Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

ऋणानुबंधाचे स्वरूप बदलणे हे मानवी वैशिष्ट्य - डॉ.बाळ फोंडके

विज्ञान कथा लिहिणा-या डॉ. जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे ह्या साहित्यिकांच्या यादीत एक आणखी प्रसिद्ध नाव म्हणजे डॉ. बाळ फोंडके...एखादा शोध कसा लागला किंवा लावला गेला अशा कथांवर लिहिण्यापेक्षा विज्ञानातले नवे शोध आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम - परिवर्तने अशा विषयांवर डॉ. फोंडके यांच्या ब-याच कथा आधारीत असतात. त्यांची विज्ञान कथांची अनेक पुस्तके गाजली आहेत. त्यांचा हाच इतक्या वर्षांचा अनुभव मराठी वाचकांना अनुभवता यावा यासाठी यावर्षी होणा-या बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनात त्यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी बीएमएमच्या या उपक्रमाबद्दल आणि विज्ञान साहित्याबद्दल साधलेला संवाद....

   * बीएमएमच्या या १६ व्या अधिवेशनाबद्दल काय सांगाल ?

   - मी पहिल्यांदाच बीएमएमच्या या अधिवेशनाला जात आहे. माझे मित्र डॉ.काकोडकर, डॉ.माशेलकर यांच्याकडून जे मी या अधिवेशनाबद्दल ऎकले आहे त्यानुसार खरंच हा एक जंगी मेळावा असतो. नुसताच सांस्कृतिक कार्यक्रमांचा मेळावा नाहीतर बिझनेस कॉन्फरन्स, एज्युकेशन कॉन्फरन्स असेही इव्हेंट्स यात असतात हे विशेष म्हणावं लागेल. ज्यात मराठी उद्योजकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण होते. सर्वांच्याच दृष्टीने अतिशय छान असा हा प्रयत्न आहे, असं मला वाटतं. ज्याप्रमाणे परदेशात मराठी मंडळं आहेत तशीच काही मंडळे भारतात सुद्धा आहेत. परदेशात आणि भारतात ही जी मराठी मंडळे आहेत यात थोडासा आपल्याला फरक करायला हवा. आपल्या मराठी लोकांपासून आपण दूर गेलेलो आहोत, संस्कृतीपासून दूरावलो आहोत, म्हणून ही कमी भरून काढण्यासाठी मराठी मंडळी अशा सोहळ्यांमधून एकत्र आणली जाते आणि त्यातून ह्या मंडळांना ऊर्जा मिळते. अशाप्रकारची मंडळे भारतात जिथे मराठी मुख्य भाषा नाही जसे कलकत्ता, इंदौर, चेन्नई या शहरांमध्ये सुद्धा मराठी मंडळे आहेत. यांच्यामार्फत आपापली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे बीएमएमची मंडळे सुद्धा आपली मराठी संस्कृती जतन करण्याच्या उद्देशानेच एकत्र येतात.

   * या अधिवेशनात तुम्ही प्रमुख वक्ते म्हणून काय भूमिका मांडणार आहात ?

   - या अधिवेशनाचं ब्रिदवाक्य ‘ॠणानुबंध’ असं आहे...ज्याला रेशीमगाठी असं म्हटलं जातं. हा ऋणानुबंधाचा विषय घेऊनच माझं भाषण असणार. नेमका ऋणानुबंधाचा विचार वैज्ञानिकांच्या उत्क्रांतीपासून मी करणार आहे. ऋणानुबंधाचं स्वरूप हे बदलत राहतं, हे एक मानवी वैशिष्ट्य आहे. मानव सुसंस्कृत झाला, एका जागी रहायला लागला. त्यावेळेला ही नाती, समाजाचे नियम आणि मग ऋणानुबंध आले. ऋणानुबंध म्हणजे केवळ रक्ताची नाती किंवा विवाहबंधनातून तयार झालेली नाती नाहीतर त्याहीपलिकडे जाणारी नाती असतात. पण हे ऋणानुबंध बदलत असतात. आपल्याकडे एकत्र कुटूंब पद्धती होती ती विभक्त झाली. जोपर्यंत समाज शेतीवर अवलंबून होता तोपर्यंत वंशपरंपरा चालू होती. म्हणजे सुताराचा मुलगा सुतार, कुंभाराचा मुलगा कुंभार व्हायचा यामुळे एकत्र कुटूंबपद्धती टिकून होती. ज्यावेळेला औद्योगिक क्रांती आली तेव्हा हे एकत्र कुटूंब विभक्त झाले. अर्थात काय तर बदलते ‘ऋणानुबंध’ या विषयावर माझं भाष्य असणार आहे.

   * सध्याच्या विज्ञान साहित्याच्या स्थितीबद्दल काय वाटतं ?

   - आज कोणत्याही साहित्य संमेलनात विज्ञान साहित्याला अजिबात महत्व दिलं जात नाही ही सर्वात मोठी खंत आहे. आज विज्ञान ऎवढे पुढे गेले आहे, विज्ञानामुळे तुमची जीवनशैली बदललेली आहे. जीवनातल्या प्रत्येक पैलूवर आज विज्ञानाचा प्रभाव पडतोय. ज्याचा प्रसार होणं अत्यावश्यक आहे. पण आज मराठी साहित्य संमेलने ही संत साहित्याच्या पलिकडे गेलेलीच नाहीये. विज्ञान साहित्य तर सोडाच मराठी भाषेच्या जतनासाठी मराठी साहित्य संमेलनातर्फ़े काय केले जात आहे हा प्रश्न मला पडला आहे. कोणतीही भाषा ही ज्ञान भाषा झाल्याशिवाय पसरत नाही. आज इंग्रजीचा प्रसार का झाला आहे कारण ती ज्ञान भाषा आहे. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी ती पुस्तके मराठीत उपलब्ध व्हायला हवीत. आज सगळी पुस्तके ही इंग्रजीत असतात. यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले गेले पाहिजे. चर्चा, परिसंवाद आयोजित केले पाहिजे तरच विज्ञान साहित्याचंही महत्व वाढेल.

   * मराठी संस्कृतीच्या जतनासाठी जे प्रयत्न या अधिवेशनामधून केले जातात तसेच महाराष्ट्रात व्हायला हवेत का ?

   - एक सांस्कृतिक मेळावा म्हणून अशी अनेक उपक्रमे महाराष्ट्रात होत असतील. परंतु ज्याप्रमाणे बीएमएमने एज्युकेशन कॉन्फरन्स, बिझनेस कॉन्फरन्स आयोजिक केल्या आहेत तशा आपल्याकडेही व्हायला हव्यात. आज मराठीत चांगली पाठ्यपुस्तकं नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न होणार असतील तर असे उपक्रम करायला काहीच हरकत नाही आणि अशा गोष्टींना माझा नक्कीच पाठींबा सुद्धा राहणार.

   * विज्ञानाच्या साहित्याबाबत आणखी जनजागृती व्हावी यासाठी अशा अधिवेशनांमधून काय करता येईल असं तुम्हाला वाटतं ?

   - खरंतर मला या बाबतीत बृहन महाराष्ट्र मंडळाचं कौतुक करावंसं वाटतं, कारण बीएमएमच्या गेल्या कित्येक अधिवेशनांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत वैज्ञानिकांना प्रमुख वक्ते, अतिथी म्हणून बोलवलं होतं. काकोडकर, माशेलकर, भुतकर अशा मोठ्या लोकांना अधिवेशनात आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रीत केले होते. यावेळी त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून मला बोलवलं याचंच मला आश्चर्य वाटलं ...कारण मला साहित्य संमेलनात कुणी विचारत नाही. बीएमएमने सातत्याने प्रयत्न केला आहे की, विज्ञान विषयावर त्यातील अभ्यासू व्यक्तीला आवर्जून आमंत्रीत करावं. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत वैज्ञानीकांचे विचार पोहचतात, त्यामुळे हा प्रयत्न चांगला आहे. भारतात वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. त्यात विज्ञान या विषयावर सुद्धा व्याख्यान आयोजित केले जातात, अशाचप्रकारे अधिवेशनातही जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जाव्यात. सोबतच विज्ञानाचं नुसतं ज्ञान मिळवून चालणार नाहीतर त्याचा उपयोग आपल्या जीवनशैलीत कसा करता येईल, अशा विषयांवर सुद्ध चर्चा व्हायला हवी.

   * मराठीतील इतर साहित्यात जेवढी गोडी वाचकांना असते तेवढी विज्ञान साहित्यात दिसत नाही याचं काय नेमकं कारण सांगता येईल ?

   - खरंतर विज्ञान साहित्याला वाचकवर्ग मोठा आहे परंतु समीक्षकांनी त्याला कठीण केले आहे. वाचन न करताच ते लोकांना कळणार नाही असा अंदाज समीक्षक करतात. आज मी कित्येक समीक्षकांना विचारतो की तूम्ही विज्ञानाबाबत काय वाचलंय तर ते सांगतात नारळीकरांचं ‘यक्षांची देणगी’...यापलिकडे त्यांना दुसरं नावंच माहित नसतं. त्यानंतर नार्वेकरांची कितीतरी पुस्तके आलीत. सांगायचं हेच आहे की जर तुम्ही काही वाचलेच नाहीतर कळणार कसे ? आज मराठी भाषेतील विज्ञान कथांऎवढा प्रवास कोणत्याच भाषेचा नाहीये. प्रत्येक दिवाळी अंकात विज्ञानाची एकतरी कथा असतेच, वृत्तपत्रांमध्ये लेख मागवले जातात. आज मराठी विज्ञान कथा लिहिणा-यांची नाही म्हणालात तरी २०-२५ नावं समोर येतात, ही मंडळी सतत लिहित विज्ञानावर लिहित असतात. इतकं असं असूनही समीक्षकांची भूमिका अशी असते की ‘आपल्याला हे कळणार नाही, आपल्या हे डोक्यावरू जातं’. त्यामुळे मला वाटतं की, विज्ञान कथांना वाचकांचा प्रतिसाद आहे पण समीक्षकांचा नाहीये. जर वाचकांचा प्रतिसाद नसता तर संपादकांनी आमच्याकडून लिहूनच घेतले नसते हे एक साधं उदाहरण आहेच.

   - अमित इंगोले