Sign In New user? Start here.

जादुगार रघुवीर यांचा मायाजाल अमेरिकेत

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

जादुगार रघुवीर यांचा मायाजाल अमेरिकेत

 भारतात आणि सातासमुद्रापार अनेक देशांमध्ये आपल्या चित्तथरारक जादुच्या प्रयोगांनी धमाल करणारे पुण्याचे प्रसिद्ध जादुगार विजय आणि जितेंद्र रघुवीर हे येत्या दिवाळीत अमेरिका आणि कॅनडातील रसिकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत. रोषणाई आणि रांगोळ्यांच्या रंगीबेरंगी रंगात सजणा-या या दिवाळीत झगमग घेऊन येत असलेल्या जादुगार रघुवीर यांच्या जादुच्या प्रयोगांचे रंग भरले जाणार असून मराठी रसिकांची ही दिवाळी लज्जतदार आणि रंगतदार ठरणार आहे. २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळ्या शहरांमद्ये जादुचे मायाजाल पसरवले जाणार असून या जादुई दुनियेबद्दल आणि दौ-याबद्दल जादुगार रघुवीर परिवारातील तिसरी पिढी असलेले जादुगार जितेंद्र रघुवीर यांच्याशी या केलेली ही खास बातचीत...

* जादुचा पहिला प्रयोग कोणता आणि वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही सादर केला होता ?

- मी पहिली जादु मॉन्टेसरीमध्ये पाच पेक्षा कमी वर्षाचा असताना केली होती. बाबांच्या शो मध्ये तेव्हा एक ‘आला आला जादुगर...’ म्हणून गाणे बसवण्यात आले होते. त्या गाण्यात मी पहिल्यांदा सादरीकरण केले होते. माझं लहानपण हे सगळं जादुच्या दुनियेतच गेलं. म्हणजे लहान मुलांना त्यांचे पालक वेगवेगळी खेळणी देतात. मात्र, मी लहान असताना जादुच्या साहित्यासोबतच खेळत असे, तेव्हापासून पुढे हा प्रवास सतत सुरू आहे.

Interview of jadugar raguvir

* तुमचे आजोबा आणि वडिल यांची जादुची परंपरा तुम्ही पुढे चालवत आहात, इतक्या वर्षांनंतरही रघुवीर परीवाराचं काय वैशिष्ट्य सांगता येईल ?

- जवळजवळ ७५ वर्षे रघुवीर परीवारातर्फ़े रसिकांचे भरभरून मनोरंजन केले जात आहे. जादुचे प्रयोग सादर करणा-या कलाकारांबद्दल समाजात एक वेगळा दृष्टीकोन बघायला मिळतो की जादुगार लोक जास्त शिकलेले नसतात. पण आमचं असं आहे की माझे वडिल बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स आहेत, मी सुद्धा इंजिनिअर असून अमेरिकेला एमएस केले. आमचं एज्युकेशन चांगलं असल्यामुळे आम्ही त्या शिक्षणाचा वापर आमच्या प्रयोगांमध्ये खूप चांगला करून घेतो. त्यामुळे चांगले प्रयोग सादर करण्यास आम्हाला खूप जास्त फायदा होतो.

* अमेरिकेहून एमएस करून सुद्धा या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा घेतला ?

- खरंतर हा निर्णय पूर्णपणे माझा होता. माझ्या आई-वडिलांनी मला कधीच या क्षेत्रात येण्यासाठी फोर्स केला नाही. मुळात मलाच लहानपणापासून या सर्वांची आवड होती. त्यामुळे काहीही शिकत असलो तरी मला जादुच्याच क्षेत्रात यायचं असं मी आधीच ठरवलं होतं. एवढंच काय तर मी युएसला जॉब करत असताना तिथेही जादुचे प्रयोग करत होतो. त्यामुळे तिथला एक खूप चांगला बेस मला मिळाला. महत्वाचं म्हणजे अमेरिकेत मला अनेक चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, तिथेच स्थायिक होण्याची संधीही मला तिथे होती मात्र, भारतातून तिकडे जातानाच ठरवले होते की, मला जादुच्याच क्षेत्रात यायचे.

Interview of jadugar raguvir

* भारतात आणि परदेशात जादुच्या प्रयोगांना रसिकांचा प्रतिसाद सारखाच असतो का ?

- प्रतिसाद दोन्हीकडे चांगला असतो पण भारतात जादुचे प्रयोग हे लहान मुलांसाठी असतात असा एक समज आहे. परदेशात असं आहे की, इतर कोणत्याही कलांप्रमाणे ते लोक जादुच्या कलेकडेही खूप सिरीअसली बघतात. जे मराठी लोक भारतातून तिकडे स्थायिक झालेत त्यांच्यापैकी काहींनी माझे आजोबा आणि वडिल यांचे प्रयोग पाहिलेले असतील. त्यामुळे त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप चांगला असतो. त्यांना शो माहिती असल्यामुळे ते अजून गर्दी करतात. सोबतच तिकडच्या लोकांची कोणत्याही कलेला अ‍ॅप्रिशिएट करण्याची वृत्ती खूप चांगली आहे. भारतातही प्रतिसाद चांगलाच मिळतो पण रसिकांनी या कलेला अजून अ‍ॅप्रिशिएट करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून ही कला आणखी जास्त जोपासली जाईल.

* मनोरंजनाच माध्यम असूनही जादुच्या क्षेत्रात फार लोक येताना दिसत नाही याचं काय कारण सांगता येईल ?

- जादुच्या क्षेत्रात यायचं म्हटल्यास यात पर्सनल इन्व्हेस्टमेंट खूप करावी लागते. तीन तासाच्या शो साठी तुम्हाला सहा ते सात असिस्टंट सोबत लागतात. प्रयोगाचं साहित्य नेण्या-आणण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी, गेटअप, सेट, प्रत्येक ट्रिकसाठीचं वेगळं साहित्य हे सगळं तर आलंच शिवाय आजकाल थिएटरची भाडी सुद्धा वाढलेली आहे. त्यातही प्रयोगाला प्रतिसाद मिळाला तरच पैसा परत मिळतो नाहीतर काहीच नाही. त्यामुळे पर्सनल इन्व्हेस्टमेंट हे एक खूप महत्वाचं कारण यासाठी सांगता येईल.

Interview of jadugar raguvir

* तुमच्यातर्फ़े ब-याच वर्षांपासून चालत आलेल्या जादुंच्या प्रयोगांमध्ये तुम्ही काही बदल केलेत का ?

- हो नक्कीच केलेत...यात दोन प्रकार आहेत एक म्हणजे ‘रिकन्डीक्शनिंग’ ज्यात आधीचेच जुने प्रयोग नवीन पद्धतीने तयार केले जातात. जसं पूर्वी माणसाचे दोन तुकडे करणं किंवा मुलगी अधांतरी ठेवणं.स या प्रयोगांसाठी पूर्वी असिस्टंट आमचेच असायचे कारण या प्रयोगांची काही सिक्रेट्स अशी होती जी त्यांनाच माहिती असायची. पण यात आम्ही आता अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणल्यामुळे प्रेक्षकातील कुणालाही बोलवून त्यांच्यावर हा प्रयोग केला जातो. हा झाला एक प्रकार. दुसरा बदल असा की नवीन नवीन इल्युजन प्रेझेंट करायची. यात असं असतं की एक तर तुमचं स्वत:चं डिझाईन नाहीतर परदेशातील एखाद्या दुस-या जादुगाराचं डिझाईन सादर केलं जात. पण दुस-याचं डिझाईन सादर करताना त्यात काही बदल नक्कीच करावे लागतात. कारण परदेशात ते सादर करण्याचे तंत्र आणि स्टेज अगदी वेगळे असतात. त्यामुळे आपल्याकडे अव्हेलेबल असलेल्या साहित्यात आणि वेळेत त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ज्या आम्ही करत असतो.

* जादुचे प्रयोग करतानांही काही चुका होतात का आणि चुक झालीच तर अशावेळी काय केलं जातं ?

- होतात ना...! अनेकदा चुका होत असतात. पण त्या प्रेक्षकांच्या कधी लक्षात येत नाही. यासाठी आम्हाला खूप अलर्ट रहावं लागतं. जादुचे प्रयोग करताना दोन ते तीन प्रकारच्या चुका होऊ शकतात. एक म्हणजे माझ्याच हातानेच चूक होऊ शकते. शेवटी मीही मनुष्यच आहे. दुसरं म्हणजे असिस्टंटच्या हातून झालेली चूक आणि तिसरी म्हणजे आम्ही वापरत असलेल्या साहित्यांमुळे झालेली चुक. मशीन काही सांगून बिघडत नाही. या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही सतत प्रॅक्टीस करत असतो. शिवाय कुठे चुक होऊ शकते ते आम्हाला माहित असतं त्यामुळे त्या पॉईंटला आम्ही जास्त काळजीपूर्वक काम करतो.

Interview of jadugar raguvir

* चुक झाल्याचा असा एखादा किस्सा सांगता येईल का ?

- एकदा प्रेक्षकातील एका व्यक्तीची चेन आणि अंगठी गायब करण्याचा प्रयोग आम्ही केला होता. तर ती चेन आणि अंगठी रूमालातून गायब करून एका लॉक असलेल्या बॉक्समधून आम्ही ते काढतो, अशी ती जादु होती. आता रूमालातून चेन आणि अंगठी गायब केली पण त्या बॉक्समधून फक्त अंगठीच बाहेर काढली. असिस्टंटच्या चुकीमुळे ती चेन त्या बॉक्समध्ये निट टाकता आली नव्हती. आता ज्याची अंगठी आणि चेन होती तो घाबरला की चेन गेली कुठे...पण माझ्या आणि असिस्टंटच्या लक्षात हे आलं होतं की काहीतरी घोळ झालाय. तर मग मी पुन्हा एक सिल्क घेतलं हळूच त्यात अंगठी व चेन घेतली आणि हातचलाखीकरून त्या सिल्कमधून दोन्ही वस्तू बाहेर काढल्या त्यावर प्रेक्षकांच्या भरभरून टाळ्या मिळाल्या. हे सर्व आमच्याशिवाय कुणालाही कळलं नाही. लोकांना वाटले की प्रयोगाचाच हा एक भाग असेल. अशावेळी प्रेझेंन्स ऑफ माईंड खूप महत्वाचा असतो.

* जादुने काही पर्सनल समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला कुणी फोन वैगेरे करतात का ?

- अनेकदा असं झालंय...आपल्याकडे अंधश्रद्धा हा प्रकार अजूनही असल्यामुळे अनेक लोक मला फोन करून त्यांचे प्रॉब्लेम्स मला सांगतात. अहो त्या बाबाने असं सांगितलंय, तुम्ही काहीतरी करा....मला हा आजार झालाय बरा करून द्या....किंवा मला ह्या व्यक्तीला वश करायचं आहे असे तर फोन येतच असतात. त्यांना आम्ही सरळ सांगतो की जादु ही कला मनोरंजनासाठी आहे आणि विज्ञानावर आधारीत आहे. तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि डोकं यात घालू नका. हे उदाहरण झालं अधंश्रद्धाळू आणि अशिक्षित लोकांचं. दुसरा प्रकार असा असतो एज्युकेटेड लोकांचा. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला इंग्लिशमध्ये फोन आणि पत्र येतात ती सुद्धा डॉक्टर आणि इंजिनिअर लोकांची. ते म्हणतात की मला ऎश्वर्या रॉयला वश करायचे आहे, माधुरीला वश करायचे. किंवा मी त्या मुलीवर प्रेम करतो तिला तिकडून इकडे आणून द्या. असेही काही मजेशीर महाभाग असतात. त्यांना आम्ही सरळ या गोष्टींच्या मागे न लागण्याचा सल्ला देत असतो.

Interview of jadugar raguvir

* दिड महिन्याच्या या अमेरिका दौ-यात कोण-कोणते नवीन प्रयोग रसिकांना बघायला मिळणार ?

- यावेळी अतिशय वेगवेगळ्या जादु रसिकांना बघायला मिळणार आहे. जेव्हा आम्ही तिकडे जाण्याची तयारी करत असतो तेव्हा बॅग्स भरताना वजनाचा विचार करून काही जादुचे इथेच सोडून जाव्या लागतात. प्रयत्न हाच असतो की त्यांना प्रत्येकवेळी काहीतरी नवीन देणं. यावेळी आम्ही फ्लाईंग बॉक्स, शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, माणसाचे तुकडे करून पुन्हा जोडणे, प्रेक्षकांतील बालचमूंना स्टेजवर बोलवून अधांतरी टांगणे, क्रॉस अ‍ॅस्केप, नोटांचा पाऊस, मानेतून तलवार आरपार करणे असे अनेक नवनवीन प्रयोग सादर करणार आहोत. सोबतच अमेरिका, सिंगापूर, फ्रान्स येथील लोकप्रिय जादुच्या प्रयोगांचाही त्यात समावेश असेल. तसेच प्रत्येक ठिकाणी आम्ही जादुच्या प्रयोगांचे वर्कशॉप्स सुद्धा घेतो आहे.

* या सर्व धापळीत तुमच्या परिवाराचं सहकार्य कशाप्रकारे लाभतं ?

- खरंतर ही जी जादुची कला आहे यासाठी तुम्हाला परिवाराचं खूप जास्त सहकार्य हवं असतं. कारण आम्ही जेव्हा बाहेर असतो तेव्हा इथे जादुचे प्रयोग ठरत असतात. क्लासेसच्या वेळेला त्या लोकांना अटेन्ड करायला लागतं. त्यामुळे माझी आई तर वडिलांबरोबर अनेक वर्ष प्रयोगांसाठी आणि मॅनेजमेंटसाठी साथ देते. सोबतच आता माझी बायको अश्विनी सुद्धा यात सहभागी झालेली आहे. ती स्वत: एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. मागच्या परदेश दौ-यात तिने आणि माझा पाच वर्षाचा मुलगा इशान याने प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये सहकार्य केले होते. यावेळी ते दोघेही नाहीत. यावेळी माझी बहिण तेजा आणि तिची मुलगी इरा ह्या दोघी असणार आहेत. प्रत्येकवेळी परिवाराचं सहकार्य मिळतच राहतं. त्याच्याशिवाय हे सगळं यश मिळालं नसतं.

Interview of jadugar raguvir

* जादु या कलेला शासकीय मान्यता मिळावा यासाठीही तुमचे प्रयत्न चालू आहेत, ते कुठपर्यंत आले ?

- हा विषय आधी समोर आणला तो असिम सरोदे यांनी. पहिल्यांदा आम्ही शासनाकडे अर्ज केला. त्यावर त्यांचं काही उत्तर आलं नाही. त्यानंतर आम्ही पिटीशन फाईल केलं. त्यावेळी मिडियातर्फ़े आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. जेव्हा आम्ही अर्ज केला तेव्हा कै.विलासराव देशमुख हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. मात्र, त्यांच्या जाण्याने आणि आमच्या टुर्समुळे हा विषय थोडा मागे पडला होता. दरम्यान, आम्ही केलेल्या पिटीशनला मत्रांलयातून उत्तर आले की, तुम्ही पुन्हा एकदा अर्ज करा आणि तुमचं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित परत पाठवा. त्यामुळे ती केस आम्ही पुढे फाईल केली नाही. आता अमेरिका दौरा झाला की आम्ही त्यादृष्टीने पाठपुराव करणार आहोत.

Interview of jadugar raguvir

* या दौ-यानिमित्ताने रसिकांना काय सांगाल ?

- सर्वप्रथम मी आभार मानतो सातेरी सिस्टीम सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रा.लि., झगमग डॉट नेट आणि गिरीकंद ट्रॅव्हल्स एजन्सी यांचे ज्यांच्या माध्यमातून हा दौरा केला जातोय. यावेळी आमच्या शोचं नाव आहे जादुगार विजय आणि जितेंद्र रघुवीर व त्यांचे ‘मायाजाला’...मायाजाल म्हणजे एकप्रकारची झाडं ज्यात रसिक मनोरंजनासाठी गुरफटून जाणार आहेत. त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून काहीकाळ एका वेगळ्या मनोरंजनाच्या दुनियेत नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दिवाळी आणि आणखीही इतर उत्सवांच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या आनंदात आमच्या जादुने भर घालणार असून रसिकांनी याचा भरभरून आनंद घ्यावा. तसेच रसिकांनी तयार रहावे कारण आम्ही आल्यावर कुठल्या गोष्टी गायब करायच्या आणि करायच्या नाहीत हे आम्ही ठरणार आहोत.

- अमित इंगोले