावणारं होतं. मी अक्षरश: कोसळलो. मी त्याला या शॉटसाठी पुण्याला बोलावलं नसतं हे घडलं नसतं. मला प्रचंड अपराधी वाटू लागलं. माझं पूर्ण अवसान गेलं. आनंद दादाच्या अंत्ययात्रेच्या वेळी नाना पाटेकर हजर होते. माझ्यासहित ‘दुनियादारी’च्या टीमची अवस्था सारखीच होती आम्ही सुन्न होतो. नानांनी आम्हां सगळ्यांना त्यांच्या घरी नेलं. त्यांनी समजावलं..सगळ्यांच सांत्वन केलं. मी या धक्क्यातून पुन्हा उभा राहू शकलो तो त्यांच्यामुळेच. आम्ही कसेबसे यातू सावरत होतो. पुढचे दहा दिवस शूट केले आणि दहा दिवसांनी माझे वडील गेले. एकावर एक धक्का येऊन माझ्यावर आदळत होता. चित्रपटाचा कप्तान म्हणून मे सगळं अवसान आणत होतो. वडलांची दशक्रिया उरकून मी सेटवर आलो तेव्हा सगळे मला बघून सुन्न होते. माझ्या लक्षात आले इथे मी कोसळलो तर सगळे कोसळतील. चित्रपटाचा धमाल मस्तीचा मूद बदलून चालणार नव्हतं. म्हणून मी सेटवर स्वत:च जोक्स क्रॅक करू लागलो. हे करताना मला आतून खूप त्रास होत होता पण त्याने चित्रपटावर परिणाम होऊ नये याची मी दक्षता घेत होतो. ‘दुनियादारी’ ही माझी या तिघांना आदरांजली आहे. सगळ्या कसोट्यांमधून पार होत अखेर हे स्वप्न पूर्ण झालंय. हे माझे स्वप्न मी रसिकांसमोर आणताना एका गोष्टीचा मला अभिमान वाटतोय की, हा चित्रपट माझ्याच नशिबात होता.

   ‘दुनियादारी’ तलं प्रत्येकाचं योगदान विशेष आहे. या चित्रपटाच्या सेटवर मस्तीचं वातावरण कायम असायचं. उर्मिला चमचमीत खाण्याची शौकीने, स्वप्नील, अंकुश, सई तितकेच पट्टीचे खवैये. त्यामुळे सेटवर फक्त खाण्याची चंगळ आणि मस्ती...यातून मध्ये वेळ मिळाला तर शूटींग असं सुरू होतं. सेटवरचा मूड बनवण्यासाठी आमची साऊंड रेकॉर्डिंग उमर मुलानी आदल्या दिवशी सेटवर येऊन पुढच्या दिवसाचे सीन विचारून जायचे. त्या सीननुसार त्या मूडची गाणी ते डाऊनलोड करून आणायचे. ७०-८०च्या दशकातील स्टाईल्सचा अनुभव देणारे पोशाख करण्यासाठी प्रेमिता जाधव आणि हर्षदा खानविलकर यांनीही खूप मेहनत घेतलीय.

   मी ‘दुनियादारी’चं पाहिलेलं हे स्वप्न माझ्या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचं स्वप्न झालं आणि मला या चित्रपटाने जसं झपाटलं तसं यातील प्रत्येकालाच या चित्रपटाने झपाटलं. ही ‘दुनियादारी’ची अंतर्गत जादू होती. या चित्रपटाशी संलंग्न असणा-या प्रत्येकाने या चित्रपटात माझ्या इतकाच जीव ओतलाय आणि प्रत्येकांचं सहकार्य या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलंय. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मिडिया नेटवर्कच्या माध्यमातून ‘दुनियादारी’ला तरूणांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. आता प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय, धडधड वाढतेय. १९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात ‘दुनियादारी दिमाखात झळकतोय.